प्रूस्टाइट : (लाइट रेड सिल्व्हर ओअर). खनिज. स्फटिक षट्‌कोणी, टोकाशी प्रसूची असलेले प्रचिन, स्फटिक बहुधा वेडेवाकडे झालेले [⟶ स्फटिकविज्ञान]. सामान्यपणे संपुंजित, संहत वा विखुरलेल्या कणांच्या रूपात आढळते. ⇨ पाटन (1011) चांगले. ठिसूळ. कठिनता २-२·५. वि.गु. ५·५५-५·६०. चमक हिऱ्यासारखी. रंग माणकाप्रमाणे व कस हिंगुळाप्रमाणे लाल. दुधी काचेप्रमाणे पारभासी मात्र तांबड्या प्रकाशात पारदर्शक, तसेच प्रकाशात उघडे पडल्यास मंद व अपारदर्शक होते. रा.सं. Ag3AsS3. यात थोडे अँटिमनी असते. तापविले असता यातून आर्सेनिक ऑक्साइड बाहेर पडून लसणासारखा वास येतो. हे ⇨पायरार्जिराइटाप्रमाणे चांदीच्या बहुतेक धातुक (कच्च्या रूपातील धातूच्या) शिरांच्या वरच्या भागात परंतु पायरार्जिराइटापेक्षा कमी प्रमाणात आढळते. पायरार्जिराइट व इतर चांदीच्या खनिजांबरोबर हे आढळते. चान्यार्सीयो (चिली), लरेन (आँटॅरिओ), फ्रायबेर्ख आणि मारीनबेर्क (सॅक्सनी, पू. जर्मनी), हार्ट्‌‌झ पर्वत (प.जर्मनी), पर्झींब्राम (बोहीमिया), ग्वानाव्हाटो (मेक्सिको) इ. प्रदेशांत प्रूस्टाइट आढळते आणि मेक्सिकोत हे चांदीचे धातुक म्हणून काढण्यात येते.

प्रूस्टाइट हे चांदीचे महत्त्वाचे धातुक असून त्यात ६५ टक्के चांदी असते. हे पायरार्जिराइट या खनिजाशी समरूप (सारखा स्फटिकाकार असलेले) व संबंधित असून जी. ॲग्रिकोला (१४९४-१५५५) यांनी या दोन्हींचा ‘रुबी सिल्व्हर’ (रेड सिल्व्हर ओअर) असा उल्लेख केला होता (१५४६). जे. एल्. प्रूस्ट (प्रूस्त) (१७५४-१८२६) यांनी रासायनिक विश्लेषणांद्वारे ही दोन्ही वेगळी असल्याचे ओळखून काढले (१८०४) व त्यामुळे त्यांच्या बहुमानार्थ याला प्रूस्टाइट हे नाव देण्यात आले (१८३२).

पहा : चांदी पायरार्जिराइट.

ठाकूर, अ. ना.