पायराइट : (आयर्न पायराइट, फूल्स गोल्ड). खनिज. स्फटिक घनीय पुष्कळदा घनीय फलकांवर आडव्या रेखा असतात, शेजारच्या फलकांवरील रेखा एकमेकींना काटकोनात असतात [आकृती (अ)] स्फटिकामध्ये अष्टफलक व पायराइटोहेड्रॉन यांचे एकत्रीकरण झालेले असते [आकृती (आ) व (इ)]. याचे एकमेकांत घुसलेले जुळे स्फटिक असतात, त्यांना ‘आयर्न क्रॉस’ म्हणतात. हे खनिज द्विरूपी (एकच रासायनिक संघटन परंतु भिन्न स्फटिकसमूहांचे स्फटिक असलेले) असून ⇨मारकॅसाइट हे याचे समचतुर्भुजी रूप आहे. [→स्फटिकविज्ञान]. पायराइट संपुंजित, कणमय, वृक्काकार (मूत्रपिंडाच्या आकाराच्या), झुंबराकार इ. रूपांतही आढळते. ठिसूळ. भंजन काहीसे शंखाभ ते खडबडीत [→खनिजविज्ञान]. कठिनता ६-६.५. वि. गु. ५.०२. अपारदर्शक. चमक चकचकीत धातूसारखी. रंग पितळासारखा, गंजण्याने तो गडद होतो अगदी सूक्ष्मकणी व घट्ट प्रकार हिरवट असतो. कस हिरवट वा उदसर काळा. रा. सं. FeS2 (यात ५३.३३% गंधक असते). लोहाच्या जागी अल्पसे निकेल व कोबाल्ट आलेले असते तर आर्सेनिक, तांबे व सोने अत्यल्प प्रमाणात असू शकतात. हे सहजपणे बदलते व ऑक्सिडीकारक [→ऑक्सिडीभवन] परिस्थीतीत यापासून सजल लोह ऑक्साइड (गोएथाइट वा लिमोनाइट) तयार होते तर वातावरणक्रियेने याचे अपघटन होऊन (रेणूचे तुकडे होऊन) सल्फ्यूरिक अम्ल व आयर्न सल्फेट तयार होते. उघड्या पडलेल्या सल्फाइडी (उदा., पायराइटच्या) निक्षेपावर (साठ्यावर) वातावरणक्रिया होऊन वैशिष्ट्यपूर्ण पिवळसर उदी आवरण पृष्ठभागी तयार होते, त्याला ‘गॉसन’ म्हणतात. अशा प्रकारे गॉसन हे खाली विपुल प्रमाणात सल्फाइडी निक्षेप असल्याचे पृष्ठभागावरील निदर्शक असते.

पायराइटाचे स्फटिक

पायराइट सर्वांत सामान्यपणे व विस्तृतपणे आढळणारे सल्फाइडी खनिज असून ते बहुतेक सल्फाइडी निक्षेपांत आढळते. पायराइट बहुतेक सर्व प्रकारच्या स्थितींत तयार होते उदा., शिलारसापासून विभक्त होऊन, जलपातापीय निक्षेपांद्वारे साचून किंवा संप्लवनाने म्हणजे बाष्पाचे द्रवात रूपांतर न होता लागलीच घनात रूपांतर होण्याने (व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीत) ते तयार झालेले असते. कॅल्कोपायराइट, स्फॅलेराइट व गॅलेना ही खनिजे याच्या जोडीने आढळतात. रूपांतरित खडकांत, तसेच क्वॉर्टझ व सल्फाइडी शिरांत पायराइट आढळते. उद्गिर्ण (ज्वालामुखीतून बाहेर टाकले गेलेले) खडक व सुभाजा (सहज भुगा होणारा खडक) किंवा पाटीचा दगड यांच्यातील स्पर्शक क्षेत्रात वा त्यालगतच्या क्षेत्रात बहुधा पायराइटचे निक्षेप आढळतात. शेल, चुनखडक, दगडी कोळसा इ. गाळाच्या खडकांमध्ये प्राथमिक व द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी बनलेले) पायराइट आढळते. कधीकधी त्यांच्यात पायराइटीभूत (पायराइटाने जैव द्रव्याची जागा घेतलेले) जीवाश्मही (शिळारूप अवशेषही) आढळतात. अग्निज खडकांमध्ये हे गौण खनिज म्हणून आढळते. तांबेयुक्त पायराइटचे निक्षेप विस्तृत विखुरलेले व बहुधा मोठे असतात.

