प्लायोसीन : (अतिनूतन). भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. काळाच्या विभागाला प्लायोसीन युग व त्या युगात तयार झालेल्या खडकांच्या गटाला प्लायोसीन माला म्हणतात. हा तृतीय कल्पाचा (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षापूर्वीच्या काळाचा) शेवटचा विभाग असून त्यात सु. २ ते १·२ कोटी वर्षापूर्वीचा काळ येतो. चार्ल्‌स लायेल यांनी १८३२ मध्ये प्लायोसीन ही संज्ञा सुचविली असून १९४८ साली इंटरनॅशनल जिऑलॉजिकल काँग्रेसने प्लायोसीन व ⇨ प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीचा काळ) यांच्यातील सीमा इटलीतील जीवाश्मांवरून (जीवांच्या शिळारूप झालेल्या अवशेषांवरून) निश्चित केली.

या युगात जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) सुरुवातीला उपोष्ण होते. नंतर याच्या मध्यास ते आजच्यासारखे पण शुष्क झाले व शेवटी हळूहळू ते शीत होत गेले. याचा त्या काळातील जीवांवर परिणाम झाला. या काळात हिमालयाच्या व ईस्ट इंडिजसारख्या अतिशय अस्थिर भागांत पर्वत निर्माण करणाऱ्या पुष्कळ हालचाली झाल्या व गाळही साचत गेला. यूरोपात एटना व व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखी उत्पन्न झाले व वाढले. पूर्व यूरोपावरून व तुर्कस्तानावरून सागर मागे हटला, तसेच उत्तर समुद्र अधिक उत्तरेकडे मागे गेला. या काळात सर्व खंडांची स्थिती जवळजवळ आजच्याप्रमाणेच झाली होती.

द. अमेरिका व ऑस्ट्रेलिया सोडता या काळातील ८० टक्के प्राणी आजही आहेत. प्लायोसीनच्या अखेरीस सध्याचे पुष्कळ वंश अवतरले होते. उत्तर गोलार्धातील पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांत अत्याधुनिक वैशिष्ट्ये आली होती. या काळी मासे, सरीसृप (सरपटणारे), उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी व पक्षी विपुल होते. तसेच शिंपाधारी, शंखधारी व फोरॅमिनीफर प्राणी विषुववृत्ताकडे गेले. या काळात सामान्यपणे सस्तन प्राण्यांचे आकारमान व संख्या वाढली. वर्तमान काळापेक्षा प्लायोसीन काळामध्ये सस्तन प्राणी विविध प्रकारचे होते मात्र यापूर्वीच्या मायोसीन (सु. ३·५-२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळापेक्षा कमी होते. थोड्या सस्तन प्राण्यांत बदल झाले व काही निर्वंश झाले. गेंडे कमी झाले. हत्ती, झीब्रा व पाणघोडे आफ्रिकेत गेले आर्मडिलो, कॅपिबारा, साळू, अस्वले द. अमेरिकेतून उत्तरेकडे गेले शिवाथेरियम व सामोथेरियम यापासून आधुनिक जिराफ उत्क्रांत झाले. मेंढ्या, घोडे, उंट इत्यादींचा क्रमविकास (उत्क्रांती) व प्रसार झाला. मांसाहारी प्राण्यांचा विकास होऊन त्यांची संख्या शाकाहारींपेक्षा जास्त झाली. असिदंत (तलवारीसारखे दात असलेल्या) वाघांचा सर्वाधिक विकास या काळात झाला. मॅस्टॅडॉन (हत्तीसारख्या) प्राण्यांचा या काळात पुष्कळ क्रमविकास होऊन त्यांचे भिन्नभिन्न परिसरांत जगण्यायोग्य असे अनेकविध प्रकार निर्माण झाले. या काळात नरवानर गणाचे अधिक प्रगत प्राणी (उदा., मानवसदृश कपी) उत्क्रांत झाले. या काळाच्या शेवटी मानवासारखा प्राणी अवतरला असावा.

या काळातील खडक हे सामान्य वालुकाश्म असून त्यांच्यात जैव आणि रासायनिक उत्पत्तीचे खडक कमी आहेत. हे खडक उथळ सागरांत व मोठ्या नद्यांच्या मुखात साचले असून त्यांची जाडी सु. ४,५०० मी. पर्यंत आहे. प्लायोसीन मालेचे खडक उ. अमेरिका, द. यूरोप (फ्रान्स, स्पेन, ग्रीस, इटली), द. अमेरिका, आशिया (चीन, भारत इ.) व ऑस्ट्रेलिया या भागांत आढळतात. भारतामध्ये मक्रान माला सागरी आणि ⇨ शिवालिक संघ गोड्या पाण्यात तयार झालेले निक्षेप (खडकांच्या राशी) आहेत. वर्तमान काळातील अनेक प्राणिजाती प्लायोसीनमध्ये होत्या, हे या निक्षेपांतील जीवाश्मांवरून दिसून येते. पूर्व प्लायोसीन काळातील हिप्पेरिऑन, मेरिकोपोटॅमस, पाणघोडे, म्हशी, गेंडे, हरणे इत्यादींचे जीवाश्म आढळले आहेत. या काळात भारतात स्टेगोडॉन हे मॅस्टॅडॉनांपेक्षा जास्त होते.

पहा : तृतीय संघ नवजीव.

ठाकूर. अ. ना.