मध्यजीव : पृथ्वीच्या इतिहासातील २३ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडास मध्यजीव महाकल्प व या कालावधीत निर्माण झालेल्या खडकांच्या गटाला मध्यजीव गण म्हणतात. अलीकडील संशोधनावरून मध्यजीव महाकल्पाची अखेर सु. ६.५ कोटी वर्षापूर्वी झाली. असे मानतात. या महकल्पात ट्रायसिक ⇨सु. २३ ते २० कोटी वर्षापूर्वीचा काळ ) व क्रिटेशस ⇨सु. १४ कोटी ते ९कोटी वर्षापूर्वीचा काळ) या कल्पांचा समावेश होतो. १८४१ मध्ये ग्रेट ब्रिटनमधील जीवाश्मांच्या ⇨जीवांच्या शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अभ्यासावरून या काळातीत जीवसृष्टी नवजीव ⇨गेल्या सु. ६.५ कोटी वर्षाच्या) व पुराजीव ⇨सु . ६०ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडातील जीवसृष्टीहून भिन्नता स्वरूपाची होती, असे दिसून आले म्हणून नवजीव व पुराजीव यांच्यामधील .या  कालखंडास मध्यजीव ही संज्ञा देण्यात आली.

शैलसमूह : जगातील प्रत्येक खंडात मध्यजीव कालीन शैलसमूह ⇨खडक) आहेत. या कालखंडाच्या मध्य व उत्तर भागात पृथ्वीच्या बहुतांश प्रदेशावर सागराचे आक्रमण झाल्यामुळे सागरी खडक मोठ्या प्रमाणावर आढळतात. मध्यजीव महाकल्पात पृथ्वीवर लॉरेझा ⇨लॉरेशिया) व गोंडवन या नावची  दोन महाखंडे होती. सध्याची उत्तर अमेरिका, यूरोप व आशिया ही खंडे मिळून लॉरेझा महाखंड बनले होते. तर⇨गोंडवनभूमीत भारताचे द्विपकल्प, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टीका, इ. खंडाचा समावेश होता. या दोन महाखंडांमध्ये टेथिस नावाचा समुद्र होता. या समुद्राने सध्याचा अटलांटिक महासागर, भूमध्यसमुद्र, मध्यपूर्व प्रदेश, इंडोनेशिया, न्यूझीलंड इ. भाग व्यापला होता. या काळात पॅसिफीक महासागराच्या किनारपट्टीलगतच्या⇨मूद्रोणीत सागरी अवसाद ⇨गाळ) निक्षेपित झाले ⇨साचले) यानंतरच्या कालावधीत अटलांटिक महासागर व हिंदी महासागर याचे तळ पसरल्यामुळे जगातील खंडांमध्ये बदल झाले. स्थिर अशा ढालक्षेत्रात ⇨मुख्यत्वे कँब्रियन –पूर्व म्हणजे ६० कोटी वर्षापूर्वीच्या खडकांते बनलेल्या प्रदेशात) खंडीय अथवा उथळ सागरी अवसाद निक्षेपित झाले. पॅसिफिक महासागराच्या सभोवती आणि टेथिस समुद्रात अवसाद निक्षेपित झाले. मध्यजीव खडकांच्या खाली असणार्‍या पुराजीव खडकांचे स्वरूप पर्मोकार्बानिफेरस गिरिजननाच्या ⇨सु. ३५ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या पर्वतनिर्मितीच्या) काळात बदलून गेले.

ट्रायसिक खडक : हे मुख्यत्वे टेथिस समुद्र व पॅसिफिक महासागराच्या लगतच्या प्रदेशात आढळतात. ते अल्प प्रमाणात आर्क्टिक विभागातील किनारपट्टीतही आढळतात. सर्वोत्तम ट्रायसिक सागरी खडक भूमध्य समुद्रासभोवती आढळतात. यांत चुनखडक व डोलोमाइट खडकांचा समावेश होतो. उत्तर ट्रायसिक ⇨सु. २० ते १८.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) खडक अल्प प्रमाणात लाल वालुकामश्म आहेत. चुनखडकांत ज्यांची जाडी जास्त आहे असे प्रवाळ चुनखडक आणि शैलवीय चुनखडक यांचा समावेश होतो. कित्येकदा स्ट्रोमॅटोलाइट या प्राण्यांचे अवशेष असलेले चुनखडक आढळतात. पॅसिफीक महासागराच्या किनापरट्टीच्या प्रदेशातील सागरी खडक मुख्यत्वे  दलिक ⇨आधीच्या खडाकांच्या तुकड्यांपासून बनलेले)  व ज्वालामुखीतून बाहेर फेकल्या गेलेल्या राखेचे थर आहेत. ट्रायसिक कालीन खंडीय ⇨जमिनीवरील) खडकांनी विस्तीर्ण प्रदेश व्यापले आहेत. यात तांवडे पंकाश्म, मार्ल व वालुकाश्म यांचा समावेश होतो. पिंडाश्म व लवणी निक्षेप अल्प प्रमाणात आढळतात. लवणी निक्षेपांत जिप्सम, अनहायड्राइड व हॅलाइट असतात. राखी रंगाचे ट्रायसिक खडक मध्य आशिया, दक्षिण अपालॅचिअन पर्वत आणि ऑस्ट्रोलिया येथे सापडतात. [⟶ट्रायासिक].

