लॅकोलिथ : (लॅकोलाइट). गाळाच्या खडकांच्या थरांदरम्यान शिलारस घुसून तयार झालेली अग्निज खडकाची मोठी भिंगाकार राशी. लॅकोलिथाचा माथा घुमटाकार व तळ सपाट असतो. सर्वांत साध्या प्रकारात याचा तळ वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असतो व तळाचे खडक जवळजवळ क्षितिज समांतर असतत. यांचा व्यास बहुधा १६ किमी.पेक्षा कमी आणि जाडी शेकडो ते काही हजार मी. असते. सर्वसाधारणपणे लॅकोलिथ ट्रॅकाइटासारख्या सिकत ते मध्यम सिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त वा मध्यम प्रकारचे असलेल्या) खडकांचे बनलेले असते. 

खोलवरून शिलारस दंडगोलाकार किंवा लांबट भेगेसारख्या वाहिनीतून वर येतो. वर येणाऱ्या शिलारसाचा द्रवीय दाब पुरेसा जास्त असला म्हणजे गाळाच्या खडकांचे वरचे थर वर उचलले वा रेटले जातात. सिकत शिलारस अधिक श्यान (दाट) असल्याने तो दूरवर झटपट पसरला न जाता त्याची रास तयार होते व या राशीला घुमटाकार प्राप्त होतो (उलट बेसाल्टी लाव्हा तरल असल्याने लगेच दूरवर पसरून त्याची वडीसारखी चापट राशी तयार होते). कमानीप्रमाणे वाकलेल्या या गाळाच्या खडकांच्या थरांना तडे जाऊन भेगा पडतात. या भेगांत शिलारस घुसून⇨भित्ती तयार होतात. उलट लॅकोलिथाच्या सपाट तळात क्वचितच भित्ती आढळतात. काहींच्या मते खालून येणाऱ्या शिलारसाचे प्रमाण तो पसरला जाण्याच्या वेगाहून जास्त असले, तरी अशी घुमटाकार राशी निर्माण होऊ शकते.

अमेरिकेच्या उटा राज्यातील हेन्री पर्वतातील अशा राशींचे वर्णन सर्वप्रथम जी. कार्ल गिल्बर्ट यांनी १८७७ साली केले आणि कुंड व दगड या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून त्यांनी तिला ‘लॅकोलिथ’ हे नाव दिले. येथे गाळाच्या खडकांच्या थरांदरम्यान शिलारस घुसून या राशी बनलेल्या आहेत. ⇨शिलापट्टांच्या मानाने लॅकोलिथे कमी क्षेत्रावर (हेन्री पर्वतातील राशींचा व्यास १ ते ८ किमी.) पसरलेली असतात मात्र त्यांची जाडी (या भागात १,५०० मी. पर्यंत) अधिक असते. यांची जाडी मध्याकडून सीमावर्ती भागाकडे जाताना कमी होत गेलेली आढळते. यामुळे या लॅकोलिथाच्या पृष्ठभागाचा उतार तीव्र होत गेल्याचे आढळते. परिणामी कडेलगतचा भाग शिलापट्टासारखा भासतो. शिलारसाची वाढती श्यानता व तो निवून घट्ट आणि टणक होण्याची क्रिया यांच्यामुळे सीमावर्ती भागातील याचा उतार फारच तीव्र झालेला (म्हणजे जवळजवळ उभा) आढळतो. लॅकोलिथाच्या संपर्कामुळे त्याच्या सभोवतालच्या खडकांत पुष्कळ बदल होतात. कित्येकदा या खडकांचे मोठे तुकडे लॅकोलिथात बुडालेले आढळतात. असे तुकडे शिलारसात अंशतः वितळले वा शोषले गेल्याने त्यांच्यात भौतिक व रासायनिक बदल झालेले आढळतात.

शिलारस घुसण्याची क्रिया नंतरही चालूच राहिली तर वरच्या भागात विभंग (तडे) निर्माण होतात. परिणामी शिलारस वाहून आणणाऱ्या वाहिनीवरच्या गाळाच्या खडकाला जणू दंडगोलाकार भोक पडते व या अग्निज राशीभोवती कमानीच्या आकाराचे विभंग निर्माण होतात. अग्निज खडकांच्या अशा अंतर्वेशित (घुसलेल्या) राशीला बिस्मॅलिथ म्हणतात. 

 

हेन्री पर्वतातील लॅकोलिथे २,००० ते ३,५०० मी. खोलीवर आढळली असून तेथे एकाच कालातील लॅकोलिथे बहुधा जवळजवळ आढळली आहेत. तसेच आधीच्या लॅकोलिथाच्या बाजूवर वा बगलेवर नंतर दुसरे लॅकोलिथ निर्माण होऊन संयुक्त लॅकोलिथ तयार झालेले आहे. वरच्या खडकांची झीज होऊन उघडी पडलेली लॅकोलिथे टेकड्यांप्रमाणे मागे राहतात. झीज होण्याच्या अवस्थेनुसार या टेकड्यांचे आकार वेगवेगळे दिसतात. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात (उदा., कोलोरॅडो पठार) अशा अनेक राशी आढळल्या आहेत. दक्षिण स्कॉटलंड, पश्चिम इंग्लंड (उदा., टिंटो टेकडी, लँकाशर), दक्षिण अमेरिकेचा पश्चिम भाग इ. इतर प्रदेशांतही लॅकोलिथे आढळली आहेत. मात्र ब्रिटन व इतर काही ठिकाणी अशी वैशिष्ट्ये दर्शविणाऱ्या विविध प्रकारच्या अग्निज राशींनाही लॅकोलिथ म्हटले जाते. उदा., अशा काही राशींचा तळ सपाट नसून वक्र आहे तर इतर काही राशी विसंगतीच्या काहीशा सपाट पृष्ठभागाला अनुसरून घुसरलेल्या आहेत.

पहा : अग्निज खडक. 

ठाकूर, अ. ना.