पायराइट जगात सर्वत्र आढळते. स्पेन (रिऊ टिंटू) हा सर्वांत महत्त्वाचा पायराइट उत्पादन करणारा देश असून इतर महत्त्वाचे देश पुढीलप्रमाणे आहेत :  पोर्तुगाल (सेंट गॉथर्ड), ऑस्ट्रीया (वाल्डेनस्टाइन), फ्रान्स (एल्बा बेट), ब्रिटन (कॉर्नवॉल), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (व्हर्जिनिया, टेनेसी, कॅनिफोर्निया), कॅनडा, इटली, नॉर्वे व चेकोस्लोव्हाकिया.

भारतामध्ये बिहारमधील आमजोर (सोन खोरे) येथे पायराइटाचा सु. ३९.२५ कोटी टनांचा साठा आहे. येथे पायराइटयुक्त शेल खडकांनी सु. १२५ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. येथील पायराइटात ४० % गंधक असून त्यात आर्सेनिक नाही. येथील पायराइटापासून सालीना १० लाख टन गंधकाचे उत्पादन करण्याची योजना आहे. बिहारशिवाय राजस्थान, सिमला (तारादेवी), तमिळनाडू (पोलूर), काश्मीर (लाश्टियल), कर्नाटक (चितळदुर्ग) इ. भागांत पायराइट आढळते.

इतिहासपूर्व काळात जेथे शवे पुरली जात तेथील ढिगांमध्ये पायराइट आढळले आहे. यावरून ते अग्नी निर्माण करण्याचे आदिम साधन असावे, असा अंदाज आहे. काही रेड इंडियन लोक अग्नी निर्माण करण्यासाठी पायराइट वापरीत असत. यूरोपमध्ये सतराव्या शतकात पायराइटाचे दागिने बनवीत असत. पूर्वी एका प्रकारच्या बंदुकीत स्प्रिंगने फिरविल्या जाणार्‍या दातेरी पोलादी चाकावर पायराइटाचा तुकडा घासला जाऊन ठिणगी पडण्याची योजना केलेली होती.

आता मुख्यतः सल्फर डाय-ऑक्साइड व गंधक मिळविण्यासाठी पायराइट वापरतात व त्यांचा सल्फ्यूरिक अम्ल बनविण्यासाठी वापर करतात. सल्फर डाय-ऑक्साइडाचा विरंजनासाठी (रंग घालविण्यासाठी, उदा., कागद उद्योगात) तर गंधकाचा खते इत्यादींमध्ये वापर होतो. पायराइटापासून फेरस सल्फेट (कोपरस) बनवितात व त्याचा रंग म्हणून, तसेच शाई, जंतुनाशक, प्रशीतकातील (रेफ्रिजरेटरमधील) द्रायू इत्यादींमध्ये उपयोग होतो. खनिजांच्या ⇨क्षपणासाठीही पायराइट वापरले जाते. क्वचित पायराइटापासून तांबे व सोने या धातू मिळविल्या जातात. स्पेनमधील पायराइटाचे निक्षेप तांबे मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. इतर चांगली धातुके (कच्च्या रूपातील धातू) उपलब्ध असल्याने सामान्यतः लोखंड मिळविण्यासाठी पायराइट वापरीत नाहीत मात्र पायराइट भाजून मिळणारे सिंटर थोड्या प्रमाणात उच्च प्रतीच्या लोह धातुकात मिसळण्यासाठी वापरतात.

पोलादाने पायराइटावर आघात केल्यास ठिणगी पडते. त्यावरून अग्नी अर्थाच्या पायर या ग्रीक शब्दावरून पायराइट हे नाव पडलेले आहे. पायराइट सोन्यासारखे दिसत असल्याने ते सापडल्यास सोनेच सापडले, असा समज होऊ शकतो. त्यामुळे याला मूर्खाचे सोने (फूल्स गोल्ड) असेही म्हणतात परंतु पायराइट सोन्यापेक्षा ठिसूळ व कठीण असते.

ठाकूर, अ. ना.