होलोसीन : (नूतनतम काळ किंवा युग) . भूवैज्ञानिक इतिहासाच्या सर्वांत अलीकडच्या व चालू विभागाचे हे नाव आहे. या कालविभागाला नूतनतम किंवा हिमनद-पश्च कल्प वा काळ म्हणतात आणि या काळात तयार झालेले खडक, प्रक्रिया, घटना व पर्यावरण यांनाही होलोसीन म्हणतात. हाचतुर्थ कल्पातीलप्लाइस्टोसीननंतरचा काळ असून तो गेली दहा हजार वर्षे ते आजपर्यंतचा काळ मानतात. पूर्वी यालारीसेंट किंवा अभिनव कल्प म्हणत असत. हा प्लाइस्टोसीनच्या शेवटच्या टप्प्यानंतरचा काळ असून सापेक्षतः उबदार जलवायुमानीय (दीर्घकालीन सरासरी हवामानाची) परिस्थिती ही या काळाचे गुणवैशिष्ट्य आहे. मानवाच्या इतिहासाच्या दृष्टीने होलोसीन महत्त्वाचा काळ आहे. कारण आधीच्या अश्मयुगानंतरच्या काही हजार वर्षांत माणसाने विकसितकेलेल्या कौशल्यामुळे सध्याची सांस्कृतिक पातळी गाठली गेली आहे.या काळात मानवी व्यवहारांमुळे पृथ्वीच्या पर्यावरणात पुष्कळ फेरबदल झाले आहेत. 

 

ब्रिटिश भूवैज्ञानिक चार्ल्स लायेल यांनी मानवी अस्तित्वाच्या काळा-साठी रीसेंट ही संज्ञा वापरली होती (१८३३). मात्र मानवाचे अस्तित्व १०,००० वर्षांपेक्षा बरेच जास्त काळ असल्याचे माहीत झाले आहे. १८४६ मध्ये फोर्बझ यांनी पोस्टग्लेशिअल (हिमनद-पश्च) ही संज्ञा रीसेंटसाठी सुचविली. मात्र ही संज्ञा उचित नाही. कारण मध्य अक्षांश प्रदेशात हिमनद-पश्च कालावधी सुरू झाल्यानंतर काही हजार वर्षानंतरही उच्चतर अक्षांशांच्या प्रदेशांत हा कालावधी सुरू झाला नव्हता. १८६७ मध्ये प्लाइस्टोसीननंतरच्या काळासाठी होलोसीन (पूर्णतया अभिनव) ही संज्ञा रीसेंटसाठी सुचविली मात्र ही संज्ञा उचित नाही. कारण मध्य अक्षांश प्रदेशात हिमनद-पश्च कालावधी सुरू झाल्यानंतर काही हजार वर्षानंतरही उच्चतर अक्षांशांच्या प्रदेशांत हा कालावधी सुरू झाला नव्हता. १८६७ मध्ये प्लाइस्टोसीननंतरच्या काळासाठी होलोसीन (पूर्णतया अभिनव) ही संज्ञा सुचविण्यात आली. १८८५ मध्ये ती इंटरनॅशनल जिऑलॉजिकल काँग्रेससमोर अधिकृतपणे सादर करण्यात आली. यू. एस्. जिऑलॉजिकल सर्व्हेने होलोसीन ही संज्ञा अधिकृतपणे स्वीकारली (१९६७) आणि १९६९ मध्ये यू. एस्. कमिशन ऑन स्ट्रॅटिग्राफिक नॉमेन्क्लेचरने तीनिश्चित केली. 

