तृतीय संघ : (टर्शरी). तृतीय हे भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव असून कालाच्या विभागाला तृतीय कल्प आणि या कल्पात तयार झालेल्या खडकांना तृतीय संघ म्हणतात. हा कल्प सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वी सुरू होऊन सु. १·२ कोटी वर्षांपूर्वी संपला. हा ⇨ नवजीव महाकल्पाचा (गेल्या सु. ६·५ कोटी वर्षांच्या काळाचा) जुना व मुख्य विभाग आहे. याचे (सर्वांत आधीचा) पॅलिओसीन (पुरानूतन), इओसीन (आदिनूतन), ऑलिगोसीन (अल्पनूतन), मायोसीन (मध्यनूतन) व (शेवटचा) प्लायोसीन (अतिनूतन) असे उपविभाग असून त्यांच्यावर इतरत्र स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत.

जोव्हान्नी आर्दुइनो यांनी टर्शरी (तिसरा या अर्थाचा लॅटिन शब्द) ही संज्ञा उ. इटलीतील थरांकरिता प्रथम वापरली (१७६७). १८१० साली झार्झ क्यूव्ह्ये (१७६९–१८३२) व आलेक्सांद्र ब्रॉन्यार (१७७०–१८४७) यांनीही पॅरिस द्रोणीतील नव्या शैलसमूहांसाठी हीच संज्ञा वापरली. १८३३ साली चार्ल्‌स लायेल (१७९७–१८७५) यांनी याचे चार विभाग केले तर १८७४ साली व्हिल्हेल्म फिलिप शिंपर (१८०८–८०) यांनी पाचवा पॅलिओसीन विभाग त्यात समाविष्ट केला. १९५६ साली पॅलिओसीन, इओसीन व ऑलिगोसीन यांचा मिळून पॅलिओजीन आणि मायोसीन व प्लायोसीन यांचा मिळून निओजीन असे या कल्पाचे दोन विभाग करण्यात आले परंतु ही विभागणी तेवढीशी प्रचारात नाही.

वाटणी व खडक : या संघाचे निक्षेप (खडकांच्या राशी) जगात सर्वत्र विस्तृत पसरलेले आहेत. यूरोप, प. आशिया आणि निकट पूर्व भागात पूर्व व मध्य तृतीय कल्पातील सागरी व मचूळ पाण्यात तयार झालेले निक्षेप आढळतात. महासागरांच्या तळांवरही या संघाचे निक्षेप विस्तृत पसरलेले आहेत. पॅसिफिक महासागरात पाण्याखाली असलेल्या सपाट माथ्याच्या टेकड्यांवरही उत्तर इओसीन काळानंतरचे निक्षेप आढळले आहेत.

या संघात प्रामुख्याने गाळाचे खडक (चुनखडक, वालुकाश्म, चुनामिश्रित माती म्हणजे मार्ल, पंकाश्म व पिंडाश्म) आढळतात. या कल्पातील सागरी निक्षेप सामान्यतः कमी जाडीचे व खंडांच्या किनारी भागात (उदा., ॲमेझॉनचे खोरे) आढळतात. मात्र पॅसिफिकभोवतालच्या सीमावर्ती भागात व आल्प्स–हिमालय पर्वतश्रेणीच्या कडेशी त्यांची जाडी जास्त आहे (उदा., सांता बार्बरा, कॅलिफोर्निया येथे सु. १६,००० मी. जाडीचे, तर ⇨ शिवालिक संघातील खडकांची जाडी ४,५०० ते ६,००० मी. आहे). गोड्या पाण्यात साचलेल्या निक्षेपांची जाडी कमी असून ते खंडांच्या अंतर्भागात (उदा., आशियाचा अंतर्भाग, ईशान्य आफ्रिका) आढळतात.

या कल्पात ज्वालामुखी खडकही विस्तृत प्रमाणात निर्माण झाले. विशेषेकरून ते पॅसिफिकभोवतालचा भाग, भूमध्य सागरी प्रदेश व आइसलँड येथे आढळतात. महाराष्ट्रात आढळणारा कातळ म्हणजे दक्षिण ट्रॅप हाही काही प्रमाणात या कल्पातील आहे. अंतर्वेशनांच्या (घुसलेल्या राशींच्या) व खोल जागी तयार झालेल्या रूपातील या कल्पामधील अग्निज खडक काही ठिकाणी आढळतात.

