टॉर्बर्नाइट : (कॉपर युरॅनिनाइट, कॅल्कोलाइट). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, छद्म चतुष्कोणी, चौकोनी वडीसारखे [⟶ स्फटिकविज्ञान]. पत्र्यांच्या जुडग्यांच्या रूपातही आढळते. ⇨ पाटन (001) उत्कृष्ट. पत्रे ठिसूळ. कठिनता २–२·५. वि. गु. ३·२२. चमक हिऱ्‍यासारखी ते मोत्यासारखी. रंग पाचूसारखा किंवा गवतासारखा हिरवा. कस रंगापेक्षा फिकट. रा. सं. Cu (UO2)2 (PO4)2·8–12 H2O. हे हवेत उघडे राहिल्यास पाणी अंशतः निघून जाते. कधीकधी यात थोडे आर्सेनिक असते. हे ⇨ ऑटुनाइटाशी समविन्यासी (संरचनेच्या दृष्टीने सारखे) असते. युरेनियमच्या मूळच्या खनिजांमध्ये बदल होऊन हे तयार होते. ऑटुनाइट व युरेनियमच्या इतर खनिजांबरोबर हे आढळते. सॅक्सनी, बोहीमिया, कटांगा (झाईरे) इ. भागांत सापडते. हे युरेनियमाचे गौण धातुक (कच्च्या स्वरूपातील धातू) आहे. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ टॉर्बन बॅरीमान यांच्यावरून टॉर्बर्नाइट हे नाव दिले आहे (१७९२).

केळकर, क. वा.