 

शेवटच्या हिमनादेय टप्प्याच्या अखेरच्या काळानंतर हिमनादेय क्रियेच्या पुढील वाटचालीची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. जलवायुमान मोठ्या प्रमाणात उबदार होण्याची घटना म्हणजे जलवायुमानाचे मोठ्या प्रमाणातील तापन सु. १३,००० वर्षांपूर्वी घडून आले. खोल महासागरी अवसाद (गाळ) आणि पश्चिम यूरोपातील वनस्पती व कीटक यांचे जीवाश्म (शिळाभूत झालेले अवशेष) यांद्वारे या घटनेचा पडताळा येऊ शकतो. हे तापन खंडित स्वरूपाचे होते आणि उत्तर अमेरिकेत प्रचंड हिमस्तर ७,५०० वर्षांपेक्षा कमी काळापर्यंत लॅब्रॅडोरमध्ये रेंगाळलेले होते. होलोसीन कल्पाचा उदय केव्हा झाला, हे जलवायुमानाच्या आधारे ठरविणे अवघड आहे. मात्र कालनिर्णय करणाऱ्या किरणोत्सर्गी कार्बन पद्धतीने होलोसीनची सुरुवात १०,००० किरणोत्सर्गी कार्बन वर्षे बीपी ला झाल्याचा निष्कर्ष काढला आहे ऽ बीपी (बिफोर द प्रेझेंट) म्हणजे वर्तमानाआधी याचे संदर्भ वर्ष इ. स. १९५० धरले आहे]. किरणोत्सर्गी कार्बन कालनिर्णय पद्धती ही कार्बनाच्या र्‍हासावर आधारलेली आहे [→ खडकांचे वय]. हा कालावधी वायव्य यूरोपातील शीतनाच्या (यंगर ड्राइस) कालावधीशी आणि कमी वा र्‍हास होत असलेल्या तेथील स्कँडिनेव्हियन हिमस्तराच्या अंतिमतः तुकडे होण्याच्या क्रियेशी अगदी जुळणारा आहे. 

 

मोठे हिमस्तर वितळण्याचा थेट परिणाम म्हणजे होलोसीन काळाच्या आधीच्या अवधीत जागतिक महासागराच्या पातळीत झालेली मोठीवाढ हा होय. १०,००० बीपी मध्ये महासागराच्या पातळ्या सध्याच्या पातळ्यांपेक्षा सु. ३५ मी. खालीच होत्या. या पातळ्या नंतर सु. ६,००० बीपी पर्यंत जलद वाढत गेल्या. तेव्हापासून समुद्राची पातळी आताच्या पातळीच्या संदर्भात काही मीटर एवढी खाली-वर होत राहिली आहे. उघड्या पडलेल्या खंडफळ्यांवरील समुद्राच्या अतिक्रमणाचे मोठे पुरा-भौगोलिक परिणाम झालेले आहेत. बेरिंग सामुद्रधुनीवरील आशिया ते अमेरिका असा जाणारा भूसेतू पाण्याखाली गेला. या सेतूमुळे आधीच्या मानवाला अमेरिकेत स्थलांतर करणे शक्य झाले होते. याच प्रकारेब्रिटिश बेटे व यूरोप, जपान व सायबिरिया, श्रीलंका व भारत आणि टास्मानिया व ऑस्ट्रेलियाची मुख्य भूमी यांना जोडणारे भूप्रदेशही पाण्याखाली गेले. 

 

जाड हिमस्तरांनी प्रत्यक्ष आच्छादिलेल्या क्षेत्रांमध्ये संबंधित जमिनी-वरील बर्फ वितळणे व समुद्राची पातळी यांचे झालेले थेट परिणाम याहून अधिक गुंतागुंतीचे आहेत. येथे बर्फाच्या वजनाने त्याच्याखालील भूकवच दाबले गेले, या प्रक्रियेला समस्थायी पुनःप्राप्ती म्हणतात. शेवटच्या हिमानी क्रियेच्या अंतापासून स्कँडिनेव्हियासारख्या अतिशय मोठ्या प्रमाणावर हिमानी क्रिया झालेल्या क्षेत्रांत भूकवच या समस्थायी उचलले जाण्याने कित्येकशे मीटर वर उचलले गेले आहे. 

