संधि, खडकांतील : खडकांच्या नैसर्गिक राशी एकसंध नसून त्यांच्यात अनेक चिरा असतात व चिरांमुळे त्यांचे अनेक भाग झालेले असतात. त्या चिरांना विभाजनतले किंवा संधी म्हणतात. संधीच्या लगतच्या खडकांची संधीच्या पृष्ठास लंब अशा दिशेने हालचाल होऊन कधीकधी रूंद भेग तयार होते. तिचा समावेश संधीत केला जातो, पण संधीच्या पृष्ठास समांतर अशी त्यांची हालचाल झाली तर त्याला विभंग म्हणतात.

बहुसंख्य संधी समतल पण काही वक्र असतात. ते आडवे, उभे किंवा तिरपे असू शकतात. ते आडवे नसले म्हणजे त्यांच्या नतीची दिशा व कोन मोजून त्यांच्या स्थितीचे अचूक वर्णन करता येते. नत म्हणजे तिरप्या संधींची सपाट जमिनीवर दिसणारी दिशा ही त्यांच्या नतिलंबाची दिशा असते. नतीच्या किंवा नतिलंबाच्या दिशेने गेले असता, काही मीटरांपासून तो कित्येकशे मीटरांइतकी लांबी असलेले त्याचप्रमाणे खोल दऱ्यांच्या बाजूवर उघडया पडलेल्या खडकांत कित्येकशे मीटर खोल गेलेले संधी पहावयास मिळतात.[→  नति].

संधी एकेकटे असत नाहीत, त्यांची संख्या बरीच असते. एकमेकांस जवळजवळ समांतर असणारे सर्व संधी मिळून एक गट होतो. संधीचे एकमेकांशी ९०° किंवा इतर कोन करून असणारे दोन किंवा अधिक गट बृयाचशा खडकांत आढळतात. असे संधी खडकात असले व त्यांचा विशिष्ट साचा होत असला म्हणजे ते सर्व मिळून होणाऱ्या समूहास संधि-समुदाय म्हणतात.

वर्गीकरण : संधीच्या वर्गीकरणासाठी पुढील तिन्हींपैकी एखादी पद्धती वापरली जाते : (१) संधीच्या (म्हणजे नतिलंबाच्या) दिशा देऊन. उदा., पूर्व-पश्र्चिमसंधी, उत्तर-दक्षिण संधी इत्यादी. (२) संधींची स्थिती व ते ज्यांच्यात आहेत त्या खडकांच्या रचना यांच्यामधील संबंधांवरून. उदा., स्तरित खडकांच्या नतिलंबास जवळजवळ समांतर अशी दिशा असणाऱ्या संधींना नतिलंब संधी, त्या खडकांच्या नतीस जवळजवळ समांतर अशी दिशा असणाऱ्या संधींस नतिसंधी व वर उल्लेख केलेल्या दिशांहून वेगळी दिशा असणाऱ्या संधींना तिरपे (तिर्यक्) संधी म्हणतात. सुभाजातील किंवा पट्टिताश्मातील वर्गीकरण करताना सुभाजांची सुभाजनतले व पट्टिताश्मांचे पट्टन यांचा संदर्भासाठी उपयोग केला जातो. (३) जननिक म्हणजे उत्पत्तीच्या रीतीवरून संधींचे वर्गीकरण करतात.

