क्रिटेशस : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. काळाच्या विभागाला क्रिटेशस कल्प व त्या कल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला क्रिटेशस संघ म्हणतात. हा काळ सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत मानतात. फ्रान्स व ब्रिटन या देशांतील परिचित असा चॉकचा खडक या कल्पातला आहे म्हणून ओमेलियस द हॅलॉय या फ्रेंच वैज्ञानिकांनी या संघाला क्रिटेशस (लॅटिन क्रीटा = खडू) हे नाव सुचविले (१८२२). वास्तविक चॉक हा या संघातला एकमेव किंवा मुख्य खडक नाही वालुकाश्म, मृत्तिकाश्म, ज्वालामुखी लाव्हे व इतर पुष्कळ खडक या संघात आहेत. या संघाच्या सागरी आणि असागरी खडकांच्या लहान मोठ्या राशी सर्व खंडांत आढळतात. क्रिटेशसचे पूर्व व उत्तर असे दोन मुख्य विभाग केले जातात.

क्रिटेशस कल्पात पृथ्वीच्या कवचाच्या हालचाली होऊन तिच्या भौगोलिक स्वरूपात अनेक फेरफार घडून आले. त्या हालचालींमुळे काही प्रदेश उचलेले गेले हे खरे पण त्यांचा एकूण परिणाम असा झाला की, समुद्राचे पाणी खंडांच्या जमिनीवर पसरत गेले व कल्पाच्या उत्तर कालात खंडांची विस्तीर्ण क्षेत्रे समुद्राच्या पाण्याने झाकली गेली (सिनोमॅनियन सागरी अतिक्रमण). या कल्पाच्या प्रारंभीच्या काळात दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळची, उत्तर अमेरिकेच्या वायव्य भागाची व मध्य अमेरिकेच्या पूर्वेकडच्या भागाची आणि पश्चिम युरोपातील पुष्कळशी जमीन समुद्राखाली होती. आर्क्टिक महासागराचे एक आखात रशियाच्या मैदानी प्रदेशात दक्षिणेकडे दूरवर गेले होते. आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्याजवळचे आल्प्स-हिमालय इ. पर्वतरांगा असलेले प्रदेश टेथिस समुद्राच्या पाण्याखाली होते. भारताचे द्वीपकल्प टेथिसाच्या दक्षिणेस व आशियाच्या मुख्य भूमिपासून वेगळे होते.

क्रिटेशसच्या उत्तर भागात दक्षिण अमेरिकेचा पश्चिम पट्टा समुद्राबाहेर आला होता व त्या खंडाचा बहुतेक भाग जमीन होता. पण उत्तर अमेरिकेच्या पुष्कळशा भागांवर समुद्राचे पाणी पसरले होते. उत्तरेकडील आर्क्टिक महासागरापासून तो मेक्सिकोच्या आखातापर्यंत जाणारा व एक उत्तर-दक्षिण समुद्र निर्माण होऊन उत्तर अमेरिकेचे दोन तुकडे झाले होते. ब्रिटिश बेटांची बहुतेक बेटांची जमीन समुद्राखाली होती व उत्तर समुद्राचा एक रुंद फाटा पूर्वेकडील पोलंड व रशियापर्यंतच्या जमिनीवर पसरला होता. टेथिस समुद्राचाही विस्तार होऊन त्याचे पाणी व त्याच्या पाण्याचे फाटे शेजारच्या जमिनींवर पसरले होते. टेथिसाचा एक फाटा सहारावर पसरून दक्षिणेकडे गेला होता. तो तसाच पुढे जाऊन अटलांटिक सागरास मिळून आफ्रिका खंडाचा वायव्येकडचा भाग मुख्य खंडापासून अलग झाला असावा.

