बाँबे हाय तेल क्षेत्राचे स्थान

बाँबे हाय : मुंबईजवळील उथळ समुद्राच्या तळाखाली सापडलेले अतिशय मोठे खनिज तेल क्षेत्र. १९७० मध्ये भारतात जमिनीवर फक्त आसाम आणि गुजरात या दोन राज्यांत खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पादन होत असे. देशातील वाढत्या औद्योगिकरणामुळे खनिज तेलाची मागणीही वाढत होती. या वेळी खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्याचे काम किनाऱ्यालगतच्या उथळ समुद्रातही सुरू झाले. भूकंपीय सर्वेक्षणाचा वापर करण्यात आला[⟶ खनिज पूर्वेक्षण]. पश्चिम किनाऱ्याजवळील गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, मेहसाणा, खंबायत इ. क्षेत्रांतून खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन चालू होतेच. हे लक्षात ठेवून खंबायतच्या आखातातील उथळ समुद्रात आणि गुजरात व महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात विशेष काळजीपूर्वक शोध घेण्यात आला. याचा परिणाम म्हणजे बाँबे हाय तेल क्षेत्राचा शोध होय. भूपृष्ठाखालील खडकांच्या संरचनेचे वर्णन करताना ‘हाय’ हा शब्द वापरला जातो. याचा अर्थ घुमटासारखी अथवा कमानीसारखी दोन बाजूंनी उतरती होत जाणारी संरचना होय. हे तेल क्षेत्र मुंबईच्या वायव्येस १६० किमी. अंतरावर उथळ पाण्यातील भागात आहे.

येथे पाणी सु. ७५ ते ९० मी. खोल आहे. छिद्रणासाठी सुरुवातीस ‘सागरसम्राट’ नावाचे (सु. १२.७ कोटी रु. किंमतीचे) स्वयंउत्थापक (यंत्राच्या साहाय्याने खालीवर होऊ शकणारे) छिद्रणयंत्र वापरण्यात आले. या यंत्राने ६,००० मी. खोल विहीर खणता येते. बाँबे हाय क्षेत्रातील खणलेल्या पहिल्या विहिरीत मे १९७४ मध्ये तेल लागले. या तेल क्षेत्राची संरचना घुमटाकार आहे. आशय शैल (ज्यांत खनिज तेलाचा साठा आहे असे खडक) मायोसीन (सु. २.५ ते ३ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील चुनखडक आहेत. हे चुनखडक ⇨ दक्षिण ट्रॅप (बेसाल्ट) या ज्वालामुखी खडकावर निक्षेपित झालेले (साचलेले) आहेत. चुनखडकांतील सच्छिद्रता त्यांतील भेगा, तडे वगैरेंमुळे निर्माण झाली आहे.

पहिल्या विहिरीत मिळालेल्या यशाने उत्साहित होऊन बाँबे हाय क्षेत्रात अनेक विहिरी खणून या क्षेत्राचा विकास करण्यात आला. क्षेत्राची व्याप्ती सु. २,००० चौ. किमी. असून आशय शैलाची व्याप्ती सु.३,५०० चौ. किमी. आहे. खणलेल्या विहिरीतून प्राप्त झालेल्या प्राथमिक भूवैज्ञानिक माहितीच्या आधारे बाँबे हाय क्षेत्रातील नैसर्गिक वायू व खनिज तेल यांच्या राशी अनुक्रमे ४ x १० घ.मी. आणि २ x १०१२ टन इतक्या असाव्यात, असा अंदाज करण्यात आलेला आहे.

या तेल क्षेत्राच्या आसपास वसई संरचना, तारापूर संरचना, तापी संरचना, डहाणू संरचना, रत्नागिरी संरचना इ. भूवैज्ञानिक संरचनांचा शोध लागला आहे. वसई क्षेत्रात तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. तसेच रत्नागिरी क्षेत्रात तेल सापडले आहे.

