मिलेराइट : (निकेल पायराइट किंवा निकेल हेअर किंवा कॅपिलरी-पायराइ‌ट्‌स). खनिज. स्फटिक षट्‌कोणी. सामान्यतः याचे केसांसारखे बारीक व नाजूक स्फटिक आढळतात व त्यामुळेच याला कॅपिलरी (केशनलिका) वा हेअर-पायराइट्‌स म्हणतात. स्फटिकांचे झुबके असतात व त्यांत अरीय (त्रिज्यीय) मांडणी आढळते. कधी-कधी हे मखमलीसारख्या पुटांच्या व क्वचित कणमय रूपांतही आढळते. ⇨ पाटन : [1011] व [0112] चांगले. ठिसूळ. कठिनता ३–३·५ वि.गु. ५·३–५.७ चमक धातूसारखी. रंग पितळेसारखा ते काशासारखा फिकट पिवळा, स्फटिकांच्या झुबक्यावर हिरवटा छटा असते. कस काहीसा हिरवट काळा. रा.सं. NiS. यांत बहुधा कोबाल्ट, तांबे व लोह लेशमात्र असतात. उघड्या नळीत तापविल्यास सल्फर डायऑक्साइडाचा वास येतो. हे नीच तापमानात बनलेले खनिज असून विरळाच आढळते. पुष्कळदा हे चूनखडक, डोलोमाईट, कॅलसाइट, सिडेराइट यांसारख्या कार्बोनेटी (खनिजांच्या शिरांतील) पोकळ्यांत आढळते (उदा., विस्कॉन्सिन, अमेरिका). कधीकधी हे निकेलाच्या इतर खनिजांत बदल होऊन बनलेले असते. क्ले-आयर्नस्टोन व शिरांमध्ये यांच्या गाठी आढळतात, तर व्हीसयूव्हियस ज्वालामुखी येथे ते संप्लवनाद्वारे (वाफेचे सरळ घनरूपात परिवर्तन होण्याच्या प्रकियेद्वारे) तयार झालेले आढळते. हे अशनीतही सापडले आहे. इतर सल्फाइडे तसेच निकेल व कोबाल्ट यांची खनिजे यांच्या बरोबर हे आढळते. हे निकेलचे गौण धातुक (कच्ची धातू) म्हणून वापरले जाते व धातुक म्हणून ते कॅनडा व चेकोस्लोव्हाकियात काढण्यात येते. यांशिवाय पूर्व जर्मनी, अमेरिका, ग्रेट ब्रिटन इ. देशांतही हे सापडते.

विल्यम हॅलोझ मिलर (१८०१–८०) या इंग्रज खनिजवैज्ञानिकांनी सर्वप्रथम याच्या स्फटिकांचे अध्ययन केले. त्यांच्यावरून व्हिल्हेल्म कार्ल फोन हायडिंजर (१७९५–१८७१) यांनी याला मिलेराइट हे नाव दिले (१८४५).

ठाकूर, अ. ना.