लेपिडोलाइट : (लिथिओनाइट, लिथिया अभ्रक). अभ्रक गटातील खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार बहुधा स्फटिक फलक किंवा षट्‌कोणी बाह्य रेखा असलेले प्राचीन (छद्म षट्‌कोणी) या रूपात आढळतात [⟶स्फटिकविज्ञान]. सामान्यतः याचे लहान खवल्यांचे अथवा सूक्ष्म ते भरडकणी पुंज आढळतात. क्वचित याचे मोठे पत्रेही आढळतात. ⇨पाटन (001) उत्कृष्ट यामुळे याचे पातळ पापुद्रे सूटू शकतात. कठिनता २.५-४. वि. गु. २.८-३. दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक मोत्यासारखी. यातील लोह व मँगॅनीज यांच्या प्रमाणानुसार याचा रंग गुलाबी, जांभळट गुलाबी ते करडसर पांढरा असतो क्वचित निळसर आणि रुबिडियम जास्त असलेला प्रकार पिवळसर असतो. रा. सं. K2Li2Al3 (Al, Si3, O10)2 (O,OH,F)4. रा. सं. मध्ये विविधता आढळते. पोटॅशियमाच्या जागी थोडे रुबिडियम व सिझियम आलेले असते. तसेच यात थोडे मॅंगॅनीज, फेरस व फेरिक लोह, सोडियम व मॅग्नेशियमही असते. सिलिकॉन व लिथियम विपुल आणि ॲल्युमिनियम कमी प्रमाणात असलेल्या याच्या प्रकाराला पॉलिथिओनाइट म्हणतात. हे अम्लांत विरघळत नाही व बंद नळीत तापविल्यास अम्लधर्मी पाणी मुक्त होते. शुभ्र अभ्रक गुलाबी आणि लेपिडोलाइट पांढरे असू शकते. लिथियमामुळे ज्योतीला जांभळट लाल रंग येतो व म्हणून या दोन्हींतील भेद स्पष्ट होण्यासाठी ज्योत-परीक्षा वापरतात. या दोन खनिजांदरम्यानचे प्रकारही असून यांच्यामधले संघटन असणाऱ्या प्रकारांना लिथियम शुभ्र अभ्रक म्हणतात.

लेपिडोलाइट हे लिथियमाचे सर्वांत सामान्यपणे आढळणारे खनिज असले, तरी हे सापेक्षतः दुर्मीळ खनिज आहे. ते मुख्यत्वे गुंतागुंतीची संरचना असलेल्या ग्रॅनाइटी पेग्मटाइट या खडकांच्या ⇨भित्तींत वा शिरांमध्ये आढळते. स्पॉड्युमीन, तोरमल्ली, अँब्लिगोनाइट इ. लिथियमयुक्त खनिजे, क्वॉर्ट्‌झ, पुष्कराज, क्लीव्हलँडाइट, वैदूर्य वगैरे खनिजे याच्याबरोबर आढळतात. पुष्कळदा याचे स्फटिक शुभ्र अभ्रकात समांतर स्थितीत आंतरवृद्ध (अंतर्गत वाढ) झालेले आढळतात. रशिया, चेकोस्लोव्हाकिया, एल्बा बेट, मादागास्कर, दक्षिण व नैर्ॠत्य आफ्रिका, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पूर्व भाग येथे हे आढळते. भारतामध्ये हे धारवाडी संघाच्या खडकांत आढळते. अजमेर-उदयपूर (राजस्थान), हजारीबाग (बिहार) व बस्तर (मध्य प्रदेश) या भागांत हे आढळते. वस्तर भागात याची ३५० मी. पर्यंत लांबीची भिंगे आढळली असून त्यात २ टक्क्यांपर्यंत लिथियम ऑक्साइड असते.

लेपिडोलाइट हे लिथियमाचे मुख्य धातुक (कच्च्या रूपातील धातू) असून त्यासाठीच ते मुख्यत्वे काढतात. शिवाय यापासून रूबिडियमही मिळविण्यात येते. काच (विशेषतः उष्णतारोधी काच) व मृत्तिका (पोर्सलीन) उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून हे वापरतात. अणुसंघटनविषयक (दोन कमी वजनाच्या अणुकेंद्रांचा संयोग होऊन अधिक भारी वजनाचे अणुकेंद्र तयार होण्याच्या क्रियेविषयीच्या) प्रयोगांतही हे वापरतात. याच्यातील स्ट्रॉंशियम/रुबिडियम या गुणोत्तराचा उपयोग खडकाचे वय ठरविण्यासाठी होऊ शकतो. सामान्यपणे खवल्यासारख्या पापुद्रांच्या रूपात आढळत असल्याने खवला अर्थाच्या लेपिडॉस या ग्रीक शब्दावरून याचे लेपिडोलाइट हे नाव आले आहे.

पहा : अभ्रक-गट.

ठाकूर, अ. ना.