बाँबे हाय व आसपासच्या क्षेत्रात सागरसम्राट, हाकोन मॅग्नस, शेनॉन डोह, डालमोहाय व गेटिसबर्ग या पाच सागरी छिद्रण यंत्रानी शोध-विहिरी व विकास-विहिरी खणण्याचे काम केले. विहिरीतून प्राप्त होणाऱ्या तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी अम्लीकरण तंत्र यशस्वीरीत्या वापरण्यात आले. या तंत्रामध्ये हायड्रोक्लोरिक अम्ल पंपाच्या साहाय्याने विहिरीमधून चुनखडकांत घुसविण्यात येते. या अम्लाने काही प्रमाणात चुनखडक विरघळून त्याची सच्छिद्रता व पारगम्यता वाढते आणि त्यामुळे तेलाचा प्रवाहही वाढतो. छिद्रणाच्या कामास वेग यावा म्हणून ‘सागरविकास’ व ‘सागरप्रगती’ ही दोन सागरी छिद्रणयंत्रे वापरण्यात येणार आहेत.

बाँबे हाय क्षेत्राचा विकास करण्यासाठी विहिरी खणून त्या उत्पादन मंचास जोडल्या आहेत. या विहिरींतून निघणारे तेल व नैसर्गिक वायू विशाल प्रक्रियामंचावर एकत्र करतात. मे १९८० मध्ये उत्तर बाँबे हाय मंच व उरण येथील द्रवीकृत खनिज तेल वायू (एल. पी. जी.) संयंत्र कार्यान्वित झाले. हा प्रक्रियामंच उत्तर बाँबे हाय क्षेत्राच्या मध्यभागी आहे. मंचाचे वजन १०,००० टन आहे. मंचाच्या जागी समुद्र ७३ मी. खोल आहे. ज्या आठ प्रचंड खांबांवर मंच उभारला आहे ते खांब समुद्राच्या तळाशी १०० मी. खोल गाडले आहेत. मंच तीन मजली आहे. या मध्यवर्ती मंचावर आसमंतातील १९ मंचांवरील विहिरींतून काढण्यात येणारे अशुद्ध खनिज तेल एकत्रित करतात व त्यावर प्रक्रिया करून त्यातून खनिज तेल, नैसर्गिक वायू व पाणी वेगळे करतात. प्रक्रियामंच व तेथून निघणारे तेलवाहक व वायुवाहक नळ समुद्राच्या पाण्याच्या विक्रियेमुळे गंजतात, त्यांवर विषारी वनस्पती व प्राणी यांचे थर बसतात व अशा प्रकारे ते कमकुवत बनण्याची शक्यता असते. यासाठी मंच व नळ नियमितपणे व काळजीपूर्वक तपासतात. खनिज तेल व नैसर्गिक वायू ज्वालाग्राही असल्यामुळे काम करताना आग लागण्याचा धोका असतो. यासाठी अग्निशामक दल सुसज्ज ठेवावे लागते. सागरी पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येते. समुद्राच्या तळाशी असणाऱ्या तेलाच्या विहिरींची दुरुस्ती व त्या सतत कार्यक्षम रहाव्यात म्हणून देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित पाणबुड्यांची पथके असतात. उत्पादन मंचास जोडलेल्या विहिरीतील तेलाच्या व नैसर्गिक वायूच्या उत्पादनावर संगणकाच्या (गणकयंत्राच्या) साहाय्याने लक्ष ठेवतात. बाँबे हाय तेल क्षेत्र आणि उरण किनाऱ्याजवळील औद्योगिक प्रकल्प यांमधील रेडिओ संपर्कासाठी ‘इनसॅट’ या कृत्रिम संदेशवहन उपग्रहाची मदत घेतात.

बाँबे हाय क्षेत्रापासून उरणपर्यंत २०३ किमी. लांबीचे तेलवाहक व वायुवाहक नळ समुद्रतळाशी टाकले आहेत. तेल नळ ७६२ मिमी. व्यासाचे व वायू नळ ६६० मिमी. व्यासाचे आहेत. या नळांतून तेल व नैसर्गिक वायू परिष्करण (शुद्धीकरण) कारखान्यांना पुरविले जातात. या क्षेत्रातील नैसर्गिक वायू हा संबद्ध वायू (खनिज तेलाबरोबर आढळणारा ⟶ नैसर्गिक वायू) या स्वरूपात आढळतो. या वायूपासून उरण येथील संयंत्रात द्रवीकृत खनिज तेल वायूचे उत्पादन होत आहे. हा वायू सिलिंडरांमध्ये भरून घरगूती जळणासाठी वापरतात. बाँबे हाय क्षेत्रातून निघणारा काही संबद्ध वायू तुर्भे येथील टाटा औष्णिक शक्ती केंद्रास पाठवितात.

