जेड : या संज्ञाखाली सारखी दिसणारी परंतु रासायनिक संघटन वेगळी असलेली नेफ्राइट आणि जेडाइट ही दोन खनिजे येतात. नेफ्राइट हे ⇨अँफिबोल गटातील खनिज असून ते ⇨ट्रेमोलाइट  या खनिजाचा चिवट आणि घट्ट प्रकार आहे. जेडाइट हे ⇨पायरोक्सीन गटातील खनिज असून त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. स्फटिक एकनताक्ष [→  स्फटिकविज्ञान]. हे सामान्यतः अस्फटिकी वा गूढस्फटिकी (अतिसूक्ष्म स्फटिकांचे बनलेले) असते. क्वचित कणांच्या स्तंभावर किंवा तंतुमय पत्रांच्या रूपांतही आढळते. भंजन धलपीसारखे परंतु फोडण्यास कठीण, चिवट कठिनता ६·५–७. वि. गु. ३·३–३·५. हातास मऊ लागते. चमक काहीशी काचेसारखी. दुधी काचेप्रमाणे पारभासी ते अपारदर्शक. रंग फिकट ते गडद हिरवा, क्वचित पांढरा किंवा पांढऱ्या रंगावर हिरवे ठिपके. रा. स. NaAl (Si2O6). याची उत्पत्ती निश्चित माहीत नसली, तरी नेफेलीन, सायेनाइट वा फोनोलाइट यांसारख्या खडकांच्या रूपांतरणाने हे तयार होत असावे. ते सर्पेटाइनामध्ये आढळते. ब्रह्मदेश, तिबेट, चीन, मेक्सिको इ. भागांत ते आढळते. जेडवरून जेडाइट नाव पडले आहे.

ही दोन्ही खनिजे चिवट, सुंदर रंगाची व चांगली झिलई होऊ शकणारी असल्याने मूल्यवान आहेत. ती अंलकार, भांडी, हत्यारे, उपकरणे, कोरीव काम, नाजूक नक्षीकाम, मूर्ती वगैरेंसाठी व रत्न म्हणूनही आग्नेय आशियात (विशेषतः चीनमध्ये) वापरतात. कधीकधी सिलिमनाइट, पेक्टोलाइट, सर्पेटाइन, व्हीस्यूव्हिअनाइट व गार्नेट यांच्या हिरव्या प्रकारांनाही जेड म्हणतात. 

ठाकूर, अ. ना.