जुरासिक खडक : हे ट्रायसिक खडकांवर निक्षेपित झालेले आहेत. हे मुख्यत्वे सागरी आहेत. दक्षिण यूरोपातील टेथिस भागात जुरासिक चुनखडक व डोलोमाइट सापडतात. पूर्व जुरासिक ⇨सु. १८.५ ते १७ कोटी वर्षापूर्वीच्या ) काळात उथळ सागरी स्ट्रोमॅटोलाइट व प्रवाळभित्ती प्रकारच्या चुनखडाकाचे प्रमाण जास्त आहे, याउलट उत्तर जुरासिक काळातील खडक खोल सागरी, सूक्ष्मकणी, तलप्लावी ⇨खोल पाण्यात साचलेले) चुनखडक असतात. यात लोह आणि मँगॅनीज ऑक्साइडांचा थर असलेले लाल रंगाचे ग्रंथिल ⇨गाठींनी युक्त) चुनखडक व स्तरित ⇨थर असलेले) चर्ट महत्वपूर्व आहेत. उत्तर यूरोपातील सागरी स्तर ट्रायसिकअखेरच्या ⇨रीटिक) काळातील पंकाश्म, गाळवटी खडक व वालुकाश्म यांचे बनलेले आहेत. यांवर पंकाश्म, गाळवटी खडक खडक व वालुकाश्म इत्यादींनी बनलेले खंडीय दलिक अवसादांनी युक्त सागरी खडक निक्षेपित झाले आहेत. सर्वसामान्यतः उत्तरेकडील अवसादांमध्ये खंडीय दलिक अवसादांचे प्रमाण रासायनिक व जैव प्रक्रियांनी अवक्षेपित ⇨रासायनिक विक्रियेत बनलेल्या आणि न विरघळणार्‍या साक्याच्या रूपात साचून तयार) झालेल्या खडकांपेक्षा जास्त असते. यानंतर जुरासिक कालखंडात अवसादन पध्दतीमध्ये बदल झाले. सागरी अवसादनाचे ⇨गाळ साचण्याच्या क्रियेचे) प्रदेश वाढले. चुनखडकांचे अवसादन क्षेत्रही वाढले. तथापि जुरासिक कल्पाच्या शेवटी खाजण अवसांदांचे ⇨कॅल्शियम सल्फेट अवसादनाचे) क्षेत्र वाढले व शेवटी खंडीय अवसाद मोठ्या प्रमाणावर निक्षेपित झाले. जुरासिक कालखंडातील उत्तर अमेरिकेतील अवसाद उपरिनिर्दिष्ट यूरोप खंडातील अवसादांसारखेच आहेत. मेक्सिकोचे आखात, न्यू मेक्सिको इ. दक्षिणेकडील भागात चुनखडकांचे  प्रमाण जास्त आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्यभागांतील जुरासिक अवसाद सागरी आहेत. या भागातील पूर्व जुरासिक आणि उत्तर जुरासिक ⇨१५.५ ते १४ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) अवसाद दलिक खडक आहेत. पश्चिमेकडील कॉर्डिलेरा भागात जास्त जाडी असलेले खंडीय दलिक अवसाद आढळतात. यांत मुख्येत्वे ज्वालामुखीजन्य अवसादी खडकांचा समावेश होतो. हे खडक अस्थिर भूद्रोणी  पट्ट्यात निर्माण झाले. अशा प्रकारचे अवसादन अलास्का ते अँडीज पर्वत रांग, जपान, न्यूझीलंड आणि पॅसिफिक किनारपट्टीच्या इतर भागात आढळते. आरकॅन्सॉ आणि लुझझिअना या राज्यांत छिद्रणकाम करताना जुरासिक खडकांमध्ये स्तरित लवणी निक्षेप आढळले आहेत. आशिया खंडातील जुरासिक खडकांत कोळसा आणि खंडीय दलिक अवसाद मोठ्याप्रमाणावर आढळतात. टेथिस समुद्राच्या किनारपट्टीच्या भागात सागरी अवसादांचे प्रमाण जास्त आहे. उत्तर जुरासिक काळातील सागरी चुनखडकांनी प्रचंड क्षेत्र व्यापले आहे. या काळातील खडकांमध्ये दक्षिण रशिया व मध्यपूर्वेकडील भागात महत्वाचे लवणी निक्षेप सापडले आहेत. दक्षिण गोलार्धातील जुरासिक अवसाद मुख्यत्वे खंडीय आहेत. तथापि आफ्रिकेच्या पूर्व किनापट्टीत, पश्चिम मॅलॅगॅसी व पश्चिम ऑस्ट्रेलिया या प्रदेशात सागरी चुनखडक व दलिक खडक आढळतात. [⟶जुरासिक].

क्रिटेशस खडक : क्रिटेशस काळाच्या सुरूवातीचे अवसादन जुसासिक अवसादनासारखेच होते. या काळात भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशात उथळ पाण्यातील भित्तीयुक्त व खोल पाण्यातील तलप्लावी चुनखडक निर्माण झाले. उत्तर स्पेन, दक्षिण इंग्लंड, उत्तर फ्रान्स व जर्मनी या भागांत क्रिटेशन कालीन असागरी वालुकाश्म व पंकाश्म मोठ्या प्रमाणावर आढळतात. मध्य आशिया खंडामध्ये जुरासिक खडक मोठ्या प्रमाणावर आढळतात. याशिवाय आफ्रिका ,दक्षिण  अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंडांत पूर्व क्रिटेशस ⇨सु. १४ ते १२ कोटी वर्षापूर्वीच्या)  व उत्तर जुरासिक कालीन खडक आढळतात.