पुराभूगोल व पुराजलवायुविज्ञान : तृतीय कल्पाच्या प्रारंभीच सर्व खंडांची मांडणी जवळजवळ आतासारखी झाली होती. तृतीय कल्पात गिरिजनक (पर्वत निर्माण करणाऱ्या) प्रचंड हालचाली व प्रसंगी खंडांचे वर उचलले जाणे म्हणजे उत्थान या क्रिया आणि सागराचे जमिनीवर अतिक्रमण व माघार या क्रिया एकाआड एक घडलेल्या आढळतात. गिरिजनक व उत्थानाच्या क्रिया या कल्पाअखेरीपर्यंत वाढतच गेल्या. सध्याचे बहुतेक उंच पर्वत याच काळात निर्माण झाले आहेत किंवा अधिक उंच झाले आहेत. उदा., ऑलिगोसीन काळात भारतीय उपखंड उत्तरेकडे सरकल्याने [→ खंडविप्लव] टेथिस महासागराची द्रोणी बाजूने दाबली जाऊन गाळाच्या थरांना घड्या पडल्या आणि ते वर उचलले जाऊन आल्प्स–हिमालय पर्वतश्रेणी तयार झाली, नंतरही हे उंचावणे चालूच राहिले. तसेच अँडीज, रॉकी, पिरेनीज, ॲपेनाइन्स, कार्पेथियन, ॲटलास व कॉर्डिलेरा, कॉकेशस बाल्कन इ. पर्वत या काळात निर्माण झाले वा उंच झाले आहेत.

तृतीय कल्पामध्ये अँडीज, आइसलँड व जपान येथील ज्वालामुखी जागृत होते तर इंडोनेशियात मायोसिनानंतर विपुल प्रमाणात ज्वालामुखी क्रिया घडून आली. महाराष्ट्रातील दक्षिण ट्रॅपेचे काही उद्‌गिरण (बाहेर पडणे) या कल्पाच्या आरंभी झाले. तसेच महासागरांमध्येही या कल्पात ज्वालामुखी उद्‌गिरणे झाली.

इओसीन, ऑलिगोसीन व मायोसीन या काळात जगात अनेक ठिकाणी सागरांचे जमिनीवर अतिक्रमण झाले होते. मायोसीन काळात पश्चिम भूमध्य सागरी भागावर झालेले सागरी अतिक्रमण महत्त्वाचे आहे.

तृतीय कल्पाच्या सुरुवातीस आताच्या मानाने अधिक उत्तरेकडे असलेल्या भागांपर्यंत उबदार हवामान पसरलेले होते. उदा., ४८ उ. अक्षांशापर्यंत या कल्पातील खडकांत उष्ण कटिबंधात वाढणारे भित्ती प्रवाळ व मृदुकाय (मॉलस्क) प्राण्यांचे अवशेष आढळले आहेत. तसेच पॅलिओसीन–इओसीन काळातील ताड व इतर उष्णताप्रिय वनस्पतींचे अवशेष पू. यूरोप व अलास्का येथे आढळले आहेत. मायोसिनाच्या आरंभी जगभर उबदार हवामान होते, नंतर प्लाइस्टोसीनपर्यंत (सु. ११,००० वर्षांपूर्वीपर्यंत) ते थंड होत गेले. अलास्काचे आखात व अंटार्क्टिका भागात समुद्रसपाटीवरील प्रदेशातही हिमानी (हिम, बर्फ वगैरेंमुळे होणारी) क्रिया घडल्याचे पुरावे मिळतात.


