सेलेस्टाइट : स्ट्राँशियम या धातूचे प्रमुख व सर्वांत विपुल आढळणारे खनिज. त्याचे स्फटिक द्विप्रसूच्याकार. समचतुर्भुजी व सामान्यपणे वडीसारखे असून ते ⇨ बराइट या खनिजाच्या स्फटिकांसारखे असतात [⟶ स्फटिकविज्ञान ] सेलेस्टाइट संहत, तंतुमय व कणमय रूपांतही आढळते. ⇨ पटन : (००१) परिपूर्ण, (२१०) चांगले रंगहीन वा पांढरे, बहुधा आकाशी निळसर, कधीकधी तांबूस कस पांढरा चमक काचेसारखी, कधीकधी मोत्यासारखी कठिनता ३ˆ३·५ वि. गु. ३·९५ˆ३·९७ भंजन खडबडीत पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. SrSO4 (स्ट्राँशियमाच्या जागी विविध प्रमाणात बेरियम आलेले असते). अशा प्रकारे बराइट (BaSO4) व सेलेस्टाइट यांचे श्रेणीभवन झालेले असते. कदाचित सेलेस्टाइटाला ज्योतीचा स्पर्श झाल्यास ते तडतडते. तसेच बराइटापेक्षा त्याचे वि. गु. वितळून मोत्यासारखा पांढरा थेंब बनतो. तप्त व संहत अम्ले किंवा अल्कली कार्बोनेट विद्राव यांच्यात सेलेस्टाइट सावकाशपणे विरघळू शकते.

बराइटापेक्षा कमी सामान्य असलेले सेलेस्टाइट गाळाच्या खडकांत विशेषतः डोलोमाइट, डोलोमाइट चुनखडक व वालुकाश्म या खडकांत आढळते. जलतापीय खनिज शिरा व अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) ज्वालामुखी खडकांतील पोकळ्यांमध्ये अस्तरांच्या रूपांतही सेलेस्टाइट आढळते. तसेच ते सामान्यपणे कॅल्साइट, डोलोमाइट, जिप्सम, हॅलाइट, गंधक व फ्ल्युओराइट यांच्याबरोबर शिशाच्या धातुक (कच्च्या रूपातील धातूच्या) शिरांत मलखनिज म्हणून आढळते. सिसिली (इटली), ब्रिस्टॉल (इंग्लंड) व चेकोस्लोव्हाकिया येथे सेलेस्टाइटाचे सुंदर स्फटिक विपुलपणे आढळतात. यांशिवाय ते मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (ओहायओ, कॅलिफोर्निया, टेक्सस इ.) व स्वित्झर्लंड या ठिकाणी आढळते. अमेरिकेत ते सर्वाधिक आढळते, मात्र तेथे ते ब्रिटन व मेक्सिको येथून आयात करतात. भारतात केरळमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यात सेलेस्टाइट आढळते. मात्र त्याचा औद्योगिक उपयोग भारतात होत नाही.

सेलेस्टाइट स्ट्राँशियम धातूचा मुख्य स्रोत असून त्यापासून स्ट्राँशियमाची लवणे व संयुगेही तयार करतात. ते शोभेच्या दारूकामात वापरण्यात येणारे स्ट्राँशियम नायट्रेट तयार करण्यासाठी वापरतात. कारण त्याच्यामुळे क्रिमझन लाल रंगाचा प्रकाश निर्माण होतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मार्गदर्शन व संदेश देणाऱ्या तेजोरेषा आकाशात निर्माण करण्यासाठी सेलेस्टाइटाला असाधारण मागणी आली होती. बीटापासून साखर बनविताना परिष्करण (शुद्धीकरण) करण्यासाठी, छिद्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या चिखलाचे वजन वाढविण्यासाठी तसेच मृत्तिका उद्योग, औषधे, त्वचेवरील केस काढण्याची रसायने, रंगलेप इत्यादींमध्ये सेलेस्टाइटाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष उपयोग होतो. त्याच्या प्रथम वर्णन केलेल्या नमुन्याचा रंग आकाशी निळा होता. त्यामुळे खगोल अर्थाच्या ग्रीक शब्दावरून त्याचे सेलेस्टाइट हे नाव पडले. त्याला सेलेस्टाइन असेही म्हणत असत.

पहा : स्ट्राँशियम.

ठाकूर, अ. ना.