मध्य क्रिटेशन ⇨सु. १२ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडात अनेक भाग समुद्राने व्यापले. उदा. उत्तर यूरोप, उत्तर अमेरिकेचा पश्चिम भाग, पश्चिम आफ्रिकेची किनारपट्टी, ब्राझील आणि दक्षिण  ऑस्ट्रेलिया. ग्लॉकोनाइटयुक्त हिरव्या रंगाचा वालुकाश्म व पंकाश्म हे या कालखंडातील वैशिष्ट्येपूर्ण खडक आहेत. पश्चिम टेथिस भागातील प्रमुख खडक चुनखडक असून पॅसिफिक महासागराभोवतालच्या किनारपट्टीच्या भागात दलिक अवसाद आढळतात. उत्तर क्रिटेशस कालीन सागरी अवसाद इतर मध्यजीव खडकांतून जास्त प्रदेश व्यापतात. उदा. उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका खंडातील पश्चिमेकडील अंतर्भाग उत्तर यूरोप आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांच्या दक्षिण व मध्य भागांत आढळणारा चॉक हा वैशिष्टपूर्ण खडक आहे. भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशातील क्रिटेशस खडकांत फॉस्फोराइट खनिजांचे निक्षेप विपुल प्रमाणात आढळतात. उत्तर गोलार्धातील क्रिटेशस खडकात माँटमोरिलोनाइट हे मृद खनिज आढळते. दक्षिण यूरोपातील आल्प्स पर्वताच्या घड्या पडलेल्या भागातील उत्तर क्रिटेशस खडकांत ðफ्लिश अवसादांचे प्रमाण जास्त आहे. 

क्रिटेशस काळाच्या शेवटी पृथ्वीवरील अनेक नवीन भूप्रदेश निर्माण झाले. समुद्राने व्यापलेल्या भागांतून समुद्र मागे सरले  व अशा भागात खंडीय अवसाद निक्षेपित झाले. तथापि डेन्मार्क, पिरेनीज पर्वत इ. भागात क्रिटेशस ते नवजीव महाकल्पाच्या सुरूवातीस असलेल्या पॅलिओसीन ⇨सु. ६.५ ते ५.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडापर्यंत सागरी अवसादन अखंडपणे झालेले आढळते. [⟶क्रिटेशस].

जीवसृष्टी : प्राणी : मध्यजीव महाकल्पात पृथ्वीवरील प्राण्यांत पृष्ठवंशी ⇨पाठीचा कणा असणारे) प्राणी प्रामुख्याने होते. या महाकल्पातील प्राण्यांमध्ये अनेक बदल झाले. ट्रायासिक कालखंडात लॅबॅरिंथोडोंट नावाचे सुस्त उभयचर ⇨जमिनीवर व पाण्यातही राहाणारे) प्राणी सर्वत्र होते. ट्रायसिक कालाच्या शेवटी ते अचानक निर्वश झाले. याच सुमारास बेडकांचे प्रमाण वाढले. त्यांचा विकास होत गेला. याच प्रकारचा सर्वात जुना सॅलॅमँडर प्राणी क्रिटेशस कालात सापडत असे.

उभयचर प्राण्यांच्या र्‍हास झाला. पुराजीवातील उत्तर कारबॉनिफेरस ते पर्मियन ⇨सु. ३१ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) काळात कॉटिलोसॉर प्राण्यांचा विकास झाला. कॉटिलोसॉर प्राण्यांतूनच पुढे सरीसृप ⇨सरपटणारे) प्राणी निर्माण झाले. पर्मियन ⇨सु. २७ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) काळातच कासवे. प्लेसिओसॉर, इक्थिओसॉर इ.सागरी प्राणी, सस्तन प्राण्यांसारखे थिओडोंट आदि प्राणी अवतरले . थिओडीट ट्रायासिक कालखंडातच सापडतात. या थिओडोटापासूनच पुढे टेरोसॉर ,पक्षी, डायनोसॉर  इ. भिन्न प्राणी निर्माण झाले [⟶ टेरोडॅक्टिल, डायनोसॉर]. डायनोसॉर उत्तर ट्रायासिक काळात निर्माण झाले. मध्यजीव काळास डायनोसॉरांचे युग असे म्हणतात. जुरासिक काळात डायनोसॉर प्राणी अवाढव्य बनले. क्रिटेशस काळात पृथ्वीवर प्रायः विपूल असणारे डायनोसॉर प्राणी क्रिटेशसनंतर अचानक निर्वेश कसे झाले, हे पुराजीवविज्ञानातील गूढच आहे.

डायनोसॉरशिवाय मध्यजीव काळात अनेक सरपटणारे प्राणी होते. हे प्राणी ही मध्यजीव महाकल्प संपताच निर्वश झाले. यात पक्ष्यांसारखा टेरोसॉर प्राणी होता. जुरासिक काळात⇨आर्किऑप्टेरिक्स पक्षी होता. याचे शरीर सरीसृपासारखे होते. मध्यजीवातील काही सरीसृपांनी समुद्रामध्य राहण्यात प्रावीण्य मिळवले होते. उदा. नोथोसॉर ⇨ट्रायासिक), प्लॅकोडोंट ⇨ट्रायासिक) ,इक्सिओसॉर ⇨ट्रायासिक ते क्रिटेशस) ,प्लॅसिओसॉर ⇨जुरासिक ते क्रिटेशस) इत्यादी.

मध्यजीवातील अनेक सस्तन प्राणी निर्वेश झाले. हे आकारमानाने लहान होते. उत्तर ट्रायसिक काळात ट्रायकोनोडोंट डोकोडोंट सिमेट्रोडोंट इ. सस्तन प्राणी होते. मध्यजीवातील सागरी पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये अनेक महत्वाच्या माशांचा समावेश होतो.

