शिलापट्ट : (सिल). स्थानिक खडकांच्या स्तरणाला (थरांच्या पातळीला) किंवा अन्य रचनांना अनुसरून घुसलेला शिलारस निवून आणि थिजून तयार झालेली अग्निज खडकांची राशी. दरवाजा अथवा खिडकी यांच्या चौकटीच्या तळाशी असणाऱ्या आडव्या, चपट्या फळीच्या आइसलँडिक नावावरून तशा दिसणाऱ्या अग्निज खडकाच्या या राशीला ‘सिल’ हे नाव दिले गेले आहे.

सामान्यापणे शिलापट्ट आडवे, क्षितिजसमांतर असून वडीप्रमाणे एकूण विस्ताराच्या मानाने त्यांची जाडी बरीच कमी असते. मर्यादित अंतरात पाहिल्यास त्यांच्या वरच्या आणि खालच्या बाजूंची स्पर्शपृष्ठे एकमेकांना समांतर दिसतात पण अधिक दूर अंतरापर्यंत पाहिल्यास शिलापट्टाची जाडी कमी कमी होत जाऊन अखेर त्याची दोन्ही पृष्ठे परस्परांना मिळतात असे दिसते. म्हणजे त्यांचा आकार एखाद्या खूप विस्तृत, चपट्या बहिर्गोल भिंगासारखा असतो.

शिलापट्टांची जाडी केवळ काही सेंमी.पासून ते कित्येकशे मी. पर्यंत असू शकते. शिलापट्टाचा विस्तार किती अंतरापर्यंत होईल हे, शिलापट्ट निर्मितीला कारणीभूत होणाऱ्या अंतर्वेशी (घुसणाऱ्या) शिलारसाच्या जलस्थितिक दाबावर, त्याच्या सुवाहीपणावर, त्याच्या तापमानावर, तसेच जागा व्यापण्यासाठी शिलारसाला वरच्या खडकांचे किती ओझे उचलावे लागते यांसारख्या अनेक बाबींवर अवलंबून असते.

शिलापट्ट : गाळांच्या खडकांच्या किंचित तिरप्या थरांच्या मध्ये घुसलेले दोन शिलापट्ट काळ्या रंगाने दर्शविले आहेत.

अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेला) शिलारस हा सिकत किंवा अधिसिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त असलेल्या) शिलारसापेक्षा अधिक सुवाही असतो. त्यामुळे बहुतेक विस्तृत आकारमानाचे शिलापट्ट प्रामुख्याने डोलेराइट व बेसाल्ट अल्पसिकत या खडकांचे असतात. बहुतेक शिलापट्ट स्थानिक खडकांच्या दुर्बल स्तरणपातळ्या आणि रचना यांना अनुसरून घुसलेले असतात. बरेच शिलापट्ट वालुकाश्म आणि मृदाश्म (शेल) यांच्या जोडसंध्याच्या स्तरण पातळीला तसेच दगडी कोळशाच्या थरांच्या स्तरण पातळीला अनुसरून झालेले आढळतात.

इंग्लंडच्या उत्तर भागातील ‘ग्रेट व्हिन सिल’ हे खूप विस्तृत क्षेत्रात पसरलेल्या शिलापट्टाचे नमुनेदार उदाहरण आहे (व्हिन हे बेसाल्ट अथवा डोलेराइटासारख्या काळ्या रंगाच्या सूक्ष्मकणी घट्ट खडकाला खाणकामगारांनी दिलेले नाव आहे). उत्तरेस नॉर्थम्बरलँड ते दक्षिणेस डरॅमपर्यंत कित्येक हजार चौ. किमी.च्या विस्तृत क्षेत्रात पसरलेला हा शिलापट्ट आडव्या क्षितिजासमांतर असणाऱ्या चुनखडीच्या थरांत त्याच्या स्तरण प्रतलांना समांतर दिशेत घुसलेला आहे. या शिलापट्टाची सरासरी जाडी ३० मी. असून कित्येक जागी ती ६० मी. हूनही अधिक आहे. या शिलापट्टाला काही जागी फाटे फुटलेले असून काही जागी शिलापट्टाचा खडक वरच्या थरांना भेदून जाताना दिसतो. तसेच वरच्या थराच्या स्पर्शपृष्ठालगत त्या थराचे रूपांतरणाही झाल्याचे स्पष्ट दिसते. त्यावरून हा स्थानिक खडकांच्या समकालीन असा लाव्हा रसाचा थर नसून अंतर्वेशी असा शिलापट्टच आहे, हे सिद्ध होते.