एप्रिल १९८० पूर्वी उत्तर बाँबे हाय क्षेत्रात ६ उत्पादन मंचांवरील प्रत्येकी ४ अशा २४ विहिरी पूर्ण झाल्या होत्या. दक्षिण बाँबे हाय क्षेत्राचा विकास करण्यासाठी उत्तर बाँबे हाय मंचासारखा दुसरा प्रक्रिया मंच (दक्षिण बाँबे हाय मंच) १९८२ मध्ये उभारण्यात येईल. या मंचावर उत्पादन होणारे तेलही नळांतून उरण येथे पाठविण्यात येईल. या दोन्ही प्रक्रिया मंचांवरून उत्पादन सुरू झाल्यावर क्षेत्रांतून जास्त तेल मिळविण्यासाठी जलअंतःक्षेपण [खास खणलेल्या विहिरींतून आशय शैलात दाबाने पाणी घुसविण्याची ⟶ खनिज तेल] पद्धती वापरण्यात येणार आहे. मध्य बाँबे हाय क्षेत्राचा विकास चालू आहे.

सप्टेंबर १९८१ मध्ये बाँबे हाय क्षेत्राच्या पूर्वेस ३५ किमी. अंतरावर एक नवीनच तेल क्षेत्र आढळले असून त्याला बी-५७ असे संबोधण्यात येते. या नव्या क्षेत्राचे क्षेत्रफळ ८० चौ. किमी. असून चाचणी परीक्षणात तेथून रोज सु. २,००० पिंपे कच्चे खनिज तेल निघाले आहे. या क्षेत्राच्या विकासाचे कार्य हाती घेण्यात आलेले आहे.

बाँबे हाय क्षेत्रातून प्रतिवर्षी सु. साठ लक्ष टनांहून जास्त खनिज तेलाचे उत्पादन होते. संबद्ध वायूचे उत्पादन अविरत चालू ठेवणे आवश्यक असते व दररोज सु. २० लक्ष घ.मी. संबद्ध वायूचे उत्पादन होते. वसई क्षेत्रात केवळ वायू (निस्संबद्ध वायू) मिळतो. अशा वायूचे उत्पादन जरुरीप्रमाणे चालू अथवा बंद करता येते. संबद्ध व निस्संबद्ध वायूंचे विभाजन (निरनिराळ्या तापमानांस मिळणारे वायु-घटक अलग करणारी क्रिया) केल्यावर त्यापासून पाच वायुघटक मिळतात त्यांना सी-१, सी-२, सी-३, सी-४ व इतर अशी नावे देतात. हे घटक त्यांचे प्रमाण व त्यांचा वापर कसा करता येईल, हे मागील कोष्टकात दिले आहे. विभाजन न केलेला संबद्ध वायु अथवा त्याच्या विभाजित घटकांपैकी कोणताही घटक औष्णिक शक्ती उत्पादन करण्यासाठी वापरता येतो.

बाँबे हाय व वसई क्षेत्र येथील नैसर्गिक वायूतील 

घटक व त्याचा उपयोग. 

घटक 

संबद्ध वायू (बाँबे हाय)%घनफळ

निस्संबद्ध वायू (वसई क्षेत्र)%घनफळ

वापर / उपयोग

सी-१ 

६९.१ 

७८ 

खते 

सी-२

१३.१

६.७

खनिज तेल रसायने

सी-३

९.३

४.०

खनिज तेल रसायने व घरगुती जळण

सी-४

५.३

२.०

घरगुती जळण

इतर

३.२

९.३

 

पहा : खनिज तेल नैसर्गिक वायु.

गाडेकर, दि. रा.