मृत्तिका : निसर्गात आढळणारे मातकट, अतिसूक्ष्मकणी द्रव्य. मर्यादीत प्रमाणात पाणी मिळाल्यास मृत्तिका आकार्य होते म्हणजे तिला हवा तो आकार देता येतो. काहींच्या मते आकार्यता हा मृत्तिकेचा आवश्यक गुणधर्म आहे. सुकल्यावर मृत्तिकेच्या वस्तूचा आकार टिकून रहातो व ती टणक होते, तसेच अशी वस्तू भाजल्यावर दगडासारखी टणक व घट्ट होते. माती, शेतमाती, मृदा आणि विशेषतः गाळाचे खडक यांच्यातील सर्वांत सूक्ष्मकणी घटक बहुधा मृत्तिकेचा बनलेला असतो. कृषिविज्ञानात २ मायक्रॉनांपेक्षा (१ मायक्रॉन = ०·००१ मिमी.) तर भूविज्ञानात ४ मायक्रॉनांपेक्षा लहान कण असलेल्या घटकाला मृत्तिका म्हणतात. अशा प्रकारे १ किग्रॅ. मृत्तिकेतील कणांचे एकूण पृष्ठीय क्षत्रफळ ८० हेक्टरांपेक्षा जास्त होते.

मृत्तिका थोड्याच स्फटिकी खनिजांच्या बनलेल्या असतात, असे क्ष-किरण विवर्तन तंत्रावरून [विशेषकरून स्फटिकांद्वारे क्ष-किरणांचे प्रकर्णन-विखूरले जाण्याची क्रिया-होऊन व्यक्तिकरण परिणामांमुळे त्यांच्या तीव्रतेत होणाऱ्या बदलांवर आधारलेल्या तंत्रावरून → क्ष-किरण] दिसून आले आहे. या खनिजांना ⇨ मृद्-खनिजे म्हणतात. केओलिनाइट, हॅलॉयसाइट, माँटमोरिलोनाइट, व्हर्मिक्युलाइट, बायडेलाइट, इलाइट, क्लोराइट, अटापुलगाइट ही काही मृद्-खनिजे होत. बहुतेक मृत्तिका दोन वा अधिक मृद्-खनिजांच्या व थोड्या एकाच मृद्-खनिजाच्या बनलेल्या असतात. तथापि निसर्गात शुद्ध मृत्तिका क्वचितच आढळतात. त्यांच्यात क्वार्ट्‍झ, फेल्स्पार, अभ्रक, कार्बोनेटी खनिजे, लोह ऑक्साइडे व सल्फाइडे यांचे सूक्ष्मकण आणि काही मृत्तिकांमध्ये अल्प प्रमाणात जैव द्रव्यही मिसळलेले आढळते. यामुळे भूविज्ञानात मृत्तिका हा एक खडक मानला जातो.

गुणधर्म : मृत्तिकांचे पुष्कळ गुणधर्म त्यांच्यातील कणांच्या सूक्ष्म आकारमानामुळे आलेले असतात. तसेच मृत्तिकांचे गुणधर्म व वैशिष्ट्ये त्यांच्यातील मृद्-खनिजाच्या प्रकारानुसार ठरतात. बहुतेक सर्व मृत्तिका हाताला ग्रीजप्रमाणे मऊ (गुळगुळीत) लागतात. त्यांचे पाण्यात कलिली निलंबन [अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेले विशिष्ट प्रकारचे द्रव मिश्रण → कलिल] बनते. मृत्तिकांच्या काही गुणधर्मांची माहिती पुढे दिली आहे.