या बदलत्या भूमिस्वरूपांचा आणि हवामानाचा जीवांवर परिणाम झाल्याचे दिसून येते. उबदार हवामानामुळे तृतीय कल्पारंभी सागरी प्राणी सर्वदेशीय होते. मात्र तृतीय कल्पाच्या शेवटी टेथिस महासागर जमिनीने वेढला गेल्याने प्राणिक्षेत्रे मर्यादित झाली. उलट जमिनीवर या कल्पाच्या सुरुवातीस प्रदेशनिष्ठ प्राणी होते. टेथिसाचा ऱ्हास झाल्यावर अडथळे पुष्कळसे कमी झाले. परिणामी प्लायोसिनामध्ये सस्तन प्राणी उ. अमेरिकेतून द. अमेरिकेत गेले व द. अमेरिकेतील प्रदेशनिष्ठ सस्तन प्राण्यांपैकी पुष्कळ निर्वंश झाले. तृतीय कल्पाच्या शेवटी उत्तरेकडील भाग थंड झाल्याने प्रवाळासारखे प्राणी दक्षिणेकडे सरकले, तर काही प्राणी पर्वताच्या (उदा., हिमालय–आल्प्स) अडथळ्यामुळे स्थलांतर न करता आल्याने प्रतिकूल हवामानामुळे निर्वंश झाले.

जीव : या कल्पातील जीव हे आधीच्या क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील जीवांपेक्षा अधिक प्रमाणात तद्नंतरच्या चतुर्थ कल्पातील आणि आताच्या जीवांसारखे होते. तृतीय कल्पातील १० टक्क्यांपर्यंतच जाती निर्वंश झाल्या आहेत. उलट काही जाती तर त्यांच्या आताच्या वंशजांसारख्याच होत्या. बेलेग्नाइट, ॲमोनाइट व डिस्कोॲस्टर वगैले जीव सोडल्यास तेव्हाचे बहुतेक जीवगट जलदपणे विकास पावले. वनस्पती मात्र क्रिटेशस काळातच आधुनिक रुपे घेऊ लागल्या होत्या. त्यामुळे उत्तर क्रिटेशस (सु. १२ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) आणि तृतीय काळामधील  वनस्पतींपेक्षा प्राण्यांमध्ये अधिक फरक आढळतो.

वनस्पती : या कल्पात वनस्पतींच्या प्रमुख गटांचे प्रतिनिधी होते. आवृतबीजी (सपुष्प) वनस्पती या काळातील प्रमुख वनस्पती असून शंकुमंत म्हणजे सूचिपर्णी वनस्पती (उदा., पाइन, फर, सीडार, सायप्रस इ.) पुष्कळ होत्या. इओसिनामध्ये गवते व पॅलिओसिनामध्ये कंपॉझिटी कुलातील वनस्पती अवतरल्या. त्यांचा जलद विकास झाला, त्यांच्यात विविधता आली आणि त्यांचा विस्तृत प्रसारही झाला. टेथिसाभोवती या कल्पात ताड (पाम) वृक्ष विपुल होते. या कल्पात गवताळ जमिनी वाढल्या व जंगले घटली. याचा प्राणिजीवनावरही परिणाम झाला.

फोरॅमिनीफेरा : या कल्पातील पृष्ठवंशीमध्ये (पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांमध्ये) ज्याप्रमाणे सस्तन प्राणी महत्त्वाचे आहेत त्याप्रमाणे अपृष्ठवंशींमध्ये फोरॅमिनीफेरा प्राणी महत्त्वाचे आहेत. फोरॅमिनीफेरांमध्ये न्युम्युलाइट महत्त्वाचे आहेत कारण या कल्पातील जगभरच्या निक्षेपांमधील ते विपुल व प्रमुख असे अपृष्ठवंशी प्राणी आहेत. पॅलिओसिनामध्ये एकदमच न्युम्युलाइट आणि ऑपरक्युलाइन हे फोरॅमिनीफेरा अवतरले व त्यांचा जलदपणे विकास होऊन त्यांची संख्या वाढली. त्यांच्या प्रसाराची विशिष्ट तऱ्हा आढळते. त्यामुळे ते सूचक जीवाश्म (शीळारूप अवशेष) म्हणून उपयुक्त आहेत म्हणजे भूवैज्ञानिक काळ दर्शविण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरले आहेत. त्यांच्या अवशेषांपासूनच न्युम्युलिटिक चुनखडक तयार झालेला आढळतो. मध्य मायोसिनानंतर न्युम्युलिटिक निर्वंश होऊ लागले व त्यांच्या जागी मोठे फोरॅमिनीफेरा आले. प्लवक (तरंगणाऱ्या) फोरॅमिनीफेरांचा (उदा., ग्लोबिजेरीना) जलद विकास झाला व ते विस्तृत क्षेत्रात पसरले. मात्र त्यांच्या क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) वेग एक सारखा नसल्याने प्रत्येक जातीचा काळ भिन्नभिन्न आहे व ते सूचक जीवाश्म म्हणून उपयुक्त आहेत.

