ॲरॅगोनाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, स्फटिकांचे प्रकार (१) उभट प्रचिन व टोकाशी निमुळते फलक, (२) चापट वडीसारखे, एकेकटे किंवा जुळे, (३) यमलनाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले व ॲरॅगोनाइटाचे साधे स्फटिक. (अ) उभट निमुळता, (आ) वडीसारखा.षट्‍कोनी स्तंभासारखे दिसणारे [→ स्फटिकविज्ञान].कधीकधी गोलसर, वृक्काकार (मूत्रपिंडाच्या आकाराचे), स्तंभाकार किंवा झुंबराकार राशींच्या किंवा लेपाच्या स्वरूपात आढळते. वि. गु. २·९४. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंगहीन, पांढरे, पिवळसर किंवा इतर फिकट रंगाचे. रा. सं. CaCO3. ॲरॅगोनाइट हे कॅल्साइटाचा अन्यरूपी (एकच रा. सं. परंतु भिन्न स्फटिक गट असणारा) प्रकार असून सामान्य तापमानात व दाबात ते अस्थिर असते. कालांतराने त्याचे कॅल्साइटात परिवर्तन होते. जैव किंवा अजैव प्रक्रियांनी नैसर्गिक पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेट अवक्षेपित होऊन (साका खाली बसून) ॲरॅगोनाइट तयार होते. प्राण्यांच्या कवचातील मोत्यासारखे पदार्थ ॲरॅगोनाइटाचे असतात. स्पेनमधील ॲरॅगोन येथे प्रथम आढळल्यावरून नाव दिले गेले.

पहा : कॅल्साइट.

ठाकूर, अ. ना.