आकार्यता : फ्लिंट मृत्तिकेसारखे काही अपवाद सोडल्यास बहुतेक मृत्तिका योग्य प्रमाणात पाणी मिसळल्यावर आकार्य होतात म्हणजे त्यांच्या ओल्या गोळ्याला हवा तो आकार देता येतो. मृत्तिकेच्या प्रत्येक पत्रकाभोवती (कणाभोवती) रेणूच्या व्यासाएवढ्या जाडीचे पाण्याचे पटल तयार होते व विविध आकार देताना मृत्तिकेचे कण या पटलाला अनुसरून एकमेकांवर घरंगळू शकतात. अशा प्रकारे आकार्यता येते. अतिशय आकार्य मृत्तिकांना ‘सबल’ तर अगदी कमी आकार्य मृत्तिकांना ‘दुर्बल’ मृत्तिका संबोधिले जाते. मृत्तिकेचे रा. सं. म्हणजे तिच्यातील मृद्-खनिजे घटक कणांचा आकार आणि आकारमान, तिच्यातील जैव व कार्बनी द्रव्ये, तसेच विद्राव्य (विरघळणारी) लवणे, आयन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) आणि तिच्यातील मृद्-खनिजांव्यातिरिक्तची इतर खनिजे व त्यांचे प्रमाण या सर्व गोष्टींवर मृत्तिकेची आकार्यता अवलंबून असते.

बल : मृत्तिकेची वस्तू ओली व आकार्य असतानाच्या तिच्या बलाला ‘कच्चे बल’ तर सुकल्यावर येणाऱ्या तिच्या बलाला ‘पक्के बल’ असे म्हणतात. ज्या गोष्टींवर आकार्यता अवलंबून असते, त्यांच्यावरच मृत्तिकेचे कच्चे बल अवलंबून असते सूक्ष्मकणांचे आकार व प्रमाण, वस्तू बनविण्याची व सुकविण्याची पद्धती आणि सुकविण्याची मर्यादा या गोष्टींवर मृत्तिकेचे पक्के बल अवलंबून असते. मृत्तिकेतील माँटमोरिलोनाइट या खनिजाच्या वाढत्या प्रमाणानुसार पक्के बल वाढत जाते.

आकुंचन : सुकविल्यानंतर अथवा भाजल्यानंतर मृत्तिकेच्या वस्तूच्या आकारमानात जी घट होते, तिला आकुंचन वा आकुंचन मर्यादा म्हणतात. मृद्-खनिजांचा प्रकार, त्याच्या कणांचा आकार आणि मिसळलेल्या पाण्याचे प्रमाण यांवर हे आकुंचन अवलंबून असते. अतिशय आकार्य असणाऱ्या मृत्तिकेत आकुंचन जास्त प्रमाणात होते. त्यामुळे अशा मृत्तिकेच्या वस्तू सुकल्यावर वाकड्यातिकड्या होतात किंवा त्यांना तडे पडू शकतात. वालुकामय वा कमी आकार्य मृत्तिकांचे आकुंचन कमी होते. त्यामुळे अशा मृत्तिकेच्या वस्तू सच्छिद्र,तकलादू वा दुर्बल होतात. माँटमोरिलोनाइटाचे प्रमाण जास्त (सु. १० ते २५%) असलेल्या मृत्तिकेची वस्तू सावकाश सुकते आणि जास्त आकुंचनामुळे तिला तडे जातात. वस्तू भाजण्यानेही आकुंचन होते. सजल मृद्-खनिजांच्या निर्जलीकरणामुळे (मृद्-खनिजांतील पाणी निघून गेल्यामुळे) असे आकुंचन होते व ते मृत्तिकेतील बाष्पनशील (वाफेच्या रूपात उडून जाणाऱ्या) पदार्थांवरही अवलंबून असते.


गलनीयता : (उष्णतेने वितळले जाण्याचे मान). मृत्तिका सामान्यतः उच्च तापमानाला वितळतात. हलक्या दर्जाच्या मृत्तिका सु. १,०००० से., तर उच्च दर्जाच्या म्हणजे तापसह मृत्तिका १,३०० ते १,४००० से. तापमानापर्यंत संघटन न बदलता वितळत नाहीत. गलनीय मृत्तिकांपासून १,३००० से. पेक्षा कमी तर तापसह मृत्तिकांपासून १,६००० से. पेक्षा जास्त तापमानाला काच तयार होते.

