टेनंटाइट : (ग्रे कॉपर ओअर). खनिज. स्फटिक घनीय चतुष्फलकीय, पुष्कळदा द्वादशफलकीय [⟶ स्फटिकविज्ञान]. संपुंजित व संहत राशीही आढळतात. चमक धातूसारखी. रंग शिशासारखा ते लोखंडासारखा काळा. हे तांबे व आर्सेनिक यांचे सल्फाइड असून टेट्राहेड्राइटाशी समाकृतिक (स्फटिकांचा आकार, संरचना इत्यादींत सारखेपणा असलेले) असल्याने त्यात थोडेसे अँटिमनी असते. कधीकधी तांब्याच्या जागी अल्पसे लोह, जस्त, बिस्मथ अथवा चांदी येते. हे तांब्याच्या इतर खनिजांबरोबर आढळते. हे तांब्याचे गौण धातुक (कच्च्या स्वरूपातील धातू) आहे. इंग्लंड, नॉर्वे, मॅक्सिको, पेरू वगैरे भागांत हे सापडते. इंग्रज रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनंट यांच्या बहुमानार्थ याला टेनंटाइट हे नाव देण्यात आले. ( १८१९).

पहा : टेट्राहेड्राइट.

केळकर, क. वा.