मध्यजीवातील सागरी अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणारे) प्राणी स्तरवैज्ञानिक दृष्ट्या पृष्ठवंशी प्राण्यांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. या महाकल्पात अपृष्ठीवंशी प्राण्यांमध्ये क्रमवार अनेक बदल होत गेले. अँमोनाइट [अँमोनॉइडिया] नावाचे सेफॅलोपॉड या प्राण्यांमध्ये सर्वात महत्वाचे आहेत. मध्यजीवाच्या शेवटी डायनोसॉरांप्रमाणे अँमोनाइट पण निर्वश झाले. पुराजीवाच्या अंती अनेक अपृष्ठवंशी प्राणी नामशेष झाले. या संकटातून वाचलेल्या एक कुलातूनच ट्रायसिक काळात अँमोनाइटांच्या अनेक प्रगत जाती विकसित झाल्या.मध्यजीव कालास अँमोनाइटांचे युग असेही म्हणतात. ट्रायसिक काळाच्या शेवटी असाच विनाशकाल आला. याही संकटातून वाचलेल्या जातीमधून जुरासिक काळात अनेक नवीन जाती निर्माण झाल्या. क्रिटेशस काळातील अँमोनाइटांचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहेत. अँमोनाइट मध्यजीवांच्या शेवटी कशा प्रकारे व का निर्वश झाले, हे डायनोसॉर निर्वशीकरणाइतकेच गूढ आहे. बेलेग्नाइट नावाचे सेफॅलोपॉड प्राणीही ध्यजीवाच्या शेवटी नामशेष झाले. 

मध्यजीव अपृष्ठवंशी मृदूकाय प्राण्यांमध्ये (मॉलस्कांमध्ये) बायव्हाल्व्हिया (शिपांधारी) आणि गॅस्ट्रोपॉड (शंखाधारी) या प्राण्यांचा समावेश होतो. ट्रायासिकनंतरच्या कालखंडात बायव्हाल्व्ह प्राणी पृथ्वीतलावर बहुसंख्येने वावरत. हे प्राणी समुद्राच्या तळाशी असणार्याट गाळात राहत. उदा. ग्रीफीया , स्पाँडीलस, ट्रायगोनिया इत्यादी. उत्तर क्रिटेशस काळात गॅस्ट्रोपॉडांच्या अनेक जाती निर्माण झाल्या. 


एकायनोडर्म प्राण्यांत क्रिनाइड व एकिनॉइड यांचा समावेश होतो. यापैकी क्रिनॉइड उथळ पाण्यात राहत. कालपरत्वे यातूनच स्वतंत्ररीत्या राहणार्याम एकायनोडर्मच्या जाती निर्माण झाल्या. पुराजीवाच्या मानाने मध्यजीवात ब्रॅकिओपॉड कमी होते. व्हिंकोनेलिडा व टेरब्रॅट्युलिडा हे महत्वाचे गट होत. मोठ्या आकारमानाच्या ऑथ्रोपोटापैकी अनेक प्रकारचे कवचधारी प्राणी गटाने राहत .टेथिस समुद्रामध्ये प्रवाळांचे अनेक समूह होते.या कळातील कॅल्शियम व सिलिकायुक्त स्पंजांचे अनेक जावाश्म सापडले आहेत.

अपृष्ठवंशी सूक्ष्मजीवांमध्ये फोरॅमिनीफेरा ,रेडिओलॅरिया व ऑस्ट्रेकॉडा यांचा समावेश होतो. हे प्राणी मध्यजीव खडकाचे सहसंबंध (दूर वरच्या ठीकाणी आढळणार्या् समकालीन खडकांतील परस्परसंबंध)प्रस्थापित करण्यामध्ये उपयुक्त ठरतात. अशा प्रकारचा अभ्यास खनिज तेलाचे साठे शोधून  काढण्याच्या कामी करावा लागतो. तलस्थ फोरॅमिनीफेरांचे नोडोसारीड नावाचे कुल मध्यजीव काळामध्ये विपुल प्रमाणात होते. ग्लॉबिजेरिना नावाच्या फोरॅमिनीफेरांचा उदय उत्तर जुरासिक काळात व उत्कर्ष क्रिटेशस काळात झाला. 

मध्यजीवातील अपृष्ठवंशी प्राणी तलाब नद्या इ. खंडीय पर्यावरणातही राहत. उदा. बायव्हाल्व्ह ,गॅस्ट्रोपॅाड ,ऑस्ट़़ॅका२२२२२ट्रायसिक काळात नवीन कीटकांची उत्पत्ती झाली. नाकतोडे, माश्या, मुंग्या ,मधमाश्या, व गांधील माश्या इ. प्राणी क्रिटेशसपूर्वीच अवतरले होते.

मध्यजीव काळात काही प्राणी गट अचानकपणे का नामशेष झाले असावेत ,याविषयी महत्वाची माहिती १९७० सालानंतर झालेल्या संशोधनामुळे उपलब्ध झाली आहे. जगातील अनेक भागांतील क्रिटेशस व तृतीय कल्पांच्या सीमारेषेवरील (सु. ६.५कोटी वर्षापूर्वीच्या) खडकांचा बारकाईने अभ्यास केल्यावर वैज्ञानिकांना असे आढळून आली की, या खडकात इरिडियम धातूचे प्रमाण जास्त आहे. ही धातू इतक्या मुबलक प्रमाणात पृथ्वीवरील खडकांत व सूर्यकुलातील इतर ग्रहांमध्येही आढळत नाही. यावरून वैज्ञानिकांनी असे अनुमान काढले की, ही धातू सूर्यकुलाबाहेरच्या वस्तूद्वारे म्हणजे अशनीद्वारे पृथ्वीवर आली असावी .ही क्रिटेशस आणि तृतीय कल्पांच्या सीमारेषेवरील इरिडियम विसंगती सागरी व असागरी अशा दोन्ही प्रकारच्या खडकांत आढळली आहे.

