थोराइट : खनिज. स्फटिक चतुष्कोणीय, त्यांचा आकार व अंतर्रचना झिर्‌कॉनाच्या स्फटिकांसारखी [⟶ स्फटिकविज्ञान]. ⇨पाटन (110) स्पष्ट. कठिनता ४·५–५. वि. गु. ४·४–४·८ मात्र ते सतल (जलयुक्त) झाल्यावर वि. गु. ५·१९–५·४. यामुळे ते कधीकधी अस्फटिकी होते. रंग गडद करडा ते काळा नारिंगी पिवळ्या प्रकाराला रंगावरून ऑरेंजाइट म्हणतात व त्यात थोरियम ऑक्साइड जास्त प्रमाणात असून ते अंशतः थोराइटामध्ये बदललेले असते. थोराइटाचे रा. सं. ThSiO4. कधीकधी यात पाणी, युरेनियम, शिसे व लोहही असते. युरेनियम ऑक्साइड (९–१०%) असणाऱ्या प्रकाराला युरॅनोथोराइट म्हणतात व ते तांबूस उदी असते. थोराइट हे महत्त्वाचे खनिज असून ते सामान्यतः पेग्मटाइट खडकात आणि विरळाच आढळते. नॉर्वेमध्ये ऑजाइटसुक्त सायेनाइट खडकात, तसेच केप प्रांत (द. आफ्रिका) व श्रीलंकेत थोराइट आढळते. भारतामध्ये त्रावणकोर आणि तुतिकोरिन येथील मोनॅझाइट वाळूत ते आढळते. स्वीडनमध्ये थोराइट व ऑरेंजाइट, मॅलॅगॅसीत ऑरेंजाइट व युरॅनोथोराइट, तर कॅनडात युरॅनोथोराइट आढळते. थोराइट हे ⇨ थोरियमाचे महत्त्वाचे खनिज असून यातच प्रथम थोरियम हे मूलद्रव्य आढळले (१८२८). रसायन उद्योग, वायुजाळी (बत्तीमध्ये वापरण्यात येणारे गॅस मँटल) तसेच क्षेपणास्त्रे व अवकाशयाने यांत वापरल्या जाणाऱ्या मिश्रधातू यांमध्ये थोरियमाचा उपयोग होतो. ऑरेंजाइट रत्‍न म्हणूनही, तर युरॅनोथोराइट युरेनियम मिळविण्यासाठी उपयुक्त आहे. या खनिजात आढळणाऱ्या थोरियम या मूलद्रव्यावरून थोराइट हे नाव आले असून याच्या जोडीने युरॅनोथोराइट आढळत असल्याने कधीकधी थोराइटालाच युरॅनोथोराइट म्हणतात.

ठाकूर, अ. ना.