सेपिओलाइट : हे जटिल सजल मॅग्नेशियम सिलिकेट मृत्तिका खनिज आहे. त्याचे स्फटिक बहुतकरून एकनताक्ष असून ते रचनेच्या बाबतीत अँफिबोलांसारखे असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. सूक्ष्मदशर्कात ते तंतुमय व चूर्णरूप द्रव्यांच्या मिश्रणासारखे दिसते व त्याचा पोत घट्ट भासतो. कठिनता २·२५ वि. गु. २ भंजन शंखाभ. त्याच्या आंतरगुंफित दिशाहीन तंतूंचा संपुंजित पुंजका अतिशय सच्छिद्र असून तो कोरडा असताना पाण्यावर तरंगतो. त्यात पाणी शोषले जाते. सेपिओलाइटाची चमक मातकट रंग करडसर पांढरा, तांबूस, पिवळसर वा सायरंगी दुधी काचेप्रमाणे पारभासी स्पर्श मऊ [→ खनिजविज्ञान]. रा. सं.  Mg4(Si6O15)(OH)2·6H2O जादा सजलीकरणामुळे यात बदल होतो. उच्च तापमानाला बंद नळीत तापविल्यास त्यातून पुष्कळ पाणी बाहेर पडून जळका वास येतो. कमी घनता, मऊ स्पर्श व घट्ट स्वरूप यांमुळे सेपिओलाइट इतर खनिजांपासून वेगळे ओळखता येते. त्यावर सहजपणे कोरीवकाम करता येते. मेणाने त्याला चांगले पॉलिश होते आणि गरम केल्यावर ते कठीण होते.

सेपिओलाइट ग्रंथिल पुंजक्यांत द्वितीयक खनिजाच्या रूपात सर्पेंटाइन, मॅग्नेसाइट यांसारख्या इतर मॅग्नेशियम खनिजांबरोबर व ओपलबरोबरही आढळते. तुर्कस्तानातील एस्की-शेरजवळील पठारावर स्तरित, मृण्मय किंवा जलोढीय निक्षेपांत ते ग्रंथिल रूपात आढळते. तेथील त्याचे साठे सर्वांत मोठे असून ते सर्पेंटाइनात बदल होऊन बनले आहेत. काढल्यानंतर काही काळ ते मऊ असते परंतु सुकू लागले की कठीण होत जाते. स्पेन, उत्तर आफ्रिका व अरबस्तान येथेही त्याचे साठे असून उत्पादन होते. शिवाय ग्रीस, झेक प्रजासत्ताक, फ्रान्स, मोरोक्को व अमेरिका येथेही ते आढळते.

भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील भागांत तंबाखू ओढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आकर्षक अशा मीरशौम (खनिजाच्या नावावरून आलेल्या) धूम्रनिलकांसाठी (पाइपांसाठी) मुख्यतः सेपिओलाइट खनिज वापरतात. हाताळण्याने व आत जळणाऱ्या तंबाखूमधून स्रवणारा रस शोषला गेल्याने या धूम्रनलिकेवर तपकिरी लेप तयार होतो. या आकर्षक लेपामुळे हे खनिज मूल्यवान मानतात. वाडग्यासारख्या शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी, सुशोभनासाठी व खनिज तेल छिद्रनासाठी, तसेच तेलाचा रंग घालविणारे शोषक द्रव्य, कीटकनाशकाचे वाहक द्रव्य आणि भरण द्रव्य म्हणूनही सेपिओलाइट वापरतात.

वजनाला हलकी व सच्छिद्र हाडे असलेल्या सेपिया (कटलफिश) या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून सेपिओलाइट हे नाव पडले आहे. समुद्रफेसासारखे दिसत असल्यामुळे त्याला जर्मन भाषेत त्या अर्थाचे सी-फोम हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.