पायरोमॉर्फाइट : (ग्रीन लेड ओअर). खनिज. स्फटिक षट‌्कोणी, प्रचिनाकार क्वचित कोपरे गोलसर होऊन ते मृदंगासारखे झालेले, तर कधी पोकळ असतात [→स्फटिकविज्ञान]. पुष्कळदा पायरोमॉर्फाइट गोलाकार, वृक्काकार (मूत्रपिंडाकार), द्राक्षाच्या घडासारख्या, तंतुमय व कणमय रूपांतही आढळते. भंजन खडबडीत ते शंखाभ [→खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ३.५-४. वि. गु. ६.५-७.१. चमक रेझिनासारखी ते काहीशी हिऱ्यासारखी. रंग ऑलिव्हप्रमाणे हिरवट, उदी, पिवळा, क्वचित नारिंगी पिवळा, करडा वा पांढरा. काहीसे पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. पारदर्शक व रंगहीन प्रकार क्वचितच आढळतो. रा. सं. Pb5Cl(PO4)3. यामध्ये फॉस्फरसाच्या जागी आर्सेनिक वा व्हॅनेडियम येऊ शकते. अशा प्रकारे मिमेटाइट व व्हॅनेडिनाइट यांच्याशी समाकृतिक (सारखे स्फटिकाकार असलेले) आहे. कधीकधी शिशाच्या जागी अंशतः कॅल्शियम येते. हे द्वितीयक म्हणजे नंतरच्या क्रियांनी तयार झालेले

पायरोमॉर्फाइटाचा स्फटिक

खनिज असून बहुधा ते गॅलेनासारख्या शिशाच्या खनिजावर फॉस्फोरिक अम्लयुक्त पाण्याची विक्रिया होऊन तयार झालेले असावे. हे शिशाच्या शिरांच्या ऑक्सिडीभूत [→ऑक्सिडीभवन] पट्ट्यात गॅलेना, सेऱ्युसाइट इ. शिशाची खनिजे व लिमोनाइट यांच्याबरोबर आढळते.

सॅक्सनी, बोहीमिया, कॉर्नवॉल, उरल, स्पेन, काँगो, ब्रिटनी, नॅसॉ, चेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रेलिया इ. भागांत हे आढळते मात्र याचे मोठे साठे विरळाच आढळतात. शिशाचे गौण धातुक (कच्च्या रूपातील धातू) म्हणून याचा कधीकधी उपयोग होतो. याचा वितळलेला थेंब थंड झाल्यावर त्याला जो पैलुदार आकार येतो, त्यावरून या खनिजाला जे. एफ्. एल्. हाउसमान (१७८२-१८५९) यांनी १८१३ साली अग्नी व आकार या अर्थांच्या ग्रीक शब्दांवरून पायरोमॉर्फाइट हे नाव दिले.                                   

ठाकूर, अ. ना.