ॲक्टिनोलाइट : अँफिबोल गटातील एक खनिज. स्फटिक एकनताक्ष, लांब किंवा आखूड पात्यासारखे, स्तंभाकार किंवा तंतुमय, क्वचित कणमय किंवा संपुंजित स्वरूपात आढळते [→ स्फटिकविज्ञान]. दुधी काचेप्रमाणे पारभासी ते पारदर्शक. कठिनता ५-६. वि.गु. ३–३·२. रंग फिकट, गडद किंवा भडक हिरवा. रा. सं. Ca2 (Mg, Fe)5(OH)2(Si4O11)2. या सूत्रातील मॅग्नेशियमाच्या जागी आलेले फेरस लोह २% पेक्षा अधिक असते. ॲस्बेटस म्हणून तंतुमय ॲक्टिनोलाइटाचा क्वचित उपयोग करतात. आर्कीयन कालीन रूपांतरित (बदललेल्या) खडकांत ॲक्टिनोलाइटाच्या सुभाजा (सहज फुटणारे खडक) आढळतात. नाव ‘किरण’ व ‘दगड’ या अर्थांच्या ग्रीक शब्दांवरून पडले आहे.

 

पहा : अँफिबोल गट.

 

 ठाकूर, अ. ना.