व्हेर्नर, आब्राहाम गॉटलोप : (२५ सप्टेंबर १७५०–३० जून १८१७). जर्मन भूवैज्ञानिक व खनिजवैज्ञानिक. सर्व खडकांची उत्पत्ती पाण्यापासून झाली आहे, असे मत असलेल्या ‘नेप्च्यूनिस्ट’ या भूवैज्ञानिकांच्या संप्रदायाचे व्हेर्नर हे प्रवर्तक आहेत. विद्यार्थ्यांना भूविज्ञानाची गोडी लावून भूविज्ञानाच्या प्रगतीस त्यांनी मोठा हातभार लावला. खनिजे व खडक यांचे पद्धतशीर वर्गीकरण त्यांनी सर्वप्रथम केले.

लोखंडाच्या खाणकामाचा पूर्वापार व्यवसाय असलेल्या घराण्यात, गर्लित्सजवळच्या वेराऊ (सॅक्सनी, जर्मनी) येथे आब्राहाम यांचा जन्म झाला. तेथील खाणकाम विद्यालय व लाइपसिक विद्यापीठ येथे शिक्षण. नंतर त्यांनी वडिलांबरोबर लोखंडाच्या खाणकाम व्यवसायात पाच वर्षे काम केले. पुढे फ्रायबर्ग येथील खाणकाम विद्यालयात निरीक्षक व अध्यापक म्हणून १७७५पासून पुढील चाळीस वर्षे त्यांनी काम केले. व्हेर्नर यांच्या कारकिर्दीत हे विद्यालय भूविज्ञानाच्या अध्ययनाचे जगप्रसिद्ध केंद्र झाले. त्यांच्याकडून स्फूर्ती घेतलेले विद्यार्थी नंतर युरोपमधील आघाडीचे भूवैज्ञानिक बनले.

व्हेर्नर यांनी सॅक्सनीतील हार्झ पर्वतातील खडकांच्या थरांचा अनुक्रम निश्चित करून त्यांचे वर्गीकरण केले. थरांचा असा अनुक्रम पृथ्वीवरील घटनांचा अनुक्रम दर्शवितो व त्यांचे वर्गीकरण सर्व पृथ्वीला लागू करता येईल, अशी त्यांची मते होती. मात्र या दृष्टीने त्यांनी इतरत्र कोठेच प्रवास व संशोधन केले नाही. सर्व पृथ्वीवर आच्छादनासारख्या पसरलेल्या एका आद्य महासागराच्या पाण्यातील द्रव्ये अनुक्रमाने (उदा. ग्रॅनाइट, बेसाल्ट इ. प्रथम आणि त्यावर गाळाचे द्वितीयक खडक) अवक्षेपित होऊन (साचून) सर्व खडक तयार झालेले आहेत, असा त्यांचा दावा होता. त्यामुळेच या मंडळींना काहीशा कुचेष्टेने नेप्च्यूनिस्ट (वरुणभक्त) म्हटले जाऊ लागले.

पृथ्वीचा गाभा वितळलेल्या रूपात आहे, हे या नेप्च्यूनिस्ट सिद्धान्ताला मान्य नव्हते. त्यामुळे ज्वालामुखी हे अलीकडच्या काळातील आविष्कार असून भूमिगत दगडी कोळशाचे थर उत्स्फूर्तपणे जळाल्याने ज्वालामुखी निर्माण झाल्याचे व्हेर्नर यांनी सुचविले. बेसाल्टसारखे पूर्वीचे ज्वालामुखीय खडक हेही महासागराच्या पाण्यामधील द्रव्यांपासून साचल्याचे त्यांचे ठाम मत होते. या मताला विरोध करणारे भूवैज्ञनिक ग्रॅनाइट, बेसाल्ट इ. खडक हे अग्निज उत्पत्तीचे मानीत. यामुळे व्हेर्नर यांचे अनुयायी विरोधी मताच्या या मंडळींना प्लुटोनिस्ट (पाताळेश्वरभक्त) किंवा व्हल्कॅनिस्ट (अग्निभक्त) या नावांनी हिणवत असत. यांतून भूवैज्ञानातील एक मोठा वाद पुढे आला. मात्र स्वत: व्हेर्नर या वादात प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत. प्लुटोनिस्ट गटाचे नेते स्कॉटिश भूवैज्ञानिक ⇨ जेम्स हटन (१७२६ – ९७) आणि नीकॉला देमारे (१७२५ – १८१५) यांच्या संशोधन कार्यांमुळेही व्हेर्नर यांच्या सिद्धान्ताला सुरुंग लागला. व्हेर्नर यांनी खनिज पदार्थांचे मूण्मय, लवणी, ज्वलनशील व धातवीय असे पद्धतशीर वर्गीकरण केले होते.

व्हेर्नर यांनी विविध ज्ञानपत्रिकांमधून छोटेमोठे असे फक्त २६ वैज्ञानिक लेख लिहिले. लिखाणाविषयी त्यांना विशेष गोडी नव्हती. त्यांचे पुष्कळसे सिद्धान्त पुढे अमान्य झाले. तथापि त्यांचे भूविद्याविषयक कार्य ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहे.

व्हेर्नर यांनी विविध खनिजे व खडक यांचे नामकरणही केले आहे. उदा.  पिचस्टोन (डांबरी खडक), ग्रॅफाइट (लिहिणे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून), प्रेहनाइट (संशोधक व्हान प्रेह यांच्या नावावरून).

ड्रेझ्डेन येथे व्हेर्नर यांचे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.