झरा : भूपृष्ठावर ज्या ठिकाणी नैसर्गिक रीत्या भूमिजल बाहेर झिरपते त्या ठिकाणाला व तेथून बाहेर पडणाऱ्या जलप्रवाहाला झरा म्हणतात. विहीर खणताना भूमिजलपातळीच्या खाली खोदकाम गेल्यावर विहिरीच्या बाजूस व तळाशी असणाऱ्या खडकांच्या भेगांतून भूमिजल आत झिरपू लागते, हाही मानवनिर्मित झराच म्हणता येईल. भूमिजलाच्या वर खाली होणाऱ्या पातळीनुसार काही झरे ठराविक ऋतूत उदा., पावसाळ्यात वाहतात, तर काही झरे वर्षभर सतत वाहत असतात. झऱ्यातून एकदा बाहेर पडलेले पाणी जमिनीवरून वाहून कधीकधी पुन्हा भूमिगत होणे व दुसऱ्या झऱ्याच्या स्वरूपात इतरत्र कोठे तरी बाहेर पडणे शक्य असते.

झऱ्यांच्या पाण्याचे रासायनिक संघटन, त्याचे तापमान, भूवैज्ञानिक संरचना, त्यांचा प्रवाह खंडित आहे की संतत आहे यांसारख्या गुणधर्मांनुसार त्यांचे प्रकार ठरवितात. बहुतेक सर्व ठिकाणच्या भूमिजलात काही ना काही खनिज द्रव्ये विरघळलेली असतात, पण काही झऱ्यांतील पाण्यात काही विशेष प्रकारची खनिज द्रव्ये असल्यास किंवा त्यांचे प्रमाण बरेच असल्यास अशा झऱ्यांना खनिज झरे म्हणतात. झऱ्याच्या पाण्याचे तापमान सामान्य तापमानापेक्षा बरेच जास्त असल्यास त्याला ⇨उन्हाळे  म्हणतात. भूपृष्ठावरील मुखातून गरम पाणी कारंज्यासारखे उंच उडते त्याला ⇨गायझर  असे नाव दिलेले आहे. गरम झऱ्यांच्या व गायझरांच्या पाण्यात अनेक लवणे विरघळलेली असतात ती झऱ्यांच्या मुखासभोवतीच्या क्षेत्रात निक्षेपित होतात (साचतात). कधीकधी अशा निक्षेपांमुळे झऱ्याभोवती उंचवटे निर्माण होतात, त्यांना उंचवटी झरे म्हणतात, ऑस्ट्रेलियात असे बरेच झरे आहेत.

उत्पत्ती : जमिनीवर पावसाचे पडणारे पाणी भूपृष्ठाशी पार्य खडक किंवा मातीचा थर असेल, तर त्यात मुरून खाली जाते. या पाण्याला खाली अपार्य थर लागला की, तेथे ते अडून त्या थरावर साचू लागते. पार्य खडकांच्या व मातीच्या छिद्रांतून, भेगांतून साचलेल्या अशा पाण्याला भूमिजल म्हणतात व या पाण्याच्या सर्वांत वरच्या पातळीला भूमिजलपातळी वा पृष्ठ म्हणतात [⟶ भूमिजल]. काहीही कारणाने भूमिजलपृष्ठ भूपृष्ठाला छेदत असेल, तर त्या जागी पाणी पृष्ठभागावर वाहू लागते व झरा निर्माण होतो. झरा निर्माण होण्यासाठी भूमिजलपृष्ठाचे स्वरूप आणि त्या प्रदेशातील पार्य व अपार्य खडकांच्या संरचना महत्त्वाच्या असतात.

