ॲनॉर्थाइट : खनिज. स्फटिक त्रिनताक्ष गटातील, सामान्यत: उभ्या अक्षाला समांतर असलेल्या प्रचिनासारखे असतात. ते क्वचित साधे व सामान्यत: यमल असतात [→ फेल्सपार गट स्फटिकविज्ञान]. पाटन : (001) उत्कृष्ट, (010) उत्तम [→ पाटन]. भंजन शंखाभ ते खडबडीत. ठिसूळ. कठिनता ६-६·५०. वि. गु. २·७४-२·७६. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंग पांढरा, किंचित करडा किंवा तांबूस. कस रंगहीन. रा. सं. Ca Al2 Si2 O8 [→ खनिजविज्ञान]. सामान्यत: याच्यात थोडे अल्बाइट असते. ॲनॉर्थाइट हे ‘फेल्सपार’ नावाच्या महत्त्वाच्या गटातील खनिज आहे. ते सामान्यतः अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) अग्निज खडकांत आढळते.

ठाकूर, अ. ना.