भूवैज्ञानिक तापमापन : खनिजांच्या व ती ज्यांत असतात त्या खडकांच्या निर्मितीच्या वेळच्या तापमानासंबंधीची माहिती ज्या खनिजांद्वारे मिळते, त्यांना भूवैज्ञानिक तापमापके म्हणतात आणि या संबंधीच्या अभ्यासाला भूवैज्ञानिक तापमापन म्हणतात. खनिज निक्षेपांची (साठ्यांची) उत्पत्ती व प्रकार समजून घेण्यासाठी अशी खनिजे महत्त्वाची असतात. प्रत्यक्ष निरीक्षण, प्रयोग आणि ज्यांची तापमाने आधीच निश्चित करण्यात आलेली आहेत अशा खनिजांबरोबर विशिष्ट खनिजांचा आढळ पाहून भूवैज्ञानिक तापमानाविषयी माहिती मिळाली आहे. भूवैज्ञानिक तापमापकांची निश्चिती पुढील प्रकारांनी करण्यात आलेली आहे : (१) लाव्हे, धूममुखे [वाफ वा तप्त वायुरूप पदार्थ बाहेर टाकणारी भूपृष्ठावरील छिद्रे ⟶ धूममुख] आणि उन्हाळी (गरम पाण्याचे नौसर्गिक झरे) यांचे तापमान मोजणे (उदा., व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीतील लाव्हाचे तापमान १,१४०° से. तर काटमाई येथील धूममुखाचे तापमान ६४५° से. आढळले). (२) ज्या कमाल तापमानाला खनिज स्फटिकीभूत होते ते तापमान अथवा त्याच्या निर्मितीच्या तापमानाच्या पल्ल्यातील कमाल तापमान हे त्या खनिजाच्या वितळबिंदूद्वारे अंदाजे काढणे (३) ज्याच्यातून विशिष्ट तापमानाला बाष्पनशील (बाष्परूपाने निघून जाणारा) घटक बाहेर पडतो अशी खनिजेही भूवैज्ञानिक तापमानासाठी उपयुक्त असतात. मात्र हे तापमान दाबामुळे वाढते हे लक्षात घ्यायला पाहिजे (उदा., ९००° से. तापमानाला कॅल्साइटातून कार्बन डाय-ऑक्साइड हा घटक निघून जातो). (४) ४५०° से. तापमानाला मार्‌कॅसाइट या खनिजाचे पायराइटामध्ये पर्यसन (रूपात बदल) होते, तर सु. ५७३° से. ला उच्च क्वॉर्ट्‌झाचे नीच क्वॉर्ट्‌झामध्ये रूपांतर होते. या तापमानाला ‘पर्यसन बिंदू’ म्हणतात. या तापमानावर दाबाचा परिणाम अल्पच होतो व तो सहज ओळखता येण्यासारखा असतो. यामुळे ही तापमाने भूवैज्ञानिक तापमापके म्हणून सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. (५) काही खनिजांचे नैसर्गिक रीतीने धन विद्राव (धन पदार्थांचे समांग मिश्रण) झालेले आढळतात आणि ठराविक अशा कमी तापमानाला अशी खनिजे एकमेकांपासून अलग होऊन त्यांची आंतरवृद्धी (विविध खनिजांचे स्फटिक एकत्रपणे वाढले गेले असण्याची स्थिती) होते व ही आंतरवृद्धी ओळखता येते. त्यामुळे ही खनिजे तापमाननिदर्शक ठरतात (उदा., कॅल्कोपायराइट व बोर्नाइट ही खनिजे ४७५° से. ला एकमेकांपासून अलग होतात). (६) विशेषकरून नैसर्गिक स्वरूपात आढळणाऱ्या धातूंचे ठराविक तापमानाला पुनर्स्फटिकीभवन होते व म्हणून तापमानासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो (उदा., बऱ्याच प्रमाणात ४५०° से. ला तांब्याचे व सु. २००° से.ला चांदीचे पुनर्स्फटिकीभवन होते). (७) स्फटिकांमधील पोकळ्यांत असलेल्या द्रवावरून त्यांच्या निर्मितीच्या वेळचे तापमान अंदाजे काढता येते (उदा., स्फॅलेराइटाचा स्फटिक सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून तापविण्यात आला, त्यातली पोकळी द्रवाने पूर्ण भरण्यास लागलेले तापमान नोंदण्यात आले व या तापमानाला तो स्फटिक निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला). (८) काही खनिजांच्या विशिष्ट गुणधर्मांमध्ये ठराविक तापमानाला बदल होतात. या बदालावरून तापमान सूचित होते (उदा., सु. १७५° से. ला प्ल्युओराइटाचा रंग जातो.) कृत्रिम सल्फाइडांच्या समूहांचा पद्धतशीर अभ्यास करून भूवैज्ञानिक तापमानविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. यावरून धातुक (कच्च्या रूपातील धातू) तयार होण्याच्या वेळचे तापमान कळू शकते. जर निक्षेपामध्ये वरीलसारखी तापमान दर्शविणारी अनेक खनिजे असली व त्यांमध्ये एकमेकांबरोबर नेहमी आढळणारी विशिष्ट खनिजे असली, तर त्यांचा उच्च (उदा., मॅग्नेटाइट), मध्यम (उदा., गॅलेना) व नीच (उदा., मनशीळ) असा तापमानदर्शक स्थूल क्रम लावता येतो. तसेच बरेच अचूक कमाल किंवा किमान तापमान दर्शवणारी, तापमानाचा पल्ला दर्शवणारी व स्थूल तापमान दर्शवणारी असे या खनिजांचे गट करता येतात.

ठाकूर, अ. ना.