हॉलंडाइट : मँगॅनीज धातूचे प्रमुख खनिज. स्फटिक एकनताक्ष व लहान प्रचिनाकार ते धाग्याप्रमाणे तंतुरूपातही आढळते [→ स्फटिक-विज्ञान]. रंग काळा वा रुपेरी करडा कस काळा भंगुर चमक मंद धातूसारखी कठिनता ४–६ वि. गु. ४.९५ [→ खनिजविज्ञान]. रा. सं. Ba(Mn2+, Mn4+)8O16 म्हणजे बेरियम व मँगॅनीज यांचे मँगॅनेट. कधीकधी यात सोडियम, शिसे व फेरिक लोह यांचे आयन (विद्युत् भारित अणू) असतात. चपज६ चे अष्टफलक एकावर एक रचले जाऊन बोगद्यासारखी वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होते. 

 

मँगॅनीज खनिजांच्या पायरोल्यूसाइट-मँगॅनाइट समूहातील हॉलंडाइट हे महत्त्वाचे खनिज आहे. त्यामुळे मँगॅनीज मिळविण्यासाठी आणि सुशोभनासाठी ते वापरतात. 

 

हॉलंडाइट हे भारतात मध्य प्रदेशातील मँगॅनिजाच्या धातुकांच्या (कच्च्या रूपातील धातूच्या) निक्षेपांत आढळते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे संचालक टी. एच्. हॉलंड (१८६८–१९४७) यांच्या नावावरून या खनिजाचे नाव हॉलंडाइट असे ठेवण्यात आले. 

 

पहा : मँगॅनीज. 

बरीदे, आरती