भारताच्या उत्तरेकडील टेथिस समुद्रात तयार झालेले खडक उत्तर हिमालयात व स्पिटी, कुमाऊँ इत्यादींत आढळतात. द्वीपकल्पावरही सागराचे आक्रमण झाले होते. टेथिसाचा एक उपसागर द्वीपकल्पाच्या वायव्येकडील भागावर पसरला होता आणि त्याच्यात साचलेले खडक मिठाच्या डोंगराच्या प्रदेशात व सिंधच्या पश्चिम भागात आढळतात. त्या उपसागराचा एक फाटा नर्मदेच्या खोऱ्यात आजच्या किनाऱ्यापासून सु. ३८० किमी. पर्यंत आत गेला होता [→ बाघ थर]. पूर्व किनाऱ्यावरही समुद्राचे आक्रमण झाले होते व त्या समुद्रात साचलेले थर पूर्व किनाऱ्यावरील पाँडेचेरीपासून तो कावेरीच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात व आसामधील पर्वतरांगांत आढळतात.

वर उल्लेख केलेल्या सागरी खडकांशिवाय इतर अनेक असागरी व जमिनीवर तयार झालेले खडक भारताच्या द्वीपकल्पात व इतर खंडांत आढळतात. क्रिटेशस कल्पाच्या अखेरीस भारताच्या द्वीपकल्पात प्रचंड ज्वालामुखी क्रिया सुरू झाली. या कल्पातील वनस्पति-जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) समतीशोष्ण किंवा उपोष्ण हवामान मानवणारी जवळजवळ एकाच प्रकारची वनश्री सर्व खंडांत होती, असे दिसून येते. ग्रीनलंडातल्या किंवा अलास्कातल्या खडकांतही त्यांचे जीवाश्म आढळतात. एकूण पृथ्वीचे हवामान त्या काळी उपोष्ण ते समशीतोष्ण होते व वनस्पतींना अनुकूल असे दमट हवामानही कित्येक क्षेत्रांत होते.

जीवसृष्टी : क्रिटेशस कल्पात ॲमोनॉइडिया व बेलेम्नॉइडिया पुष्कळ असत. पुढे त्यांचा ऱ्हास झाला व कल्पाच्या अखेरीस ते निर्वंश झाले. अमोनॉइडांच्या पुष्कळ वंशांची कवचे कमीअधिक विकुंडलित (वेटोळे उलगडलेली) असत. उत्तर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा दक्षिण भाग इत्यादींतील उत्तर क्रिटेशस खडकांत ट्रायासिक (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या) कालीन सेराइटांसारख्या सेवन्या (दोन संरचनांना जोडणाऱ्या रेषा) असणाऱ्या ॲमोनाइटांचे जीवाश्म आढळतात.

गॅस्ट्रोपोडांचा व बायव्हाल्व्हियांचा उत्कर्ष होत गेला. कल्पाच्या उत्तर भागात असमपुटी कवके असणाऱ्या बायव्हाल्व्हियांपैकी रूडिस्टी गटातल्या हिप्प्युराइट  वंशाचे विपुल प्राणी टेथिस समुद्रात असत. त्यांची वाढ असामान्य प्रकारची म्हणजे प्रवाळांसारखी असे व त्यांच्या कवचांचे प्रवाळ भिंतीसारखे थर आढळतात.

फोरॅमिनीफेरा पुष्कळ असत व त्यांची विपुल कवके असलेले चॉक व चुनखडक आढळतात. एकिनॉयडियांचा उत्कर्ष झाला. ब्रॅकिओपोडा, स्पंज व प्रवाळ या गटांचे प्राणी गौण व क्रिनॉयडिया विरळा असत.

उत्तर क्रिटेशस कल्पात आधुनिक अस्थिमत्स्यांचा एकाएकी उत्कर्ष होऊन त्यांनी पूर्णास्थिक मत्स्यांस मागे टाकले.

जमिनीवरील प्राण्यापैकी मुख्य म्हणजे सरीसृप (सरपटणारे प्राणी) होत व त्यांच्या जमिनीवर व सागरात राहणाऱ्या विपुल जाती होत्या. पण कल्पाच्या अखेरीस त्यांचे बहुतेक गट निर्वंश झाले. या कल्पाच्या प्रारंभीही आजच्यासारखे उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी) होते.

क्रिटेशस कल्पाच्या सुरुवातीपासून वनश्री मुख्यतः सायकॅडोफायटा, कॉनिफेरी व नेचे यांची असून सपुष्प वनस्पती क्षुल्लक असत, पण त्यांचा उत्कर्ष वेगाने होऊन कल्पाच्या अखेरीस त्यांनी अग्रस्थान पटकाविले.

केळकर, क. वा.