एक किमी. पेक्षा जास्त व्यासाच्या सु. १,००० लघुग्रहासारख्या वस्तू पृथ्वीभोवती भ्रमण करीत असतात. यांपैकी तीन दर दहा लाख वर्षात पृथ्वीवर आदळतात. क्रिटेशसच्या शेवटी जो अशनी पृथ्वीवर आदळला त्याचा व्यास सु. १०किमी. होता असे अनुमान आहे .या आकारमानाचा अशनी पृथ्वीवर चार कोटी वर्षातून एकदा पडतो, असा कयास आहे. १०किमी. व्यासाच्या व सेकंदाला सु. २५किमी. वेग असलेल्या अशनीमध्ये ४/१०३० अर्ग ऊर्जा असते. असा अशनी पृथ्वीवर आदळल्यास अतिप्रचंड ऊर्जा निर्माण होईल. क्रिटेशसच्या शेवटी झालेल्या अशनिपातामुळे त्यातील इरिडियमाचे कण पृथ्वीभोवती सर्वत्र फेकले गेले. त्यांचा प्रचंड दाट व अपारदर्शक ढग तयार झाला व या ढगाने सूर्यप्रकाश अडविला जाऊन सर्वत्र अंधःकार पसरला. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. ही अवस्था सु. सहा महिने टिकली. या काळात पृथ्वीवरील खंडीय व महासागरी प्राण्यांपैकी डायनोसॉर ,अँमोनाइट इ. प्राणी निर्वश झाले. विषुवृत्ताजवळील सागरी प्रदेशात जलपृष्ठाजवळ राहणार्यार शिंपाधारी प्राण्याचे अतोनात नुकसान झाले. वरील क्रिटेशस तृतीय सीमारेषेवरील खढकांच्या पुराचुंबकीय (निर्मितीच्या वेळी खडकांस प्राप्त झालेल्या व नंतर टिकून राहिलेल्या चुंबकत्वाच्या) अभ्यासावरून या सिध्दांतास पुष्टी देणारे काही पुरावे मिळाले आहेत व याचा पडताळा पहाण्यासाठी अनेक देशांत सध्या संशोधन चालू आहे.

वनस्पती : वनस्पतींच्या दृष्टीने विचार करता मध्यजीव वनस्पतीत अबीजी नेच्यांखेरीज सायकँड ,गिंको ,कॉनिफर (शंकुमंत) आदि प्रकटबीज वनस्पती आणि सपुष्प वनस्पती यांचा समावेश होतो . या वनस्पतींपैकी सपुष्प वनस्पती मध्यजीवाच्या शेवटी पृथ्वीवर निर्विवादपणे प्रस्थापित झाल्या होत्या. पुराजीवी महाकल्पाच्या शेवटी आणि ट्रायसिक काळाच्या सुरूवातीस दुर्मिळ असणारी सायकॅड झाडे ट्रायसिक काळाच्या शेवटी  मुबलकपणे होती. शंकुमंत वृक्ष सर्वत्र पसरले होते. अशाच वृक्षांच्या जंगलांची यानंतर अश्मीभूत बने निर्माण झाली .

प्रथमतः उत्तर ट्रायासिक काळात मुबलक असणारी गिंकोची झाडे नंतरच्या काळात अतिशीत आर्क्टिक प्रदेशात फैलावली .पुराजीवात सर्वत्र आढळणारी नेचे व हॉर्सटेल (अश्वपुच्छ) वनश्री मध्यजीवातही आढळते. सपुष्प वनस्पतींचे प्राबल्य हा मध्यजीवातील वनस्पतींच्या क्रमविकासामधील (उत्क्रांतीमधील) महत्वाचा व लक्षवेधक टप्पा मानतात. मध्यजीवी काळास सपुष्प वनस्पतींचे युग असेही कित्येकदा म्हणतात. या वनस्पतींची उत्पत्ती क्रिटेशस काळाच्या आधी झाली असावी .

वनस्पतींचे अवशेष मुख्यत्वे सागरी खडकांमध्ये आढळतात. स्ट्रोमॅटोलाइट चुनखडकातील नागमोडी स्तरण सायनोफायटा नावाच्या शैवलांमुळे निर्माण झाले असावे. टेथिस विभागातील अनेक चुनखडक चुना स्त्रवणार्यान लाल व हिरव्या शैवलांद्वारेच निर्माण झाले. शैवले (उदा. डायाटम) व डायनोफ्ल्जेलेट आदि वनस्पतीही मुबलक होत्या. मध्यजीवाच्या उत्तरार्था विपुल प्रमाणात आढळणारे स्तरिय व ग्रंथिल चर्ट हे सिलिकायुक्त डायाटम व रेडिओलॅरियायांचे सांगाडे आणि सिलिकायुक्त स्पंजाच्या कंटिका (लहान काटे) यांच्यापासून निर्माण झाले आहेत.

स्तरांचे संहसंबंध : मध्यजीव कालखंडात ट्रायसिक, जुरासिक व क्रिटेशस असे तीन कल्प असून प्रत्येक कल्पाचे वर्गीकरण यूरोपातील सागरी अवसादात सापडणार्‍या जीवाश्मांवर आधारलेले आहे. जरी हे वर्गीकरण सर्वसामान्य मान्य असले,तरी कल्पाच्या विभागाच्या काही सीमा जगमान्य नाहीत.