उत्पत्ती : विटा एकमेकींस चिकटवून बांधकाम केले जाते, त्याप्रमाणे खडकांचे ठोकळे चिकटवून खडकांच्या राशी तयार झालेल्या असतात, अशी ब्रिटिश खाणकामगारांची कल्पना होती. म्हणून खडकांतील चिरांस जॉईंट (संधी) हे नाव त्यांनी दिले व तेच प्रचारात राहिले परंतु संधी म्हणजे खडक भंग पावून उत्पन्न झालेल्या चिरा असतात व त्या निरनिराळ्या कारणांनी उत्पन्न झालेल्या असणे शक्य असते. शिलारस थिजून तयार होणारे खडक प्रारंभी तप्त असतात व मागाहून निवून त्यांचे तापमान सामान्य होते. निवण्याने ते संकोच पावतात. संकोचनात निर्माण होणाऱ्या ताणामुळे त्यांना चिरा पडणे शक्य असते. चिखल सुकला म्हणजे पाणी निघून जाण्याने संकोच पावतो व त्याला भेगा पडतात, पण बहुसंख्य संधी खडकांवर भूकवचाच्या हालचालींचा परिणाम होऊन उत्पन्न झालेले असतात. भूकवचाच्या हालचालींमुळे खडक ताणले, पिळवटले किंवा दाबले जाणे यांसारख्या क्रिया घडून येतात. ताणण्या-पिळवटण्यामुळे व काही परिस्थितीत संपीडनामुळेही (दाबले जाण्यानेही) खडक भंग पावून संधी निर्माण होणे शक्य असते.

बाह्य प्रेरणांमुळे घन पदार्थांत विकृती उत्पन्न होतात व त्यांच्यात चिरा पडतात, असे अनुभव अभियांत्रिक कार्यात वारंवार येतात व अभियांत्रिक प्रयोगशाळांत प्रयोग करून वरील गोष्टी कशा घडून येतात याविषयी बरीच माहिती मिळविण्यात आलेली आहे. भूवैज्ञानिकांनीही प्रयोग करून तशीच माहिती मिळविलेली आहे. अशा माहितीचा उपयोग करून खडकांतील कित्येक संधींच्या उत्पत्तीचा खुलासा करता येतो पण निसर्गात आढळणारे विविध संधी ज्या दिक्कालादी परिस्थितीत उत्पन्न झाले त्या सर्व परिस्थिती प्रयोगशाळेत निर्माण करता येत नाहीत. त्यामुळे कित्येक संधींच्या उत्पत्तीचा खुलासा करता येत नाही. उत्पत्तीच्या प्रकारावरून संधींचे ताण संधी व कर्तरी संधी असे दोन प्रकार केले जातात पण कित्येक संधी वरील दोहों-पैकी कोणत्या प्रकारचे आहेत हे ठरविणे कठीण असते. लहान अशा क्षेत्राचे परीक्षण करून संधींच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करता येतेच असे नाही. विस्तीर्ण क्षेत्राचे परीक्षण करून त्यांच्या खडकांवर कोणत्या प्रेरणांचा परिणाम झाला आहे याविषयी माहिती मिळवून संधींचा प्रकार ठरविणे कधीकधी शक्य असते. म्हणून सामान्य व्यवहारासाठी उत्पत्तीवरून वर्गीकरण करणे सोयीचे ठरत नाही.

प्रकार : ताण संधी : ज्यांची उत्पत्ती सहज कळते असे ताण संधी म्हणजे बेसाल्टातील स्तंभ संधी [→ अग्निज खडक], मृण्मय खडकातील तसेच संधी व सुकलेल्या चिखलातील भेगा होत. घड्या पडलेल्या थरांच्या कमानीसारख्या भागात घडीच्या अक्षास समांतर असे संधी कधीकधी आढळतात. तेही थर ताणले जाऊन तयार झालेले असतात.


कर्तरी संधी : ओळखणे कठीण असते. घड्या पडलेल्या थरांत एकमेकांशी बराच कोन करून असणाऱ्या दोन गटांचे संधी (म्हणजे संयुग्म संधि-समुदाय) कधीकधी आढळतात. असे संधी व विशेषत: त्यांची मांडणी प्रेषाच्या (प्रतिविकृतीच्या) अक्षाशी सममित असली म्हणजे ते बहुधा कर्तरी संधी असतात.

वर उल्लेख केलेल्या प्रकारांशिवाय आणखी काही प्रकारचे संधी निसर्गात आढळतात [→  घडया ,खडकांतील].

