स्क्रूप, जॉर्ज ज्यूल्यस पॉलेट : (१० मार्च १७९७ — १९ जानेवारी १८७६). इंग्रज भूवैज्ञानिक व राजकीय अर्थशास्त्रज्ञ. त्यांनी ज्वालामुखीचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले. त्यामुळे भूविज्ञानातील नेपच्युनिझम ( वरुणवाद ) हा सिद्धांत मागे पडला. या सिद्धांतामध्ये भूकवचातील सर्व खडक हे पाण्याद्वारे निक्षेपित झाले ( साचले ) किंवा पाण्यामधून स्फटिकीभूत झाले, असे मानले जात होते. याऐवजी ⇨सर चार्ल्स लायेल यांच्याबरोबर त्यांनी युनि-फॉर्मिटॅरिऑनिझम ( एकविधतावाद वा सरूपतावाद ) ही संकल्पना मांडली. तीनुसार सर्व भूवैज्ञानिक काळात पृथ्वीला आकार देणार्‍या प्रक्रिया एकसारख्या ( एकविध ) नियमित रीतीने व एकाच तीव्रतेने चालू असतात. यामुळे भूतकाळातील भूवैज्ञानिक घटनांचे स्पष्टीकरण वर्तमान काळात पाहता येणार्‍या व घडत असणार्‍या आविष्कारांद्वारे देता येते. थोडक्यात वर्तमान ही भूतकाळाची गुरुकिल्ली असते.

स्क्रूप यांचा जन्म लंडन येथे झाला. शार्लोत याकोब व जॉनपॉलेट टॉमसन हे त्यांचे आईवडील होत. हॅरो प्रशाला, पेम्ब्रोक कॉलेज ( ऑक्सफर्ड, १८१५ -१६) व सेंट जॉन्स कॉलेज ( केंब्रिज, १८१६—२१) येथे त्यांचे शिक्षण होऊन ते पदवीधर झाले. १२ मार्च १८२१ रोजी त्यांचा विवाह विल्यम स्क्रूप या विल्टशर येथील सरदाराची कन्या व शेवटची वारसदार एमा फिप्स स्क्रूप यांच्याशी झाला आणि जॉर्ज यांनी आपले मूळचे टॉमसन हे आडनाव बदलून पत्नीचे स्क्रूप हे आडनाव स्वीकारले. विवाहानंतर लगेचच कॅसल कोंब ( विल्टशर ) येथे ते स्थायिक झाले.

स्क्रूप १८१६-१७ मध्ये नेपल्स ( इटली ) येथे गेले होते. तेथे त्यांनी व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीची क्रिया पाहिली व यामुळे त्यांना ज्वाला-मुखीक्रियेविषयी कुतूहल निर्माण झाले. १८१७ — १९ दरम्यानच्या दोन हिवाळ्यांत त्यांनी व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीचा स्फोटक उद्रेक प्रत्यक्ष पाहिला. १८१९-२० दरम्यान त्यांनी सिसिली व लिपारी बेटे येथे जाऊन अनुक्रमे मौंट एटना व स्ट्राँबोली या ज्वालामुखींचा अभ्यास केला. १८२१ मध्ये त्यांनी मध्य फ्रान्समधील ओव्हेर्न्या या निद्रिस्त ज्वालामुखी क्षेत्राचे निरीक्षण व अध्ययन केले. नंतर ते उत्तर इटली व नेपल्सला गेले होते. तेव्हा त्यांनी १८२२ सालच्या व्हीस्यूव्हिअसाचा उद्रेक पाहिला होता. १८२३ मध्ये त्यांनी जर्मनीतील आयफेल ज्वालामुखी प्रदेशाचे निरीक्षण केले होते.

