कोडुराइट माला : भारतातील एका प्राचीन (आर्कीयन कालीन) खडकांच्या गटाचे नाव. या गटातील मुख्य खडक म्हणजे कोडुराइट होय. तो मुख्यतः पोटॅश फेल्स्पार, मँगॅनीजयुक्त गार्नेट व थोडे ॲपेटाइट या खनिजांचा बनलेला असतो. त्यात मँगॅनीजयुक्त पायरोक्सीन व क्वॉर्टझ ही  खनिजे अल्प प्रमाणात असणे शक्य असते. खडकाची संरचना मध्यम कणी ग्रॅनाइटाच्या संरचनेसारखी असते. ताजा, कोरा खडक सहसा आढळत नाही. त्याच्यातील फेल्स्पाराचे अपघटन होऊन त्याची माती झालेली असते. या मालेतील इतर खडकांपैकी मुख्य म्हणजे (१) स्पँडाइट खडक : हा मुख्यतः मँगॅनीजयुक्त गार्नेटाचा बनलेला असतो. त्या गार्नेटाचे रासायनिक संघटन स्पेसर्टाइट व अँड्राडाइट यांच्या मधले असते. म्हणून त्याला एल्.एल्. फेर्‍मॉर यांनी स्पँडाइट हे नाव दिले. (२) मँगॅनीज-पायरोक्सिनाइट : हा मुख्यतः मँगॅनीजयुक्त पायरोक्सिनाचा बनलेला असतो.

मँगॅनिजाची धातुके व सिलिकेटे ज्यांच्यात आहेत अशा खडकांत सिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक असलेला) अग्निज शिलारस शिरून व त्या दोहोंचा संकर होऊन कोडुराइट मालेचे खडक तयार झालेले आहेत. ते ⇨ खोंडालाइट मालेतील खडकांच्या जोडीने आढळतात. विशाखापटनम् जिल्ह्यातील कोडूर येथे प्रथम आढळल्यावरून कोडुराइट हे नाव दिले गेले. पूर्व घाटातील कित्येक जागी हे खडक आढळतात.त्यांच्यात रासायनिक फेरफार होऊन तयार झालेले मँगॅनिजाचे काही धातुक निक्षेप (कच्च्या धातूचे साठे) आंध्र प्रदेशात व ओरिसात सापडतात.

केळकर, क. वा.