ॲनॉर्थोसाइट : पूर्णस्फटिकी, भरड कणी व जवळजवळ सर्वस्वी प्लॅजिओक्लेज या खनिजाचा बनलेला अग्निज खडक. प्लॅजिओक्लेजाच्या ‘ॲनॉर्थोज’ या फ्रेंच नावावरून दिलेले ‘ॲनॉर्थोसाइट’ हे नाव अनुचित व घोटाळा करणारे आहे. कारण त्याच्यात ॲनॉर्थाइट नसते. याच्यातले प्लॅलिओक्लेज सामान्यत: अँडेसाइन-ब्रॅडोराइट व कधीकधी बायटोनाइट असते. प्लॅजिओक्लेजाशिवाय ऑजाइट, हायपर्स्थीन व ऑलिव्हीन ही खनिजेही अल्प, म्हणजे १० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात असतात. मुख्यत: प्लॅजिओक्लेजाचा बनला असल्यामुळे ॲनॉर्थोसाइटाचा रंग पांढरा किंवा फिकट असावा अशी अपेक्षा असते व काही ॲनॉर्थोसाइटांचे रंग तसे असतातही. परंतु पुष्कळ ॲनॉर्थोसाइटांचे प्लॅजिओक्लेज संभासी असते म्हणजे त्याच्या स्फटिकातील काही विशिष्ट पातळ्यांत लोही धातुकांसारख्या खनिजांचे सूक्ष्म कण किंवा पत्रे समाविष्ट झालेले असतात. त्यामुळे प्लॅजिओक्लेजाला व खडकाला गडद रंग येतो. उदा., न्यू फाउंडलंडातला ॲनॉर्थोसाइट काळा व नॉर्वेतील जांभळट तपकिरी असतो. अँडेसाइन किंवा लॅब्रॅडोराइट घटक असलेल्या ॲनॉर्थोसाइटांच्या प्रचंड व बॅथोलिथासारख्या राशी कँब्रियन-पूर्व (६० कोटी वर्षांपूर्वीचे) खडक असलेल्या प्रदेशांत मात्र आढळतात. त्यांपैकी विख्यात म्हणजे कॅनडातील तसेच न्यूयॉर्क संस्थानाच्या ॲडिराँडॅक भागातील व स्कँडिनेव्हियातील राशी होत.

ॲनॉर्थोसाइटाच्या थरासारख्या व वरील राशींच्या मानाने लहान अशा राशी अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) अग्निज खडकांच्या काही थरांत-शिलापट्टांत व लोपोलिथांत-आढळतात [→ अग्निज खडक]. त्यांचे प्लॅजिओक्लेज बायटोनाइट असते. उदा., माँटॅनातील स्टिलवॉटर व ट्रान्सव्हालातील बुशफेल्ट क्षेत्रात. तमीळनाडूतील व बंगालातल्या राणीगंजजवळच्या आर्कीयन खडकांत लॅब्रॅडोराइटमय ॲनॉर्थोसाइटाच्या अगदी बारीकशा राशी आहेत.

केळकर, क. वा.