जर्मन भूवैज्ञानिक व भौतिकीविद ⇨ आब्राहाम गॉटलोप व्हेर्नर यांची तत्त्वे व विचार तेव्हा अग्रगण्य मानले जात असत. अशा काळात स्क्रूप यांनी अभ्यास करून व्हेर्नर यांच्या वरुणवादी कल्पनांचे खंडन केले. स्क्रूप यांचे पहिले पुस्तक कन्सिडरेशन्स ऑन व्होल्कॅनोज (१८२५) हा ज्वालामुखीविज्ञानावरील पद्धतशीर रीतीने लिहिलेला सर्वांत आधीचा विवेचक ग्रंथ होता. कारण ज्वालामुखीक्रियेविषयीचा समाधानकारक सिद्धांत पद्धतशीरपणे मांडण्याचा हा पहिला प्रयत्न होता. यामुळेच आधुनिक ज्वालामुखीविज्ञानाची सुरुवात झाली. या ग्रंथात त्यांनी ज्वाला-मुखींचे पृथ्वीच्या इतिहासातील कार्य विशद केले होते त्यांनी ज्वालामुखीक्रियेत पाण्याचे असलेले महत्त्व यासंबंधी आधी समर्थन केले आणि ज्वालामुखी कुंडे भूकवच वाकून बनतात या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी केली. ऑन द जिऑलॉजी अँड एक्स्टिंक्ट व्होल्कॅनोज ऑफ सेंट्रल फ्रान्स हा त्यांचा दुसरा ग्रंथ १८२७ मध्ये प्रसिद्ध झाला. प्रत्यक्षात हा ग्रंथ १८२२ मध्ये लिहिला होता. यातील लेखन अधिक प्रमाणात वरुणवादी विचारांचे होते. त्यांनी वैश्विक प्रलयाचे खंडन केले होते.

सर्वश्रेष्ठ ज्यू प्रेषित मोझेस यांच्या धार्मिक विचारांतून भूविज्ञानाची सुटका करणारे स्क्रूप हे एक भूवैज्ञानिक होते. प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी (१८३०) या ग्रंथाचा पहिला खंड लिहिण्यास स्क्रूप यांनी सर चार्ल्स लायेल यांना मदत केली होती आणि भूविज्ञानावरील धर्मशास्त्राचा प्रभाव काढून टाकणे, हा या ग्रंथाचा मुख्य हेतू होता.

स्क्रूप यांनी १८२७ मध्ये ओव्हेर्न्या क्षेत्राला परत भेट दिली व आपल्या संबंधित ग्रंथाची सुधारित आवृत्ती १८२८ मध्ये काढली. ती त्यांनी लायेल यांना अर्पण केली होती. स्क्रूप यांनी आपल्या पहिल्या ग्रंथाचीही सुधारित आवृत्ती १८६२ मध्ये काढली. शिवाय या ग्रंथाचे पुनर्मुद्रण १८७२ मध्ये झाले. तेव्हा त्यांनी नवीन प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेत त्यांनी त्यांच्या समग्र विचारांचा सर्वसाधारण गोषवारा दिला होता. क्वार्टर्ली रिव्ह्यू यासारख्या नियतकालिकांत त्यांनी अनेक लेख लिहिले होते. अखेरच्या पंधरा वर्षांत त्यांनी अनेक पत्रे व छोटे लघुलेख लिहिले. ते बहुतेक लेखन जिऑलॉजिकल मॅगेझीन मध्ये प्रसिद्ध झाले.

लग्नानंतर स्क्रूप यांनी मुख्यत: सामाजिक व राजकीय समस्यांकडे आपले लक्ष वळविले. १८३३—६८ दरम्यान ते लिबरल पक्षाचे संसद सदस्य होते. मुक्त व्यापार आणि विविध प्रकारच्या राजकीय व आर्थिक सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी विविध राजकीय व आर्थिक विषयांवर लेखन केले. त्यांनी ७० अनामिक पुस्तपत्रे वा पत्रिका ( पॅमफ्लिट ) लिहिल्याचे मानतात. यामुळे त्यांना पॅमफ्लिट स्क्रूप हे टोपण नाव पडले होते.

स्क्रूप यांची जिऑलॉजिकल सोसायटीवर निवड झाल्यावर (१८२४) तिचे सचिव झाले (१८२५). त्यांची रॉयल सोसायटीवर १८२६ मध्ये निवड झाली. ते विल्टशर आर्कीऑलॉजिकल अँड नॅचरल हिस्टरी सोसायटीचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते (१८५३-५४). १८६७ मध्ये जिऑलॉजिकल सोसायटीचे वोलॅस्टेन पदक त्यांना मिळाले.

स्क्रूप यांचे फेअरलॉन येथे निधन झाले.

पहा : ज्वालामुखी – २.

ठाकूर, अ. ना.