माँझोनाइट : खडक. या पातालिक (खोल जागी तयार झालेल्या) अग्निज खडकात प्लॅजिओक्लेज व पोटॅश फेल्स्पार ही खनिजे समप्रमाणात असतात व एकूण फेल्स्पारे विपुल असतात. याचे स्थान ⇨ सायेनाइट व ⇨ डायोराइट या खडकांच्या मधले असल्याने याला ‘सायेनोडायोराइट’ असेही म्हणतात.

माँझोनाइटातील प्लॅजिओक्लेज हे अधिक कॅल्सिक प्रकारचे [अँडेसाइन ते लॅब्रॅडोराइ ⟶ फेल्पार गट] असून ऑर्थोक्लेज हे पोटॅश फेल्पार यात असते. कोणत्याही एका फेल्पाराचे प्रमाण एकूण फेल्स्पारांच्या / ते / इतके असते. यांशिवाय यात थोडे कृष्णाभ्रक व हॉर्नब्लेंड, कधीकधी ऑजाइट असते. प्रसंगी क्वॉर्ट्‌झ नेफेलीन, हायपर्स्थीन वा ऑलिव्हीन ही खनिजेही यात आढळतात व त्यानुसार त्याला नावे देतात (उदा., क्वॉर्ट्‌झ माँझोनाइट).स्फीन, झिर्‌कॉन, ॲपेटाइट, मॅग्नेटाइट वा पायराइट ही यात आढळणारी गौण खनिजे आहेत.

माँझोनाइटाचे वयन (पोत) कणमय असून यातील स्फटिक नुसत्या डोळ्यांनी दिसतील एवढे मोठे असतात. सायेनाइटापेक्षा याचा रंग अधिक गडद असतो कारण यात गडदरंगी खनिजे आधिक प्रमाणात असतात. मात्र हे दोन खडक वेगळे ओळखून काढण्यासाठी त्यांचे सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण करावे लागते. 

सामान्यपणे माँझोनाइटाच्या लहान आणि असमांग राशी डायोराइट, पायरोक्सिनाइट अथवा ग्रॅब्रो यांच्याबरोबर आढळतात. ग्रॅनाइट ग्रॅनोडायोराइट किंवा टोनॅलाइट यांच्या ⇨ बॅथोलियांच्या भोवती माँझोनाइटाची द्वितीयक अंतर्वेशने (नंतर घुसलेल्या राशी) आढळतात. नॉर्वे (ॲकेराइट), अमेरिकेतील माँटॅना (योगोआइट, शँकिनाइट) सॅकालिन बेट इ. प्रदेशात माँझोनाइटासारखे खडक आढळतात. मादागास्करात नेफेलीन माँझोनाइट, तर ऑस्लोजवळ ऑलिव्हीन माँझोनाइट आढळतात. सौराष्ट्रातील दक्षिण ट्रॅपमध्ये माँझोनाइट आढळले आहेत.

काही माँझोनाइट मॅफिक (मँगॅनीज व लोहयुक्त गडद खनिजांचे प्रमाण अधिक असलेला) शिलारस व सिलिसिक (सिलिकायुक्त) देशीय खडक यांच्यातील तर काही सिलिसिक शिलारस मॅफिक अंतर्वेशी खडक यांच्यातील विक्रियेने बनले असावेत. काही माँझोनाइट धातुक निक्षेपांत (कच्चा धातूंच्या राशींत). व त्यांच्या लगत आढळतात. यावरून या दोघांमध्ये उत्पत्तीच्या दृष्टीने संबंध असावा, असे काहींचे मत आहे.

ईशान्य इटलीतील माँझोनी पर्वतावरून याला फ्रांट्‌स फोन कोबेल (१८०३–८२) यांनी माँझोनाइट हे नाव दिले (१८७१).

पहा : सायेनाइट.

ठाकूर, अ. ना.