ग्लॉकोफेन : सोडियमयुक्त अँफिबोलांपैकी एक खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार. सुईसारख्या किंवा पात्यासारख्या स्फटिकांचे जुडगे किंवा बुरणुसासारखे पुंजके आढळतात [ → स्फटिकविज्ञान]. पाटन : (110) चांगले [→ पाटन]. कठिनता ६–६·५. वि.गु. ३ ते ३·३. रंग निळा, निळसर काळा. कस पांढरा, निळसर. चमक काचेसारखी, तंतुमय प्रकारची रेशमासारखी. रासायनिक संरचना Na2Mg3Al2·(Si8O22) (OH, F)2. सामान्यपणे संगमरवर, पट्टिताश्म, सुभाजा, एक्लोजाइट यांसारख्या मध्यम किंवा कमी प्रतीच्या रूपांतरित (बदललेल्या) खडकांमध्ये लॉसोनाइट, एपिडोट, जेडाइट इत्यादींच्या जोडीने आढळते. सोडियम विपुल असणाऱ्या स्पीलाइटासारख्या खडकाचे प्रादेशिक रूपांतरण होऊन (दाबले आणि कर्तन केले गेल्याने खडकात बदल होऊन) ग्लॉकोफेन तयार होते. हे ग्रीस, जपान, स्वित्झर्लंड इ. देशांमध्ये आढळते. निळसर व चकाकणारे या अर्थाच्या जर्मन शब्दांवरून ओसमान यांनी याला ग्लॉकोफेन हे नाव दिले (१८४५).

पहा : अँफिबोल गट ॲस्बेस्टस.

ठाकूर, अ. ना.