झॉइसाइट : एपिडोट गटातील खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, प्रचिनाकार, प्रचिनावर उभ्या रेखा असतात. संपुंजित रूपातही आढळते. पाटन(010) चांगले [⟶ स्फटिकविज्ञान]. रंग पांढरा, करडा वा उदी. कठिनता ६–६·५. वि. गु. ३·३. रा. सं. Ca2Al3(SiO4)3OH. यात लोह जवळजवळ नसते. मात्र ॲल्युमिनियमाच्या जागी लोह येऊन एपिडोट बनते. मँगॅनिजाने अशाच प्रकारचे प्रतिष्ठापन झाल्यास गुलाबी थुलाइट मिळते. सहज भंग पावणाऱ्या रूपांतरित खडकांत म्हणजे सुभाजांत हे आढळते. अग्निज खडकांचे उच्च तापमानाच्या पाण्याद्वारे रूपांतरण होऊन झॉइसाइट तयार होते. प्लॅजिओक्लेज खनिज विपुल असणाऱ्या खडकाचे असेच रूपांतरण झाल्यास सॉस्युराइट खडक बनतो. सॉस्युराइटात झॉइसाइट हे प्रमुख खनिज असते. याचे क्लिनोझॉइसाइट व एपिडोट यांच्याशी जवळचे नाते आहे. बारॉन सिजिसमड झॉइस फोन एडेलस्टीन यांनी हे खनिज शोधून काढल्यामुळे ए. जी. व्हेर्नर यांनी १८०५ साली त्याला झॉइसाइट हे नाव दिले.

पहा : एपिडोट गट.

ठाकूर, अ. ना.