संकोण वालुकाश्म : (खरीचा दगड). हा एक गाळाचा खडक आहे. धारदार कडा असलेल्या (अणकुचीदार) वाळूसारख्या कणांचा बनलेला हा खडक कठीण असतो. यातील कणांचे आकार व आकारमान भिन्न असून त्यांचे आकारमान वाळूच्या कणांएवढे (०.०६ ते २ मिमी.) असते. संकोण वालुकाश्म व वालुकाश्म या संज्ञा जवळजवळ समतुल्य आहेत. भरडकणी संकोण वालुकाश्माला संकोण पिंडाश्म म्हणतात.

आधीच अस्तित्वात असलेल्या खडकांना तडे जातात. त्यांचे विघटन (तुकडे) होऊन आणि संनिघर्षण (पाणी, वारा, हिम इत्यादींमुळे) झीज होऊन त्यांचा चुरा होतो. असा चुरा सामान्य तापमानाला व दाबाला साचत जातो. उदा., वाळवंटी व शीत प्रदेशांतील डोंगरांच्या तीव्र उतारांच्या पायथ्याशी असा चुरा साचतो. गुरूत्वाकर्षण, पाणी, हिम इत्यादींव्दारे चुऱ्याची वाहतूक होऊन त्याच्यातील कणांचे आकार व आकारमान यांनुसार प्रकारीकरण होऊ शकते. चुऱ्याचे एकावर एक थर साचून स्तरित रचनाही तयार होऊ शकते. कणांच्या कडा, कोपरे व पृष्ठभाग धारदार (तीक्ष्ण) असल्याने ते अणकुचीदार व खडबडीत राहतात. साचलेले असे कण व थोडी फार वाळू सामान्यत: सिलिकामय संयोजक द्रव्याने आणि त्यांच्यावर पडणाऱ्या दाबाने चिकटविले जाऊन संहत (घट्ट) खडक तयार होतो. वेड्या वाकड्या आकारांचे कणथराच्या मुख्य तळाला तिरप्या स्थितीत साचून प्रवाहस्तरण (तिरपी थरयुक्त रचना) क्वचित निर्माण होऊ शकते. मात्र असे स्तरण अगदी अस्पष्ट असते.

जलवायुमानाच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या)कोणत्याही परिस्थितीत संकोण वालुकाश्म तयार होतो.

संकोण वालुकाश्मातील बहुतेक भरड, अणकुचीदार कण क्वॉर्ट्‌झ या खनिजाचे असतात. ⇨र्को खडक हा संकोण वालुकाश्माचा एक प्रकार असून त्यात फेल्स्पार खनिजांच्या ताज्या कणांचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही खडकांत क्वॉर्ट्‌झ व फेल्स्पार यांच्या शिवाय गार्नेट, मॅग्नेटाइट व इतर कठीण खनिजांचे कण असू शकतात.

पहा : कोणाश्म गाळाचे खडक.

ठाकूर, अ. ना.