निर्मितीच्या संरचना : पार्य आणि अपार्य खडकांच्या अनेक प्रकारच्या संरचनांमुळे झरे निर्माण होतात. एखाद्या प्रदेशात मंदनती (कमी कल) असलेले पार्य व अपार्य खडकांचे थर एकाआड एक रचलेले असल्यास पार्य थरांत मुरणारे पावसाचे पाणी अपार्य खडकाच्या स्तरणतलावर (थराच्या पातळीवर)  साचत राहून ज्या ठिकाणी हे तलपृष्ठ भूपृष्ठाला छेदत असेल तेथून हे पाणी बाहेर झिरपते व त्या रेषेवर अनेक झरे निर्माण होतात (आकृती अ). खडकात घडून आलेल्या विभंगांमुळेही (भेगांमुळेही) झरे निर्माण होतात. एक तर विभंगामुळे खडकांचा भाग भरडला जातो व या भागातून खाली अडथळा येईपर्यंत पाणी मुरून साचत राहते. ज्या ठिकाणी विभंगाचे पृष्ठ भूपृष्ठाशी आलेले असते तेथून पाणी वर वाहू लागून झरा तयार होतो. दुसरे म्हणजे (आ) मध्ये दाखविल्याप्रमाणे कललेल्या वालुकाश्माच्या पार्य थरासमोर विभंगामुळे अपार्य शेल खडकाचा थर येऊन

झरा निर्मितीच्या संरचना : (१) पार्य खडक, (२) अपार्य खडक, (३) भूमिजलपृष्ठ, (४) झरा, (५) विसंगतीचे पृष्ठ, (६) विभंग, (७) भित्ती, (८) अग्निज खडकांतील संधी, (९) चुनखडकांतील भेगा, (१०) पर्जन्य.

अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वालुकाश्मात साचणारे पाणी विभंगपृष्ठाला अनुसरून भूपृष्ठावर झऱ्याच्या रूपात वाहू लागते. काही ठिकाणी ग्रॅनाइटासारख्या संहत (घट्ट) खडकात विस्तृत प्रमाणात असणाऱ्या व एकमेकांना छेदणाऱ्या संधिसमूहातून पाणी झिरपून साचते व पृष्ठभागाचा उतार बराच तीव्र असल्यास मंद उताराचे भूमिजलपृष्ठ भूपृष्ठाला जेथे छेदते त्या जागी पाणी बाहेर वाहते (इ). अग्निज अंतर्वेशनामुळे (घुसण्यामुळे) पार्य खडकांना भेदून जाणाऱ्या उभ्या भित्ती तयार झालेल्या असल्यास त्यांच्यामुळे अडलेले पाणी पार्य खडकात साचत राहून भित्तिपृष्ठाला अनुसरून भूपृष्ठावर झऱ्याच्या रूपात बाहेर पडते (ई). एकाआड एक याप्रमाणे पार्य व अपार्य खडकांचे थर रचले गेले असल्यास अपार्य खडकावरील पार्य खडकांत पाणी साचून झरा निर्माण होतो (उ) मधील वरचा झरा अशा प्रकारे तयार झाला आहे. त्याचप्रमाणे खडकांच्या थराखाली विसंगती असल्यास व विसंगतीखालचे खडक अपार्य असल्यास विसंगती पृष्ठावरच्या पार्य खडकांत पाणी साचून झरा निर्माण होतो (उ) मधील खालचा झरा अशा प्रकारचा आहे. चुनखडकांच्या प्रदेशात संधीतून पाणी खाली झिरपताना चुनखडक विरघळून संधिभेगा मोठ्या होतात. त्यामुळे पावसाचे सर्व पाणी या भेगा-पोकळ्यांतून खाली जाते. खाली अपार्य खडकाचा थर लागल्यावर त्या थराच्या पृष्ठाला अनुसरून उताराने हे पाणी वाहू लागते आणि शेवटी भूपृष्ठावर वाट मिळेल तेथे मोठ्या झऱ्याच्या किंवा क्वचित प्रवाहाच्या स्वरूपात बाहेर पडते (ऊ).

झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रत्येक झऱ्याच्या बाबतीत भिन्न असते. काही झरे अगदी झिरपणारे वा ठिबकणारे असून त्यांच्यातून दर दिवशी अगदी अल्प पाणी मिळते. त्याच्या उलट काही मोठ्या झऱ्यांतून प्रतिदिवशी कोट्यावधी लिटर पाणी बाहेर पडते. उदा., अमेरिकेतील फ्लॉरिडाच्या सिल्व्हर स्प्रिंग्जमधून दर दिवशी सु. ३·५ अब्ज लि. पाणी बाहेर पडते.

आगस्ते, र. पां.