अरवली संघ: भारतातील एका ⇨ आर्कीयन कालीन खडकांच्या संघाचे नाव. अरवली पर्वताच्या खडकांपैकी काही खडक या संघाचे आहेत. अरवली विक्षोभित खडकांचा बनलेला असून त्याच्या विक्षोभाच्या अक्षाची दिशा व अरवलीच्या रांगांच्या दिशा या जवळजवळ समांतर व उत्थापनाच्या अक्षाच्या दिशेशी संपाती (जुळणाऱ्‍या) आहेत. अरवली हा सांरचनिक पर्वत-रांगांचे उत्कृष्ट उदारहण आहे. आर्कियन कल्पातला अरवली संघ व पुराणकल्पाच्या पूर्वार्धातला ⇨ दिल्ली संघ यांचे थर जोराने दाबले जाऊन व त्यांना घट्ट घड्या पडून निर्माण झालेली एक समधोवली [⟶ घड्या, खडकांतील] असे अरवलीच्या संरचनेचे स्वरूप आहे. एक महान विपरीत विभंग निर्माण होऊन अरवलीच्या समधोवलीची आग्नेय सीमा मर्यादित झालेली आहे. या विभंगामुळे अरवली संघाचे अती विक्षोभित खडक व विंध्य संघाचे अविक्षोभित व जवळजवळ सपाट थर एकमेकांलगत आणले गेले आहेत. या विभंगास ‘राजपुतान्यातील महान सीमा-विभंग’ असे नाव आहे तो आग्र्यापासून नैर्ऋत्येकडे व चंबळ नदीच्या प्रवाहाच्या दिशेस जवळजवळ समांतर अशा मार्गाने सु. आठशे किमी. इतका दूर पसरला आहे.

 

अरवली संघाचे खडक अलवरच्या दक्षिणेपासून तो गुजरातच्या उत्तर भागातील चांपानेरपर्यंतच्या प्रदेशात, मुख्यत: मेवाड, अजमीर-मेरवाड, चितोड या भागांत, आढळतात. या संघाची जाडी प्रचंड, म्हणजे तीन हजार मीटरांहून अधिक, असून त्याचा बहुतेक भाग शेल, स्लेट, फिलाइट व अभ्रकी सुभाजा यांचा म्हणजे मृण्मय खडकांचे कमीअधिक रुपांतरण होऊन तयार झालेल्या खडकांचा आहे. हे खडक असलेल्या प्रदेशात वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना उत्तरोत्तर कमी रूपांतरण झालेले खडक सामान्यतः आढळतात. संघाच्या तळाशी सामान्यतः ⇨ पिंडाश्माचा, ⇨ क्वॉर्ट्‌झाइटाचा किंवा ⇨ अार्कोजाचा पातळसा थर असतो. त्याच्या जरा वरती लोही चुनखडकाचा पातळ थरही पुष्कळ ठिकाणी आढळतो. संघाच्या मुख्य मृण्मय राशीत मधूनमधून क्वॉर्ट्‌झाइटाचे किंवा चुनखडकाचे थर व अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असणाऱ्या) शिलापट्टांचे रूपांतरण होऊन तयार झालेले थोडे एपिडायोराइट सापडतात. संघाच्या माथ्याशी क्वॉर्ट्‌झाइट व क्वचित लाव्हे आढळतात. स्लेटीत किंवा फिलाइटात ग्रॅनाइटाचे अंतःक्षेपण होऊन वा घुसून तयार झालेले संमिश्र पट्टिताश्म मेवाडात, इडारात व इतर काही भागांत सापडतात.

 

अरवलीच्या रांगांच्या मध्याजवळील भागात कँब्रियन-पूर्व थरांस घड्या पडून निर्माण झालेली जी प्रचंड समधोवली आहे तिच्यातील खडकांचे अरवली संघ, ⇨ रायालो माला व दिल्ली संघ असे तीन भाग पडतात. अरवली संघ तळाशी असून त्याच्यावर रायालो मालेचे व रायालो मालेवर दिल्ली, संघाचे खडक विसंगतपणे वसलेले आहेत. अरवली संघ आर्कीयन कालीन आहे हे सर्वांस मान्य आहे. तो दक्षिण भारतातील धारवाड संघाशी स्थूलमानाने तुल्य आहे असे मानले जाते. राजस्थानातील ⇨जटिल पट्टिताश्म समूहापेक्षा व बेराचच्या दरीतल्या म्हणजे  ⇨ बुंदेलखंडी ग्रॅनाइटापेक्षा अरवली संघ नवा असून तो त्या खडकांच्या झिजलेल्या पृष्ठावर विसंगतपणे वसलेला आहे, असे ए. एम्. हेरन यांचे म्हणणे आहे.

 

राजस्थानच्या काही भागांचे सर्वेक्षण प्रथम एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या तीस वर्षात झाले. ‘अरवली संघ’ हे सी. ए. हॅकेट यांनी दिलेले नाव आहे (१८७७). विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या सु. वीस वर्षांत हेरन व त्याचे साहाय्यक यांनी सर्व राजस्थानाचे सर्वेक्षण केले. त्यांच्या कार्यावरुनच राजस्थानातील शैलसमूहांची आता उपलब्ध असलेली माहिती मिळालेली आहे. राजस्थानातील खडकांची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. अरवली संघ हा बेराच ग्रॅनाइटाच्या व जटिल पट्टिताश्म समूहाच्या झिजलेल्या पृष्ठावर विसंगतपणे वसलेला आहे याविषयी निःसंदिग्ध दृश्य पुरावा मिळालेला नाही. तो त्या दोहोंपेक्षा जुना असावा, असेही काहींचे मत आहे. म्हणून अधिक सविस्तर अध्ययन करुन वर उल्लेख केलेल्या खडकांमधील संबंधाविषयी अधिक पुरावे मिळविणे आवश्यक आहे.

 

केळकर, क.वा.