मनशिळाचा स्फटिक

मनशीळ : (रीएल्गार, रेड ऑर्पिमेंट, रूबी सल्फेट). खनिज. स्फटिक एकनताक्ष; आखूड, प्रचिनाकार व पृष्ठावर उभ्या रेखा असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. हे पुष्कळदा भरड ते सूक्ष्मकणी वा पुटांच्या व कधीकधी चूर्णाच्या रूपात आढळते. ⇨ पाटन : (010) चांगले. ठिसूळ व छेद्य (कापता येण्यासारखे). भंजन शंखाभ ते खडबडीत. मऊ; कठिनता १.५–२. वि. गु. ३.४–३.६. रंग चकचकीत तांबडा; हवा-प्रकाशात उघडे पडल्याने नारिंगी पिवळे होते. कस नारिंगी तांबडा. चमक रेझिनासारखी [⟶ खनिजविज्ञान]. दुधी काचेसारखे पारभासी ते पारदर्शक. रा. स. AsS. हे सहज वितळते व बंद नळीत तापविल्यास यातून सल्फर डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडतो. हे नायट्रिक अम्ल व पोटॅशियम हायड्रॉक्साइडात विरघळते. स्फटिक दीर्घकाळ उघडे पडल्यास त्याचे चूर्ण होते; तर प्रकाशात उघडे पडल्यास ⇨ ऑक्सिडीभवनाने मनशिळापासून हरताळ हे खनिज बनते. मनशीळ कमी प्रमाणात आढळते; ते शिसे, चांदी व सोने यांच्या धातुकांच्या (कच्च्या रूपातील धातूच्या) शिरांमध्ये हरताळाच्या जोडीने आढळते. ⇨ स्टिब्नाइटासारखी आर्सेनिकाची खनिजेही याच्याबरोबर आढळतात. ज्वालामुखी असलेल्या भागात संप्लवनाने (मधल्या द्रव अवस्थेतून न जाता घन पदार्थाचे सरळ वाफेत वा उलट रूपांतर होण्याच्या क्रियेने) याची पुटे बनतात. गरम झऱ्यांच्या पाण्यातून बाहेर पडूनही हे साचलेले आढळते (उदा., यलोस्टोन नॅशनल पार्क, अमेरिका). आर्सेनिकाची धातुके भाजावयाच्या भट्ट्यांतही हे साचलेले आढळते.

स्वित्झर्लंड, मॅसिडोनिया व ट्रान्सिल्व्हेनिया येथे याचे चांगले स्फटिक आढळतात. हंगेरी, जर्मनी, अमेरिका, इराण, जपान, चीन, ब्रम्हदेश, झेकोस्लोव्हाकिया, रूमानिया इ. प्रदेशांत हे आढळते. भारतात कुमाउँत मनशीळ थोड्यात प्रमाणात आढळले आहे.

मनशीळ प्राचीन काळापासून माहीत असून रंगद्रव्ये म्हणून ते वापरीत. भारतात ते रसवैद्यकात एक उपरस म्हणून व चीनमध्ये शोभिवंत वस्तूंसाठी वापरीत. हल्ली आर्सेनिकाचे धातुक म्हणून तसेच आतषबाजी, कॅलिको छपाई, कातडी कमाविणे इत्यादींमध्ये याचा वापर होतो. खाणीतील अथवा गुहेतील चूर्ण या अर्थाच्या अरबी शब्दावरून याचे इंग्रजी नाव (रीएल्गार) पडले आहे.

पहा : आर्सेनिक; हरताळ.

ठाकूर, अ. ना.