कल्पांचे विभाग स्तरात सापडणार्‍या अँमोनाइटांच्या जीवाश्मांच्या प्रकारांवर आधारलेले आहेत. जेथे अँमोनाइट जीवाश्म विपुल प्रमाणात उपलब्ध नसतात. तेथे इतर प्रकारच्या जीवाश्मांचा उपयोग कल्पाच्या वर्गीकरणासाठी करतात. उदा. बायव्हाल्व्ह ,बेलेग्नाइट, एकिनॉइड आणि क्रिनॉइड ,अलीकडेच क्रिटेशस कल्पाच्या वर्गीकरणासाठी विशिष्ट फोरॅमिनीफेरांचा उपयोग करण्यात आला आहे. स्तरवैज्ञानिक सहसंबंध प्रस्थापित करण्यासाठी खनिज तेल कंपन्या सूक्ष्मजीवाश्मांचा सर्रास उपयोग करतात. असागरी निक्षेपांचे सहसंबंध प्रस्थापित करणे तितकेच सोपे नसते. मध्यजीवातील थरांचे सहसंबंध नक्की करण्यासाठी साधारणतः पृष्ठवंशी जीवाश्म निरूपयोगी असतात. अलीकडील काळात जीवाश्मांतील परागांचा ⇨पुं.केसरावरील कोशात तयार होणार्‍या प्रजोत्पादक सूक्ष्म घटकांचा) उपयोग अशा अभ्यासासाठी यशस्वीपणे करण्यात आला आहे. तथापि त्या योगे अचून सहसंबंध प्रस्थापित करणे नेहमीचे शक्य होईल ,अशी खात्री देता येत नाही.


पृथ्वीवरील घडामोडी : मध्यजीवाच्या सुरूवातीस समुद्राने व्यापलेले प्रदेश मर्यादित होते.  उदा. पूर्व, ग्रीनलंड, कॉकेशस पर्वत, पाकिस्तानातील मिठाचे डोंगर आणि पॅसिफिक महासागराभोवतालचा काही भाग. यानंतर उत्तर ट्रायासिक काळात टेथिस समुद्र व पॅसिफीक महासागर यांच्या भोवतालच्या भागात समुद्राचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाले. मध्यजीवात पृथ्वीवरील प्रमुख खंडांमध्ये विशेष बदल झाले नाहीत. हे भाग खाजगी आणि असागरी अवसादांनी अंशतः व्यापले होते.

जुरासिक काळात पृथ्वीवर सागराचे आक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले. या काळाच्या सुरूवातीस उत्तर व पश्चिम यूरोपमध्ये उथळ समुद्र होते. आफ्रिका खंडात पूर्व आफ्रिका ते टांझनिया आणि मॅलॅगॅसी यांच्यामध्ये सामुद्रधुनी होती. उत्तर सायबीरियामध्येही सागरी आक्रमण विस्तृत प्रमाणावर झाले. मध्य जुरासिक काळात उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील प्रचंड प्रदेश समुद्राखाली बुडाले. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये किनापरट्टीच्या प्रदेशात अनेक आखाते निर्माण झाली. जुरासिक काळ संपण्यापूर्वी पृथ्वीवरील जास्तीत जास्त प्रदेश समुद्राखाली बुडालेले होते. ब्रिटिश बेटे ते पूर्व रशिया, मेक्सिकोच्या आखाताभोवतालचे प्रदेश या सर्व भागांत सागरी आक्रमण झाले. जुरासिक कल्प संपल्यानंतर मात्र उत्तर व पश्चिम यूरोप, उत्तर अमेरिकेचा पश्चिम भाग व ईशान्य सायबीरीया भागांतील समुद्र मागे हटले. ही परिस्थिती पूर्व क्रिटेशस काळापर्यंत होती. यानंतर सागरी आक्रमण पुनःश्च सुरू झाले. मध्य क्रिटेशस कल्पापर्यंत अटलांटिक महासागराच्या दक्षिण किनारपट्टीचे प्रदेश, दक्षिण ऑस्ट्रेलिया, पूर्वभारत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पूर्व भाग समुद्राच्या पाण्याखाली बुडाले. उत्तर क्रिटेशस काळात पृथ्वीवरील सागरी आक्रमणाचा उच्चांक झाला. इतक्या मोठ्या प्रमाणावर सागरी आक्रमण पुराजीव महाकल्पाच्या सुरूवातीस झाले होते. उत्तर अमेरिकेत भूप्रदेशात अनेक महत्वाचे बदल झाले. आर्क्टिक ते मेक्सिकोच्या खाडीपर्यंत पसरलेल्या समुद्राने उत्तर अमेरिका खंडाचे दोन भाग केले होते. याच काळात उत्तर आफ्रिकेमध्ये गिनीचे आखात व भूमध्य समुद्र यांमध्ये सहारामार्ग सागरी आक्रमण झाले. क्रिटेशस काळ संपताच समुद्र ओसरण्यास सुरूवात झाली.

मध्यजीवात पृथ्वीवरील विविध भागांत झालेले सागरी आक्रमण व माघार एकाच वेळी झालेली नाहीत. तथापि तत्कालीन विविध खंडांलगतच्या समुद्राच्या पातळीतील बदल जगभर एकाच काळी झाले असावेत.