इतर अपृष्ठवंशी : सागरात कोकोलिथिड, डिस्कोॲस्टरीड, शंखधारी (गॅस्ट्रोपॉड) व काही एकिनॉइड (उदा., हार्ट अर्चिन) यांचा जलद विकास झाला. इतर अपृष्ठवंशींचा स्पष्टपणे विकास झाल्याचे आढळत नाही. पल्मोनेट (फुप्फुसासारख्या पिशव्यांनी श्वसन करणारे) शंखधारी व गोगलगायी यांचा जलद क्रमविकास होऊन त्यांच्यात विभिन्नता आली. या कल्पात मृदुकाय प्राणी सर्वांत विपुल व सामान्य होते. त्यांतही शंखधारी लवकर विकसित व विभिन्न झाले. आधीचे शंखधारी निर्वंश झाले आणि आताच्या शंखधारींचे पूर्वज मध्य तृतीय कल्पात अवतरले. त्यामानाने शिंपाधारींमधील विविधता कमी होती. काही मृदुकाय या कल्पात जलद विकास पावल्याने सूचक जीवाश्म म्हणून उपयुक्त ठरले आहेत. या कल्पात समुद्री अर्चिन, शंख–जीव (शेल–फिश), ब्रायोझोआ, प्रवाळ (विशेषतः छिद्री प्रवाळ) वगैरे प्राणीही होते.

सस्तन प्राणी : मानवाव्यतिरिक्त इतर बहुतेक सस्तन प्राणी याच कल्पात अवतरले. प्रथम ते साधे व संख्येने कमी होते. त्यांचे दात, पाय व कवटी पुष्कळशी सरीसृपांप्रमाणे (सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे) होती. नंतर त्यांचा जलदपणे क्रमविकास होत जाऊन ते जटिल बनले आणि त्यांचे अनेक वंश, कुले व गण निर्माण होऊन संख्या खूप वाढली. त्यांच्यात विभिन्नता आल्याने व त्यांच्या मेंदूचा हळूहळू विकास होत गेल्याने त्यांनी सरीसृपांची जागा घेतली व या कल्पाच्या मध्यास ते प्रमुख प्राणी बनले, ही या कल्पातील सर्वांत महत्त्वाची घटना आहे. यामुळे या कल्पाला ‘सस्तन प्राण्यांचे युग’ असेही म्हणतात. आता माहित नसलेले सस्तन प्राणीही या कल्पात होते. या काळातील शिशुधानींच्या (ज्यांच्या पोटावर पिलू ठेवण्यासाठी पिशवीसारखी संरचना असते अशा प्राण्यांच्या) १९ कुलांपैकी एक व जरायुजांच्या (पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राण्यांच्या) २५ गणांपैकी तीन गण आधीचे होते. मांसाहारींपैकी आद्य प्रकारचे प्राणी ऑलिगोसिनामध्ये होते व सर्व मांसाहारी मायोसिनापर्यंत अवतरले होते. मध्य तृतीय कल्पात मांसाहारींची एक शाखा जलचर बनून तिच्यापासून सील व जलसिंह आले. कीटकभक्षी गणात या काळात विशेष बदल झाला नाही. जरायुज, मांसाहारी व खुरी प्राण्यामध्ये ईओसीन काळात ठळक व वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले. विषमखुरी (ज्यांच्या खुरांची संख्या विषम असते असे) शाकाहारी (पेरिसोडॅक्टिला, उदा., इओहिप्पस हा आद्य घोडा, ऱ्हिनोसेरॉस) तसेच उंट, हरीण, डुक्कर यांचे पूर्वज गणले गेलेले समखुरी प्राणी (आर्टिओडॅक्टिल) हेही इओसिनामध्ये अवतरले. या कल्पात मांसाहारी वाढले आणि त्यांनी शाकाहारींवर मात केली. मार्जारकुलातील प्राणी या कल्पात लहानखुरे होते. तसेच कुत्रा व मांजर हे मायोसिनाअखेर अवतरले आणि तरसासारखे प्राणीही तेव्हा होते व ते सर्व शाकाहारींवर जगत. गँफोथेरियम हे हत्तीचे पूर्वज उत्तर इओसिनामध्ये अवतरले व एकखुरी घोडाही याच कल्पात अवतरला. ऱ्हिनोसेरॉसांची संख्या घटली आणी मॅस्टॅडॉनांपेक्षा स्टेगोडॉनांची संख्या अधिक होती. बलुचिथेरियम निर्वंश झाले व डायनोथेरियम अवतरले. शिवाथेरियम आणि सामोथेरियामासारख्या आखूड मानेच्या जिराफांपासून उंच मानेचे जिराफ आले व त्यांचा जलद विकास झाला. असिदंत (खंजिराच्या आकाराचे दात असलेल्या) वाघांचा विकासही जलदपणे झाला. पूर्व प्लायोसिनामध्ये हिप्पेरिऑन व मेरिकोपोटॅमस आढळले असून म्हशीही या काळात होत्या. काहींच्या मते या कल्पाअखेर जवळजवळ मानवासारखे व हत्यारे वापरू शकणारे प्राणी अवतरले असावेत.