उत्तर अमेरिकेतील जर्सी शहरानजीकचा हडसन नदीच्या खोऱ्यावतील ‘हडसन पॅलिसेड’ नावाने ओळखला जाणारा शिलापट्टही प्रसिद्ध आहे. या शिलापट्टाच्या स्पर्शपृष्ठांना लंब अशा उभ्या स्तंभाकार संधींमुळे अनेक उभे दगडी खांब जोडून केलेल्या उभट कुंपणासारखा हा शिलापट्ट दूरवरूनही ठळकपणे दिसतो. त्यावरूनच त्याला पॅलिसेड नाव दिले आहे. अशा तऱ्हेचे उभे स्तंभाकार संधी इतरही अनेक दिसतात.

 भित्तींचे जसे समूह आढळतात, तसेच अनेक जागी शिलापट्ट एकएकटे न आढळता ते समूहांच्या स्वरूपात दिसतात. दक्षिण आफ्रिकेच्या ‘कारू’ मालेच्या अवसादी (गाळाच्या) खडकांच्या सपाट आडव्या थरांत घुसून तयार झालेला शिलापट्टांचा प्रचंड समूह हे याचे उत्तम उदाहरण आहे. या समूहात शेकडो शिलपट्ट असून त्यांची जाडी प्रत्येकी काही थोड्या मीटरपासून ते ३०० मी. पेक्षाही अधिक आहे. या सर्व शिलापट्टांच्या निर्मितीला कारणीभूत झालेल्या एकूण शिलारसाचा विचार केल्यास त्याची राशी अमेरिकेतील कोलंबिया नदीच्या खोऱ्यातील लाव्हा पठाराच्या राशीशी समतुल्य होईल.

सागराच्या तळावर गाळ साचून त्याचे थर तयार होत असतानाच कधीकधी सागरतळाशी भेगी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन गाळांच्या थरावर लाव्ह्याचा आडवा समांतर थर पसरला जातो. या लाव्हा रसाच्या थरावर पुन्हा गाळ साचण्याची क्रिया चालूच राहते. कालांतराने हे गाळाचे घट्ट झालेले थर भूकवचाच्या हालचालींनी वर उचलेले जाऊन त्यांची जमीन होते. वातावरणक्रियेने झीज होऊन या थरांचे उभे छेद उघडे झाले म्हणजे गाळांच्या खडकांच्या दोन थरांच्या मध्ये सापडलेला या थरांना समांतर असा अग्निज खडकाचा थर दिसतो. सकृतदर्शनी हा थर शिलापट्टासारखाच दिसतो. अशा थराला ‘समकालीन लाव्हा’ हे नाव आहे. शिलापट्ट आणि समकालीन लाव्हा एकमेकांपासून वेगळे ओळखण्याची काही खास लक्षणे आहेत, ती अशी : (१) शिलापट्टामुळे त्याच्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही बाजूंच्या खडकांच्या स्पर्शपृष्ठाशी भाजण्याची क्रिया झालेली दिसते. (समकालीन) लाव्हा थराने फक्त खालचे स्पर्शपृष्ठच भाजले जाऊ शकते. (२) शिलापट्ट दोन थरांत घुसत असताना त्याच्या रेट्याच्या जोरामुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही खडकांचे तुकडे फुटून ते तुकडे शिलापट्टात सामावले जातात. (समकालीन) लाव्हाच्या थरात फक्त खालच्या थराच्या खडकांचेच तुकडे सापडू शकतात. (३) महत्त्वाचे लक्षण म्हणजे शिलापट्ट दोन थरांत घुसत असताना मध्येच वरच्या थरात भेग सापडली तर त्या भेगेतून वर घुसून त्यावर दोन थरांत घुसलेला दिसतो. समकालीन लाव्ह्याच्या बाबतीत लाव्हा ओतला जाण्याच्या वेळेस वरचा थर अस्तित्वाच नसल्याने असे घडणे अशक्य असते.

पहा : अग्निज खडक.

संदर्भ : 1. McBirney, A. R. Igneous Petrology, New York, 1992.

            2.  सोवनी, प्र. वि. पाषाणशास्त्र, पुणे, १९७४.

सोवनी, प्र. वि.