जुरासिक : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. कालाच्या विभागाला जुरासिक कल्प व त्या कल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला जुरासिक संघ म्हणतात. फ्रान्स व स्वित्झर्लंड यांच्यामधील जुरा पर्वतातील चुनखडकांना ए. फोन हंबोल्ट यांनी १७९९ मध्ये जुरासिक चुनखडक हे नाव दिले होते. पुढे त्यांचे व्यवस्थित अध्ययन करून जुरासिक संघ हे नाव आमी ब्वा यांनी १८२९ साली दिले. या संघाचे पूर्व, मध्य व उत्तर असे तीन विभाग सामान्यतः केले जातात.

खडक : जुरासिक कल्पाचे सागरी खडक सर्व खंडांत सापडतात. त्यांचे दोन मुख्य प्रकार आढळतात. (१) उघड्या समुद्रात साचलेले खडक. जिब्राल्टरपासून तो इंडोनेशियाच्या पूर्व टोकापर्यंत पसरलेल्या पर्वतरांगांच्या तसेच पॅसिफिक भोवतालच्या पर्वतरांगांच्या पट्ट्यातील कित्येक क्षेत्रांत ते आढळतात. ते सामान्यतः चुनखडक व शेल असतात. दक्षिण अटलांटिकच्या किनाऱ्यावरील भागात मात्र जुरासिकचे सागरी खडक आढळलेले नाहीत. (२) जुरासिक कल्पात खंडांच्या विस्तीर्ण क्षेत्रांवर सागरांनी आक्रमण केले होते व खंडांवर पसरलेल्या उथळ सागरात तयार झालेले वालुकाश्म, पिंडाश्म, शेल इ. खडक यूरोपातील आल्प्सच्या उत्तरेस असलेल्या भागात, उ. अमेरिकेच्या पश्चिम भागात व उ. आशियातील यूराल पर्वताच्या पूर्वेकडील क्षेत्रात आढळतात.

काश्मीरातून स्पिटी, गढवाल आणि कुमाऊँ यांच्यातून नेपाळपर्यंत गेलेल्या झंस्कार पर्वतात व बलुचिस्तानात पहिल्या प्रकाराचे (टेथिस समुद्रात साचलेले) खडक आहेत. भारताच्या द्वीपकल्पावरही समुद्राचे आक्रमण झाले होते. उत्तरेकडील टेथिसाचे फाटे मिठाच्या डोंगराच्या क्षेत्रावर, राजस्थानाच्या विस्तीर्ण क्षेत्रावर आणि कच्छाच्या व काठेवाडाच्या काही भागांवर पसरले होते.

भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याच्या काही भागांवर दक्षिणेकडील समुद्राचे आक्रमण झाले होते. अशा आक्रमक समुद्रात तयार झालेले खडक वर उल्लेख केलेल्या उत्तरेकडील क्षेत्रात व पूर्व किनाऱ्यावरील गुंतूर व राजमहेंद्री यांच्यामधील क्षेत्रात आढळतात.

जमिनीवर तयार झालेले जुरासिक खडक दक्षिणेकडील खंडांत व भारताच्या द्वीपकल्पात आढळतात. त्यांपैकी ऑस्ट्रेलियातील, ब्राझिलातील व द. आफ्रिकेतील खडक मुख्यतः व भारताच्या द्वीपकल्पातील खडक अंशतः ज्वालामुखी लाव्ह्याचे आहेत.

जीवसृष्टी : समुद्रातील प्राण्यांपैकी मुख्य म्हणजे ॲमोनाइट होत. या कल्पात ॲमोनाइटांचा [→ ॲमोनॉइडिया] परम उत्कर्ष झाला. सूचक जीवाश्म (जीवांचे शिळारूप अवशेष) म्हणून त्यांचा उपयोग होतो. ⇨बेलेम्नाइट  विपुल असत. ⇨बायव्हाल्व्हिया  आणि ⇨गॅस्ट्रोपोडा  पुष्कळ असत. काही सागरांत ⇨ एकिनॉयडिया  विपुल असत. ⇨क्रिनॉयडिया  मात्र विरळाच असत. ⇨ब्रॅकिओपोडा  पुष्कळ कमी झाले होते व त्यांच्यापैकी स्पिरिफेरॉयडियांचे अवशिष्ट वंश पूर्व जुरासिकच्या अखेरीस लुप्त झाले. माशांचे बहुतेक सर्व आधुनिक गट जुरासिक कल्पात होते.

वनस्पतींपैकी मुख्य म्हणजे सायकॅडोफायटा गटाच्या वनस्पती विशेषतः ⇨बेनेटाइटेलीझ  गणाच्या होत. ⇨गिंकोएलीझ  गणातील वनस्पती, नेचे व ⇨कॉनिफेरेलीझ  गणापैकी देवदार, सीडर व इतर वनस्पती  पुष्कळ असत. वरील गटांच्या वनस्पती सर्व जमिनींवर पसरलेल्या होत्या. जुरासिकच्या मध्यास आदिम आवृतबीज वनस्पती अवतरल्या.

जमिनीवरील प्राण्यांपैकी मुख्य म्हणजे सरीसृप (सरपटणारे प्राणी) होत. या कल्पात यांचा परम उत्कर्ष झाला. लहान, मोठे किंवा प्रचंड आकारमानाचे, जमिनीवर वा पाण्यात राहणारे, अनेक जातींचे सरीसृप पुष्कळ होते. उडणारे, सपक्ष सरीसृप थोडेच होते.

जुरासिकच्या उत्तर भागात आदिम सस्तन प्राण्यांच्या जबड्यांचे जीवाश्म विरळाच व दात असणाऱ्या पक्ष्यांचे जीवाश्म त्यांहून विरळा आढळतात. बेडूक, भेक तसेच पाकोळ्या, माश्या व गोड्या पाण्यातील किंवा समुद्रातील ऑस्ट्रॅकॉडांचे जीवाश्म जुरासिक खडकांत आढळलेले आहेत.

हवामान : आता शीत हवामान असणाऱ्या ग्रीनलंडात आणि अंटार्क्टिकाच्या ग्रेहॅमलंडात समशीतोष्ण वन-वृक्षांचे विपुल जीवाश्म मिळालेले आहेत. तसेच समशीतोष्ण कटिबंधांतील सापेक्षतः थंड हवामान असणाऱ्या प्रदेशातही सरीसृपांचे जीवाश्म सापडतात. त्या प्रदेशांचे म्हणजे एकूण पृथ्वीचे जुरासिक काळातील हवामान आजच्यापेक्षा अधिक उबदार असले पाहिजे.

केळकर, क. वा.