इतर पृष्ठवंशी : या कल्पात पक्ष्यांमध्ये वेळोवेळी स्पष्ट बदल झाल्याचे आढळते व पंखहीन राक्षसी पक्षीही तेव्हा होते. शार्क सामान्य होते व अस्थिमत्स्यांचा प्रसारही या काळात झाला. मध्य मायोसीन ते पूर्व प्लायोसीन या काळात विविध आकारांचे अस्थिमत्स्य होते. सॅलॅमँडर, भेक, बेडुक इ. उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणारे प्राणी) त्या काळी होते. सरीसृप फार घटले व जे जगले (उदा., पादहीन सर्प, ॲलिगेटर, कूर्म इ.) त्यांच्यात विशेष बदल झाला नाही. मगर व कूर्म नद्या–सरोवरांतून आताप्रमाणे सामान्य होते. जमिनीवरील कूर्मांचे आकारमान वाढले, तरी ॲलिगेटरांची संख्या वाढली.

सहसंबंध : फोरॅमिनीफेरा, कोकोलिथ, डिस्कोॲस्टर इ. जीवांचा या कल्पात जलदपणे क्रमविकास आणि विस्तृत प्रसार झाल्याने त्यांचे जीवाश्म या काळातील खडकांचे सहसंबंध (निरनिराळ्या ठिकाणच्या एकाच काळातील थरांमधील संगती) ठरविण्यास उपयुक्त ठरले असून त्यांच्या साहाय्याने या कल्पातील जगभरच्या शैलसमूहांचे चांगल्या प्रकारे विभाग पाडता येतात. फोरॅमिनीफेरांचे जीवाश्म खनिज तेलयुक्त खडकांचे सहसंबंध निश्चित करताना विशेष उपयुक्त ठरले आहेत.

जीवाश्मांशिवाय पुढील दोन पद्धतींनीही या संघातील खडकांचे सहसंबंध ठरविले जातात. भूतकाळात पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत अनेकदा उलटापालट झालेली असून ही उलटापालट त्या त्या काळच्या खडकांमध्ये चुंबकीय दिक्‌स्थितीच्या रुपाने टिकून राहिलेली आहे [→ पुराचुंबकत्व]. अशा बदलांची एक मालिका तयार करण्यात आली असून ती या संघातील खडकांचे सहसंबंध ठरविण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच पोटॅशियम (४०)–आर्‌गॉन (४०) या किरणोत्सर्गी कालमापन पद्धतीने [→ खडकांचे वय] या कल्पातील खडकांचे निरपेक्ष वय निश्चित करतात व त्यावरून त्यांचे सहसंबंध ठरविणे सोयीचे झाले आहे.

आर्थिक महत्त्व : खनिज तेल, दगडी कोळसा (विशेषतः लिग्नाइट), फॉस्फेट, बांधकामाचे दगड इ. उपयुक्त पदार्थ या काळातील खडकांमधून मिळतात. जगातील निम्म्याहून जास्त खनिज तेल याच खडकांत आढळते. यांशिवाय चांदी, सोने, तांबे, शिसे, जस्त व पारा यांचे काही धातुक निक्षेप (कच्च्या धातूंचे साठे) या काळातील आहेत.