चादरी रचना : खाणकामामुळे उघडया पडलेल्या ग्रॅनाइटात किंवा त्यांच्या- सारख्या खडकांत व क्वचित वालुकाश्मासारख्या खडकांत संधीसारख्या चिरा आढळतात. त्या चिरा किंचित वक्र व जमिनीच्या पृष्ठास जवळजवळ समांतर असतात. जमिनीच्या पृष्ठाजवळच्या भागातील चिरांमधील अंतर काही थोडया सेंमी. इतकेच असते व खोलीबरोबर ते वाढत जाऊन अखेरीस चिरा दिसेनाशा होतात पण वरच्या भागातील चिरांस समांतर अशी अदृश्य दुर्बल तले खडकांच्या खोल भागात असतात व तेथील खडक खणून काढताना त्याचा संधीसारखा उपयोग होतो. वर उल्लेख केलेल्या संधीमुळे खडकांस थरासारखी चादरी रचना प्राप्त होते व त्यांच्यापासून फरशीसारखे किंवा जाड ठोकळ्यासारखे दगड सहज खणून काढता येतात.

चादरी रचनेच्या उत्पत्तीचे निश्र्चित कारण कळलेले नाही. जमिनीचे क्षरण (झीज) होऊन पृष्ठभागाचे खडक नाहीसे होत असताना खालच्या खडकांवरील (संसीमक म्हणजे मर्यादेत ठेवणारा) भार कमी होत असतो. त्यामुळे खडकांची प्रवृत्ती सर्व दिशांस प्रसरण पावण्याकडे असते. वरच्या दिशेस फक्त हवा असते व तिला ढकलणे सोपे असल्यामुळे ऊर्ध्व प्रसरणास अडथळा होत नाही पण आडव्या पातळीत होणाऱ्या प्रसरणास खडकाचाच अडथळा होतो. अशा परिस्थितीत खडकांच्या पृष्ठभागास समांतर अशा प्रेरणा निर्माण होतात व त्यांच्यामुळे खडक भंग पावतो. संपीडक दाबामुळे त्या दाबाच्या दिशेस समांतर अशा ‘विस्तारण’ चिरा घन पदार्थात काही परिस्थितीत उत्पन्न होतात, असे प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांवरून कळून आलेले आहे व चादरी रचना ‘विस्तारण’ चिरा असाव्यात असे दिसते.

फायदे : संधींमुळे खडक खणून काढण्याचे काम सोपे होते. ते नियमित व काही अंतरावर असले म्हणजे खडकांपासून फरश्या, पाटथर किंवा स्तंभही सहज खणून काढता येतात. पण ते वेडेवाकडे किंवा फार जवळजवळ असले म्हणजे त्यांच्यापासून बांधकामाचे दगड मिळू शकत नाहीत. संधींमुळे निसर्गातील पाण्याला व विद्रावांना वाट मिळते आणि वातावरणक्रिया व इतर कित्येक भूवैज्ञानिक प्रक्रिया घडून येण्याला साहाय्य होते. विपुल संधी असलेल्या खडकात पुष्कळ पाणी मावू शकते व पर्जन्य वर्षावानंतर जमिनीत मुरणारे पाणी साचून छिद्रहीन व अप्रवेश्य पण संधी असलेल्या खडकात सुद्धा भूमिजलाचे साठे होऊ शकतात. खोल जागेतून वर येणाऱ्या विद्रावातील पदार्थ साचून खनिजांच्या व धातुकांच्या (कच्च्या रूपातील धातूंच्या) शिरा तयार होण्याला आवश्यक त्या पोकळ्या संधींमुळे मिळतात. संधींच्या साचावरून ते असलेल्या खडकांवर कोणकोणत्या प्रेरणांचा परिणाम झाला हे कळण्यासही साहाय्य होते.

पहा : ग्रॅनाइट घडया, खडकांतील विभंग, खडकांतील.

संदर्भ : 1. Billings, M. P. Structural Geology, Bombay, 1961.

           2. Davis, G. H. Structural Geology of Rocks and Regions, 1984.

           3. Dennis, J. G. Structural Geology: An Introduction, 1987.

           4. Price, N. J. Cosgrove, J. W. Analysis of Geological Structures, 1990.

           5. Twiss, R. J. Moores, E. M. Structural Geology, 1992.

केळकर, क. वा.