मध्यजीवकालीन पुराजीवविज्ञानाच्या विविध पैलूंचा विचार करताना⇨खंडविप्लवही ध्यानात ध्यावयास हवा. खंडे एकमेकांपासून दूर जाण्यास सुरूवात केव्हा झाली याबाबत मतभेद आहेत. खंडीय प्राण्यांची वाडणी, दक्षिण गोलार्धातील खंडाच्या किनारपट्टीवरील सागरी अवसाद, पुराचुंबकत्व आणि महासागरविज्ञान यांच्या अभ्यासावरून उपलब्ध होणार्‍या पुराव्यांच्या आधारे मध्य जुरासिक काळात खंडविप्लवास सुरूवात झाली असावी, यास दुजोरा मिळतो. यात पूर्व मध्यजीव काळात हिंदी महासागर व अटलांटिक महासागर अस्तित्वात नव्हते. असे अभिप्रेत आहे. उत्तर मध्यजीव काळात गिरिजनन व ज्वालामुखीचे उद्रेक पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात झाले. पॅसिफीक महासागराभोवतालच्या किनारपट्टीच्या भूद्रोणीच्या भागात ज्वालामुखींचे उद्रेक संपूर्ण मध्यजीवभर चालूच होते. या भागात दलिक अवसाद व बेसाल्टी लाव्हा आणि अँडेसाइटी लाव्हा यांचे अंतःस्तरण ⇨थरात थर साचण्याची वा घुसण्याची क्रिया झालेली) आढळते. ट्रायसिक काळात मध्य सायबीरिया, उत्तर आफ्रिका आणि उत्तर अँपालॅचियन भागात बेसाल्टी लाव्हाचे उद्रेक झाले. जुरासिक काळात दक्षिण  आफ्रिका पूर्व अंटार्क्टिका ,पूर्व ऑस्ट्रेलिया या भागांत ज्वालमुखी जागृत होते. पश्चिम आफ्रिका ,न्यू इंग्लड व पॅसिफिक किनारपट्टीचा प्रदेश या भागात ग्रॅनाइट खडक निर्माण झाले. दक्षिण ब्राझीलमधील तसेच भारतीय द्वीपकल्पातील बेसाल्टी लाव्हाचे थर म्हणजे ⇨दक्षिण ट्रॅप मुख्यत्वे क्रिटेशस काळातच पसरले . पश्चिम टेथिस भागातील अत्यल्पसिकत ⇨सिलिकेचे प्रमाण अत्यल्प असणारे) खडकही याच काळात निर्माण झाले. तसेच अँडीज पर्वत, उत्तर अमेरिकेतील पश्चिम कॉर्डिलेरा आणि पूर्व आशिया या भागांतील ग्रॅनाइटी ⇨ बॅथोलियेही याच काळात उत्पन्न झाली.

ट्रायसिक व पूर्व जुरासिक काळात पृथ्वीवर महत्वाच्या घडामोडी झाल्या नाहीत. तथापि मध्यजुरासिक काळात स्थिर ढालक्षेत्रात व भूद्रोणीच्या भागांत भूसांरचनिक ⇨कवचातील मोठ्या संरचना निर्माण करणार्‍या) हालचाली झाल्या यात जुरासिक कल्पाच्या शेवटी झालेल्या घडामोडी सर्वात महत्वाच्या आहेत. या घडामोडीतूनच नंतरच्या संपूर्ण काळात पॅसिफीक महासागराच्या किनारपट्टीत व टेथिस भूद्रोणीत तीव्र वलन ⇨बाक येणे) तसेच या भागांतील प्रणोद विभंग ⇨ज्यातील उपरिभित्ती आधारभित्तीच्या सापेक्ष सरकली आहे असे कमी कोनाचे तडे जाणे). रूपांतरण ⇨दाब व तापमान यांच्यामुळे खंडकांत बदल होणे) आणि अंतर्वेशन ⇨घुसण्याची क्रिया ) झाले.

खडक व जीवाश्म यांच्याद्वारे उपलब्ध होणार्‍या पुराव्यांच्या आधारे असे आढळून येते की, मध्यजीवातील जलवायुमान ⇨दीर्घकालीन सरासरी हवामान) पृथ्वीवरील सध्याच्या जलवायुमानापेक्षा अधिक सुखकर होते. ध्रुव प्रदेशात बर्फ नव्हते. यामुळे मध्यजीवातील प्राण्यांच्या व वनस्पतींच्या जाती ग्रीनलंड आणि स्पिटसबर्गेनपासून अंटार्क्टिकापर्यंत एकाच प्रकारच्या होत्या .उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध यांतील उच्च अक्षांशांवरील प्रदेशात महाकाय सरीसृप व प्रवाळ शैलभित्ती या भागांतील न्यूनतम तापमान कमी असल्याच्या निदर्शक आहेत. यांशिवाय विविध प्रकारचे जीव पृथ्वीतलावर होते. मात्र त्यांच्यात अशी विविधतः येण्यामागे जमीन व पाणी यांची पुराभौगोलिक ⇨पूर्वीच्या काळातील भौगोलिक वैशिष्ट्यांची ) वाटणी आणि स्तरवैज्ञानिक संलक्षणी [उत्पत्ती व परिसर यांची सूचक अशी शिलावैज्ञानिक व प्राणीविषक वैशिष्ट्ये असलेले गाळाचे खडक ⟶संलक्षणी] ही कारणे असावीत. शिंपांच्या घटकांतील ऑक्सीजन समस्यानिकाचे ⇨तोच अणुक्रमांक परंतु भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्यांच्या प्रकारचे) मापन करून असे सिध्द करण्यात आले आहे की, मध्यजीवातील तापमान जगभर अनेक बदल झाले. तथापि या शोधास पुष्टी देणारे पुरावे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. भूरासायनिक पध्दतींचा वापर करून केलेल्या अभ्यासामध्येही याहून अधिक माहिती मिळू शकली नाही.