भारतीय माहिती : भारतात क्रिटेशसनंतर विसंगती आढळत नसली, तरी जीवाश्म व इतर लक्षणे इतकी स्पष्ट आहेत की, मध्यजीव महाकल्प (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वींचा काळ) संपल्याचे लक्षात येते. भारताचे मध्यजीव कल्पातील भूस्वरूप तृतीय कल्पात पूर्णपणे बदलून गेल्याने भारताच्या बाबतीत तृतीय कल्पाचे भौगोलिक महत्त्व विशेष आहे. याच काळात भारतीय उपखंडाच्या आताच्या सीमा (म्हणजे हिमालय, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर) निश्चित झाल्या. हिमालयाची निर्मिती ही सर्वांत महत्त्वाची घटना असून त्याच्या उत्थानाच्या (वर उचलल्या जाण्याच्या) अवस्थांनुसारच भारतातील तृतीय कल्पातील निक्षेपांची विभागणी केली जाते. पॅलिओसीन ते इओसीन व मध्य मायोसिनामध्ये भारताच्या किनारी प्रदेशात सागराचे अतिक्रमण झाले होते. तसेच दक्षिण ट्रॅपचा काही भाग या कल्पाच्या आरंभी तयार झाला असून ग्रॅनाइटाची मोठी अंतर्वेशनेही या काळात झालेली आढळतात.

विस्तार : भारतामध्ये तृतीय कल्पातील निक्षेप मोठ्या क्षेत्रात आढळतात. या निक्षेपांपैकी आधीचे सागरात तयार झालेले, तर नंतरचे निक्षेप गोड्या पाण्यातील वा महाद्वीपीय प्रकारचे आहेत. सामान्यतः इओसीन काळातील निक्षेप सागरी, तर प्लायोसीन कालीन नादेय (नदीने तयार झालेले) वा भूपृष्ठावर तयार झालेले आहेत. या निक्षेपांत मुख्यत्वे पॅलिओसीन व इओसीन काळातील न्युम्युलिटिक चुनखडक असून बऱ्याचदा ते लिग्नाइटयुक्त असतात. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या टेकड्यांत म्हणजे जम्मू–काश्मीर, लडाख, पंजाब, कुमाऊँ व सिमला भाग, प. बंगाल व आसाम या भागांत प. राजस्थान (बिकानेर, जैसलमीर, जोधपूर) कच्छ, सौराष्ट्र व गुजरातचा किनारी भाग (द्वारका थर, भावनगरजवळील थर, सुरत, भडोचजवळील निक्षेप) पूर्व व पश्चिम किनारा (ओरिसा, क्विलॉन, त्रावणकोर, वरकल्ली, कडलोर, राजमहेंद्री, रत्नागिरीजवळ) वगैरे ठिकाणी तृतीय संघाचे खडक आढळतात. हिमालय भागात ऑलिगोसीन कालीन खडक आढळत नाहीत. ⇨ शिवालिक संघाचे खडक याच कल्पातील असून ते मुरी, घरमशाला, दागशाई, कसौली इ. भागांत आढळतात.

जीव : भारतात मध्यजीव महाकल्पातील जीव तृतीय कल्पात हळूहळू नष्ट झाले व नवीन जीव आले. उदा., ॲमोनॉइडिया व बेलेम्निटिडी गटांतील प्राण्यांचा ऱ्हास झाला व मध्यजीवातील सरीसृप निर्वंश झाले. पृष्ठवंशींमध्ये सस्तन तर अपृष्ठवंशीत फोरॅमिनीफेरा (विशेषतः न्युम्युलाइट) प्रमुख प्राणी होते. मध्यजीव महाकल्पातील काही वनस्पतीही निर्वंश झाल्या व सपुष्प वनस्पती प्रमुख वनस्पती झाल्या. भारतामधील तृतीय कल्पाच्या जीवाश्मांसाठी शिवालिक संघ विशेष प्रसिद्ध आहे.


