डायास्पोर : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, प्रचिनाकार, सामान्यतः चापट वडीसारखे, कधीकधी सुईसारखे [⟶ स्फटिकविज्ञान]. संपुंजित, पात्यांसारख्या अथवा पापुद्र्यांच्या राशीही आढळतात. ⇨ पाटन  (010)  उत्कृष्ट.  भंजन शंखाभ [⟶ खनिजविज्ञान]. अतिशय ठिसूळ. कठिनता ६·५–७. वि. गु. ३·३५–३·४५. चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची मोत्यासारखी. रंग पांढरा, हिरवट करडा. पिवळसर तपकिरी. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रा. सं. AI2O3·H2O किंवा HAIO2. बॉक्साइट, जांभा, एमरी इत्यादींच्या निक्षेपांत (साठ्यांत) हे कुरुविंद, तोरमल्ली वगैरेंच्या जोडीने आढळते. हे उरल पर्वत, नॅक्सॉस बेट, आशिया मायनर, ग्रीस, चेकोस्लोव्हाकिया वगैरे भागांत सापडते. हे उच्चतापसह (उच्च तापमानास न वितळणारा ) पदार्थ म्हणून वापरतात. हे तापविल्यास तडतडून उडते त्यामुळे विखुरणे अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आर्. जे. हॉय यांनी डायास्पोर हे नाव दिले. (१८०१).

केळकर, क. वा.