डुमॉर्टीराइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, प्रचिनाकार परंतु विरळाच आढळतात [⟶स्फटिकविज्ञान]. सामान्यतः तंतूंच्या किंवा काड्यांच्या जुडग्यांच्या तसेच अरीय राशींच्या रूपांत आढळते. कठिनता ७. वि. गु. ३·२६–३·३६. चमक काचेसारखी. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. रंग निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी तापविल्यास रंग जातो. रा. सं. (Al, Fe)7 O3 (BO3) SiO4)3. स्थूलमानाने ॲल्युमिनियम विपुल असणाऱ्या पट्टिताश्म, सुभाजा या रूपांतरित खडकांत व कधीकधी पेग्मटाइटांच्या भित्तींत हे आढळते. अमेरिका (नेवाडा), फ्रान्स, मॅलॅगॅसी, मेक्सिको, चिली इ. देशांत हे सापडते. सापेक्षतः कमी तापमानाला (सु. १,२००° से. ला) याचे स्फटिकरूप मूलाइट द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे ठिणगी गुडद्यांचे (एंजिनात इंधन पेटविण्याकरिता विद्युत् ठिणगी पाडणाऱ्या साधनांचे, स्पार्क प्लगांचे) व इतर उच्च दर्जाचे विद्युतीय पोर्सलीन बनविण्यासाठी व उच्चतापसह (उच्च तापमानास न वितळता कार्य करणाऱ्या) पदार्थाच्या व्यवसायात हे वापरतात. अझन डुमॉर्टीए या फ्रेंच पुराजीववैज्ञानिकांच्या सन्मानार्थ हे नाव दिले आहे (१८८१).

केळकर, क. वा.