अँग्‍लिसाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, स्फटिकांच्या आकारात अतिशय विविधता आढळते. अनेक प्रकारचे फलक असलेले, जटिल आकाराचे स्फटिक वारंवार आढळतात. कधीकधी ते (001) ला समांतर अशा चापट वडीसारखे असतात. पुष्कळदा ते कोणत्याही एका स्फटिक अक्षास समांतर अशा प्रचिनासारखे असतात. प्रसूच्याकार ठेवणींचे स्फटिकही आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. सूक्ष्मकणी, घट्ट किंवा कणमय पुंजांच्या किंवा झुंबरकार किंवा गाठीसारख्या स्वरूपातही हे खनिज आढळते. पाटन : (001) व (110) स्पष्ट पण तुटक  [→ पाटन]. भंजन शंखाम [ → खनिजविज्ञान]. अतिशय ठिसूळ. कठिनता २·७५–३. वि.गु. अति–उच्च ६·३–६·४. पारदर्शक ते अपारदर्शक. चमक काही नमुन्यांची तेजस्वी हिऱ्यासारखी, इतरांची राळेसारखी किंवा काचेसारखी. रंग पांढरा, फिकट पिवळा, करडा किंवा हिरवा. कस रंगहीन. रा. सं. PbSO4. शिशाचा गौण धातुपाषाण. शिशाचे धातुपाषाण असणाऱ्या शिरांच्या पृष्ठाजवळच्या भागात गॅलेना, सेऱ्युसाइट इ. शिशाच्या खनिजांच्या जोडीने आढळते. नाव ‘अँगलसी’ बेटावरून. 

ठाकूर, अ. ना.