विस्तीर्ण लवणी निक्षेप व अश्मीभूत वालुकागिरी ⇨अवशेष रूपातील वाळूच्या टेकड्या) ट्रायासिक काळातील वाळवंटी जलवायुमानाचे द्योतक आहेत. अशा प्रकारचे वालुकागिरी दक्षिण आफ्रिकेत सापडतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागामधील जुरासिक खडकांत वाळवंटी निक्षेप सापडले आहेत. तसेच टेथिस आणि त्यालगतच्या भागातील लवणी निक्षेप तत्कालीन वाळवंटी जलवायुमान सुचवितात. अशा प्रकारची प्रचंड वाळवंटे क्रिटेशस काळात असल्याचा पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही. जुरासिक काळात उत्तरेकडील खंडातील खडकांत दगडी कोळसा  व लोहाश्म ⇨लोहाचे कार्बोनेट, मृत्तिका व कार्बनमय द्रव्य यांचा बनलेला खडक) सापडतात. यावरून या भागांतील जलवायुमान आर्द्र असावे, हे सिध्द होते.

भारतीय उपखंड : मध्यजीवात हिमालय भागात प्रचंड महासागर होता. काश्मीर ,हजारा, स्पिती,खोरे, सिमला, गढवाल या भागांत भूद्राणीय अवसादन झाले. द्विपकल्पाच्या किनार्‍यालगतच्या प्रदेशात व आसामात जुरासिक काळात सागरी आक्रमण झाले. उत्तर क्रिटेशस काळात द्विपक्लापत प्रचंड प्रमाणावर ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप निर्माण झाले.

हिमालय पर्वताच्या मध्यभागामध्ये हजारापासून नेपाळपर्यंत ट्रायासिक कालीन अवसादी खडकांचे उत्कृष्ट दृश्यांश ⇨पृष्ठभागी उघडे पडलेले भाग) आहेत. या खडकांत अँमोनाइटांचे विपुल जीवाश्म तसेच टेरेब्रॅट्युला ,र्‍हेकोनेला इ. ब्रॅकिओपॉड जीवाश्मही मिळतात. जुरासिक काळातील महत्वाचे अपृष्ठवंशी प्राणी म्हणजे अँमोनाइट होत. कच्छमधील जुरासिक खडकांत या प्राण्यांच्या १,००० जाती व १५० वंश सापडले आहेत. या काळात बायव्हाल्व्ह जीवही भारताच्या अनेक भागात राहत. द्विपकल्प भागात सायकॅड व शंकुमंत वनस्पतींचे प्राबल्य होते. तसेच मासे, उभयचर प्राणी व सरीसृप आणि जमिनीवरील अपृष्ठवंशी प्राणी सर्वत्र होते. क्रिटेशस काळातील

अनेक संलक्षणीचे निक्षेप आढळतात. उत्तर हिमालय भागात सागरी भूद्रोणीय अवसादन अव्याहतपणे चालू होते. द्विपकल्पातील कोरोमंडल किनार्‍यावर उत्तर क्रिटेशसमध्ये सागरी आक्रमण झाले. मध्य प्रदेश व दख्खनच्या पठारावरील नद्यांमध्ये आणि समुद्रालगतच्या भागात खंडीय अवसाद निर्माण झाले. हिमालय, ब्रम्हदेश व बलुचिस्तान भागांत ग्रॅनाइट ,गॅब्रो इ. अंतर्वेशी अग्निज खडकांची निर्मिती झाली. या सर्व विवेचनावरून क्रिटेशस काळात भारतातील विविध भागांतील पर्यावरण ⇨निक्षेपणाची स्थिती) किती भिन्न प्रकारचे होते. याची कल्पना येईल. या काळात भारतीय द्विपकल्प गोंडवनभूमीचा एक अविभाज्य भाग होता. याच्या उत्तरेस टेथिस समुद्र होता. या समुद्राने संपूर्ण हिमालय भाग आणि तिबेट हा सर्व प्रदेश व्यापला होता. या समुद्राच्या एका भागाने आखातरूपाने मिठाचे डोंगर पश्चिम सिंध बलुचिस्तान आणि कच्छ हा संपूर्ण प्रदेश जलमय केला होता. याच आखाताने काही काळ द्विपकल्पाच्या मध्यभागी असलेले नर्मदा नदीचे खोरे पादाक्रांत केले होते. दक्षिणेकडील समुद्राने याच काळात कोरोमंडल किनार्‍यावर आक्रमण केले. आसाम आणि सिंधू-गंगा भूद्रोणीचा काही भाग समुद्राखाली बुडाला. उत्तर क्रिटेशस काळात द्विपकल्पाच्या नैऋत्य भागामध्ये ज्वालामुखीचे प्रचंड उद्रेक होऊन हजारो चौ.किमी .प्रदेश कित्येकशे मीटर जाड लाव्हाने आच्छादला. अशा प्रकारेचे महाप्रचंड उद्रेक भारताच्या इतिहासात पूर्वी झाले नव्हते. अशा रीतीने दख्खनचे पठार निर्माण झाले.

पहा : क्रिटेशस .जुरासिक, ट्रायसिका, डायनोसॉर, नवजीव, पुराजीव, पुराजीवविज्ञान.

संदर्भ : 1. Dunbar ,C.O. Historical Geology, New York, 1960.

            2. Krishnan, M.S. Geology of India and Burma, Madras, 1960.

            3. Kummel, B. History of the Earth San Francisco, 1961.

            4. Moore, R.C. Introduction to Historical Geology ,New York, 1958.

            5. Stokes, W.L. Essentals of Earth History, Englewood ,Cliffs, N.J. 1960.

            6. Wadia, D.N.Geology of India ,London, 1961.    

                              

गाडेकर, दि.रा.