 

होलोसीन काळातील जलवायुमान कसे उत्क्रांत वा विकसित होतगेले, याचे अनुसंधान (तपशीलवार संशोधन) मुख्यत्वे परागविज्ञानाच्या (परागांच्या विश्लेषणाच्या) तंत्राद्वारे करतात. सरोवर व तण यांतील अवसादांमध्ये टिकून राहिलेल्या पराग व बीजुक यांच्या जीवाश्मांच्या समुच्चयांच्या अध्ययनातून गतकाळातील वनश्रींविषयीचे निष्कर्ष काढता येतात. निक्षेपांमधील भिन्न पातळ्यांतील या समुच्चयांची तुलना केल्यास वनश्रींमध्ये झालेले बदल निर्देशित होतात. पर्यायाने या बदलांचा अर्थ परिस्थितिवैज्ञानिक व जलवायुमानीय बदलाच्या भाषेत लावणे शक्यहोते. शिवाय ज्या पातळ्यांमधील अवसादात प्रमुख बदल घडलेले आहेत, त्यांचे किरणोत्सर्गी कार्बन कालनिर्णय पद्धतीने वय काढतात. 

 

होलोसीन काळात माणूस प्राण्यांची शिकार करू लागला व प्राणी पाळू लागला. त्याने शेती करायला सुरुवात करून तिचा विकास केला. तोधातू, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि इतर नैसर्गिक साधनसंपत्ती वापरण्यास शिकला. तसेच तो नदी व वारा यांची शक्ती आपल्या कामासाठी वापरू लागला. 

 

प्लाइस्टोसीन व होलोसीन कालीन भारतातील खडकांचे निक्षेप पुढे दिले आहेत. यांपैकी प्रत्येक निक्षेप त्याच्या भागातील (स्थानातील) काहीतरी महत्त्व असलेला शैलसमूह आहे. उत्तर सतलज व हिमालयातील इतर नद्या, तसेच द्वीपकल्पातील नर्मदा, तापी व गोदावरी या नद्यांचे उच्च पातळीवरचे नदीतटमंच काश्मीरमधील उत्तर सतलज खोऱ्यातील सरोवरी निक्षेप (उत्तर कारेवा) व काठेवाड समुद्रकिनाऱ्यावरील फोरॅमिनीफेरायुक्त वालुकाश्म (पोरबंदर खडक) तसेच तिनेवेल्ली व त्रावणकोर समुद्रकिनाऱ्यावरील तेरीस गोदावरी, कृष्णा व कावेरी नदीकिनाऱ्यांवरीलवातज निक्षेप (गंगेच्या खोऱ्यातील भुर निक्षेपाशी साम्य) सॉल्ट रेंजव पोतवार येथील लोएस निक्षेप पोतवार पठारावरील नदी व हिमनदीयांनी तयार झालेले निक्षेप गुजरात व दख्खन येथील कपाशीच्यापिकासाठी चांगली असणारी काळी मृदा (जमीन) . प्लाइस्टोसीन वनंतरच्या काळातील निक्षेपांची ही व इतर अनेक उदाहरणे आहेत.त्यांतील होलोसीन कालीन नेमके निक्षेप वेगळे सांगणे अवघड आहे.तथापि, नदीमुखांतील अधिक नवे जलोढ (गाळ), वर उचलले गेलेले अधिक नवीन समुद्रकिनारे व पुळणी हे द्वीपकल्पातील नदीतील आधुनिक निक्षेप, सुकलेली नदीमुखे, पंखनिक्षेप इ. हिमालयाच्या प्रदेशातील वाऱ्याने वाहून आणलेली वाळू, लोएस, ट्रॅव्हर्टाइन वगैरे मिठाच्या (सैंधवी) डोंगरांतील आणि अधिक नवीन जलोढ व सिंधु-गंगा नद्यांमधील खादर हे होलोसीन काळातले शैलसमूह आहेत. 

 

पहा : चतुर्थ कल्प नवजीव प्लाइस्टोसीन शैलसमूह, भारतातील. 

 

संदर्भ : 1. Pieloy, E. C. After the Ice Age : The Return of Life to Glaciated North America, 1991.

            2. Wadia, D. N. Geology of India, 1961.

            3. Wright, H. E., Ed., Late Quaternary Environment of the United States, Vol. 2 : The Holocene, 1983. 

 

ठाकूर, अ. ना.