एक्लोजाइट : खडक. गडद हिरव्या स्फटिकांच्या भरडकणी राशीत लाल खडे विखुरलेले असावेत तसा हा खडक असतो. हिरवे स्फटिक पायरोक्सिनाच्या एका प्रकाराचे म्हणजे ओंफॅसाइटाचे व लाल खडे गार्नेटाचे असतात. वरील दोन खनिजे ही एक्लोजाइटांची आवश्यक खनिजे होत. क्वचित पाचूसारखे भडक हिरवे क्रोम डायोप्साइड, कायनाइट व क्वॉर्टझ यांसारखी गौण खनिजे अल्प प्रमाणात आढळतात.

     एक्लोजाइटाची घनता (३·३५–३·६) ऑलिव्हीन गॅब्रोच्या घनतेपेक्षा निश्चित अधिक असते. या दोन्ही खडकांचे रासायनिक संघटन सारखेच असते, पण घटक खनिजे मात्र अगदीच वेगळी असतात. याचे कारण ते अगदी वेगळ्या परिस्थितींत तयार झालेले असतात हे होय. एक्लोजाइटाच्या उत्पत्तीविषयी दोन कल्पना आहेत. ज्या जागी शिलारस निवून ऑलिव्हीन गॅब्रो तयार होतो, तिच्यापेक्षा अधिक खोल व अधिक दाब-तापमान असलेल्या जागी तोच शिलारस निवून एक्लोजाइट तयार झालेला असावा म्हणजे तो अग्निज खडक असावा. दुसरी कल्पना अशी की, ऑलिव्हीन गॅब्रो हा अतिशय खोल जागी नेला जाऊन व त्याचे पुन्हा स्फटिकीभवन होऊन एक्लोजाइट तयार झालेला असावा म्हणजे तो रूपांतरित खडक असावा.

नमुनेदार एक्लोजाइटात सजल खनिजे नसतात. एक्लोजाइटाच्या काही प्रकारांत एन्स्टॅटाइट व हॉर्नब्लेंड ही खनिजे असतात. पण बहुतेक सर्व प्रकार फेल्स्पारविहीन असतात. ग्रीनलंड, नॉर्वे, फ्रान्स, बव्हेरिया, दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ली येथल्या हिरे असणाऱ्या खडकांत व भारतात सेलम येथल्या खडकांत एक्लोजाइट आढळलेला आहे.

एक्लोजाइट विरळाच व लहानशा गाठीसारख्या, भिंगासारख्या किंवा अनियमित राशींच्या किंवा शिरांच्या स्वरूपात व सामान्यत: आर्कीयन कालीन खडकांत आढळतो. एक्लोजाइटाचे खनिज घटक, घनता इ. गुणधर्म असामान्य प्रकारचे आहेत. तो मूळ पृथ्वीच्या कवचाच्या खोल भागात तयार झाला असावा व कोणत्या तरी रीतीने उथळ भागात आणला गेला असावा असे दिसते. पृथ्वीच्या कवचाच्या खालचे प्रावरण एक्लोजाइटाचे असावे, अशी एक कल्पना आहे.

पहा : पृथ्वीचे अंतरंग रूपांतरित खडक.

केळकर, क. वा.