भारतातील तृतीय कल्पाचे निक्षेप

काळ 

हिमालयीन भाग 

आसाम 

किनारी प्रदेश 

इतर प्रदेश 

प्लायोसीन 

उत्तर शिवालीक 

 

कडलोर 

 

उत्तर मायोसीन 

मध्य शिवालिक 

डुपी टिला 

वरकल्ली 

 

मध्य मायोसीन 

पूर्व शिवालिक 

टिपम माला (काहीशी सागरी) 

क्विलॉन 

 

हिमालयाच्या उत्थानाची दुसरी अवस्था 

पूर्व मायोसीन

मुरी कसौली  

(मचूळ पाण्यातील) दागशाई

सुमा

बारीपाडा

(ओरिसा)

कच्छातील गज माला 

ऑलिगोसीन

 

बरैल

   

हिमालयाच्या उत्थनाची पहिली अवस्था

इओसीन

किरथार, सुबाथू लाकी

जैंतिया व दिवसांग

पाँडिचेरीचे इओसीन निक्षेप

किरथार (गुजरात), लाकी (प. राजस्थान)

पॅलिओसीन

राणीकोट

   

दक्षिण ट्रॅप

(पॅलिओसीन ते ऑलिगोसीन या काळातील निक्षेपांना न्युम्युलिटिक्स म्हणतात)

 या संघाच्या खडकांमध्ये हत्ती, घोडे, जिराफ, डुक्कर, हरिण, उंट, वाघ, गो–कुलातील प्राणी, कपी इत्यादींच्या पूर्वजांचे जीवाश्म आढळतात. या संघातील काही जीवाश्म पुढीलप्रमाणे आहेत : इओसीन कालीन न्युम्युलाइट व पेरिम बेटावर डुक्कर, बकरे, डायनोथेरियम. ऱ्हिनोसेरॉस, मॅस्टॅडॉन यांचे जीवाश्म आढळतात. कच्छात मायोसीन ते प्लायोसीन काळातील मृदुकाय प्राणी, प्रवाळ व एकायनोडर्म तर राजस्थानात इओसीन काळातील फोरॅमिनिफेरा आणि मलबार किनाऱ्यावर मृदुकाय प्राणी, फोरॅमिनिफेरा, प्रवाळ व शंखधारी प्राण्यांचे जीवाश्म आढळले आहेत. बुग्टी भागामध्ये गोड्या पाण्यात राहणारे वैशिष्ट्यपूर्ण सस्तन प्राणी अवतरले होते. बलुचिथेरियम नावाच्या निरूपद्रवी राक्षसी ऱ्हिनोसेरॉस हा जमिनीवरील सर्वांत मोठा (लांबी १० मी. व उंची ३·५ मी.) व प्रमुख प्राणी या कल्पातील होय.

आर्थिक महत्त्व : भारतातील खनिज तेलाचे बहुतेक सर्व क्षेत्र (गुजरात व आसाम) या कल्पातील निक्षेपांत आढळते. या काळातील लिग्नाइट, आसाम, जम्मू, तमिळनाडू (नेव्हेली) व राजस्थान आढळतो. खासी व जैंतिया टेकड्या आणि पतियाळा भागातील तृतीय कालीन चुनखडक बांधकामास उपयुक्त आहे. या काळातील वालुकाश्म बांधकामाला उपयुक्त नसले तरी वालुकामय, पिंडाश्म व शेल या खडकांमध्ये भूमिजल चांगल्या प्रकारे साचून राहत असल्याने ते त्या दृष्टीने उपयुक्त आहेत. उदा., गोदावरी जिल्हा (आंध्र प्रदेश), कडलोर–पाँडिचेरी दरम्यानचा किनारी प्रदेश (तमिळनाडू) व केरळचा वर्कलई किनारा या भागांत तृतीय कल्पातील खडकांमध्ये साचलेले पाणी आर्टेशियन विहिरी खोदण्यास उपयुक्त आहे. राजस्थानातील जिप्सम व इतरत्र आढळणारे ॲल्युमिनियम मिळविण्यासाठी उपयुक्त असलेले पुष्कळसे बॉक्साइट हे खनिज या कल्पातील आहेत.

पहा : चतुर्थ कल्प नवजीव.

संदर्भ : 1. Krishnan, M. S. Geology of India and Burma, Madras, 1960.

   2. Stokes, W. L. Essentials of Earth History, Englewood Cliffs, N. J., 1960.

ठाकूर, अ. ना.