व्हिव्हिॲनाइट : लोखंडाचे खनिज, स्फटिक एकनताक्ष प्रचिनाकार स्फटिक व त्यांवर उभ्या रेघा असतात [→ स्फटिकविज्ञान]. अरीय मांडणीचे गट, ग्रंथिल, वृक्काकार, तंतुमय, लेपाच्या व मानकट रूपांतही हे आढळते. ⇨ पाटन : (010) उत्कृष्ट. रंग पांढरा वा दळल्यावर निळा ते हिरवट निळा (म्हणून याला ब्ल्यू आयर्न अर्थ वा ब्ल्यू ऑकर म्हणतात). कस निळसर पांढरा. पातळ पाटन पटले लवचीक असतात. चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची मोत्यासारखी, ताजे खनिज पारदर्शक असते. मात्र उघडे पडल्यावर दुधी काचेप्रमाणे पारभासी वा अपारदर्शकही होते. छेद्य. रा. सं. Fe3 (PO4)2.8H2O (सजल लोह फॉस्फेट). हे बंद नळीत तापविल्यास पाणी बाहेर पडते. हे नंतरच्या क्रियांनी बनणारे म्हणजे द्वितीयक खनिज असून हे विरळाच आढळते. वातावरणक्रिया झालेल्या फॉस्फेटी निक्षेपात, तसेच तांब्याच्या व कथिलाच्या शिरांत पायरोटाइट व पायराइट यांच्याबरोबर वातावरणक्रियेने हे बनते. कधी कधी हे दलदली लोहधातुंकात व मृत्तिका थरांतही आढळते. कॉर्नवॉल, डेव्हन, बव्हेरिया, जर्मनी, जपान, रशिया, अमेरिका (न्यू जर्सी, कोलोरॅडो) इ. ठिकाणी हे आढळते. जे. जी. व्हिव्हिअन या खनिजवैज्ञानिकांनी ते शोधून काढले म्हणून त्यांच्या नावावरून याचे व्हिव्हिॲनाइट हे नाव पडले.

ठाकूर, अ. ना.