हॉस्मनाइट : स्पिनेल गटातील हेमँगॅनिजा चे प्राथमिकखनिज आहे. याचे स्फटिक चतुष्कोणीय असून पुष्कळदा जुळे स्फटिक आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. ते कणमय वा संहत (घट्ट) रूपांतही आढळते. रा. सं. Mn2+Mn23+O4. रंग काळसर तपकिरी कस गडद तपकिरी किंवा फिकट उदी चमक पोलादासारखी कठिनता ५–५.५ वि.गु. ४.८६ [→ खनिजविज्ञान]. अतितप्त शिरांच्या रूपात किंवा बदललेल्या अवसादी (गाळाच्या) खडकांमध्ये किंवा मँगॅनीजयुक्त खनिजांच्या स्फटिकीभवनाने हॉस्मनाइट तयार होते. मँगॅनीजयुक्त खडकांच्या रूपांतरणातही ते तयार होते. बोर्नाइट, मँगॅनाइट, सिलोमिलेन इ. खनिजांबरोबर ते आढळते. 

 

हॉस्मनाइट हे खनिज अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, रशिया, चीन इ. ठिकाणी तसेच भारतात मध्य प्रदेशात आढळते. १८२७ मध्ये व्हिल्हेल्म हायडिंजर यांनी या खनिजाला योहान फ्रीड्रीख लूटव्हिख हॉस्मन (१७८२–१८५९) यांच्या नावावरून हॉस्मनाइट हे नाव दिले. हॉस्मन हे जर्मनीतील गटिंगेन विद्यापीठात खनिजविज्ञानाचे प्राध्यापक होते. 

बरीदे, आरती