काचीकरण्याच्या तापमानाचा पल्ला : मृत्तिकेचे तापमान जसजसे वाढत जाते, तसतसे तिच्यातील घटक वितळत जाऊन शेवटी तिचा रस बनतो. हा रस अचानकपणे व चटकन थंड झाल्यास त्यापासून काच तयार होते. या प्रक्रियेला काचीकरण म्हणतात. अशा प्रकारे काचीकरण होण्यासाठी लागणाऱ्या तापमानाचा पल्ला (सिमा) काही मृत्तिकांच्या बाबतीत कमी असतो. अशा वेळी भट्टीच्या तापमानाचे अगदी काटोकोरपणे नियमन करावे लागते. इलाइट, माँटमोरिलोनाइट व क्लोराइट यांचा हा पल्ला केओलिनाइटाच्या पल्ल्यापेक्षा कमी आहे. अशा प्रकारे वस्तू भाजण्याचा एकूण कालावधी, भाजण्यासाठी वापरलेले सर्वाधिक तापमान, मृत्तिकेच्या आकुंचनाचे प्रमाण व तिची सच्छिद्रता यांच्यावर निर्माण होणाऱ्या काचेचे (काचीकरणाचे) प्रमाण अवलंबून असते.

रंग : बहुतेक मृत्तिका करड्या वा पांढऱ्या असतात. तसेच लाल, पिवळसर, तपकिरी, निळसर, हिरवट, जांभळट व काळपट छटांच्या मृत्तिकाही आढळतात. मुख्यत्वे लोहयुक्त खनिजांमुळे (उदा., हेमॅनाइट, लिमोनाइट) आणि कधीकधी इतर मूलद्रव्यांमुळे मृत्तिकेच्या वस्तूंना रंग येतो. उत्कृष्ट पांढऱ्या व स्वच्छ मृत्तिकेत फेरिक ऑक्साइड १ टक्क्यापेक्षा कमी असते. याचे प्रमाण १ ते ५ टक्क्यांपर्यंत असलेल्या मृत्तिकांच्या वस्तूंना पिवळसर वा पिंगट तर ५ टक्क्याहून जास्त फेरिक ऑक्साइड असलेल्या मृत्तिकांच्या वस्तूंना लाल रंग येतो.

प्रकार : मृत्तिकेतील घटक मृद्-खनिजांनुसार मृत्तिकांचे प्रकार पडतात.

केओलीन : या बव्हंशी केओलिनाइटाच्या बनलेल्या असतात. पांढरा रंग, अतिसूक्ष्मकण, मऊपणा [मोस मापक्रमानुसार कठिनता २-२·५ → कठिनता] आणि रासायनिक अक्रियता ही यांची वैशिष्ट्ये आहेत. कागद-मृत्तिका (कागदाला वजन आणि अत्यंरूप देण्यासाठी लगद्यात मिसळण्यात येणारी मृत्तिका), बॉल मृत्तिका, फ्लिंट मृत्तिका, तापसह मृत्तिका इत्यादींचाही केओलिनाइट हा महत्त्वाचा घटक असतो. [→ केओलीन]. 

बॉल (सुघठ्य) मृत्तिका : मुख्यत्वे केओलिनाइटाच्या बनलेल्या या मृत्तिका काळपट रंगाच्या व अशुद्ध (मलद्रव्ययुक्त), अतिशय आकार्य व उच्चतापसह असतात. सामान्यतः खाणीतून यांचे सु. २५ सेंमी. घनाकार ठोकळे म्हणजे ‘बॉल’ काढण्यात येतात. यामुळे यांना बॉल मृत्तिका म्हणतात.

टेरा कोटा : (पक्व मृदा). पूर्वी सर्व तापसह मृत्तिकांसाठी ही संज्ञा वापरीत आता मुख्यतः अशा बऱ्याचशा भरड व सच्छिद्र प्रकाराला आणि त्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंनाही टेरा कोटा म्हणतात. भाजल्यावर या मातीच्या वस्तू दगडाप्रमाणे टणक व कठीण होतात आणि त्यांना सामान्यपणे गुलाबी, तपकिरी, मंद नारिंगी किंवा तांबडी छटा येते. या वस्तूंना बहुधा झिलई नसते. मातीची भांडी, मूर्ती, फरश्या. कुंड्या, फुलदाण्या, बांधकामाचे शोभिवंत भाग इ. वस्तू हिच्यापासून बनविण्यात येतात.

तापसह माती : सामान्यपणे सु. १,६४०० से. तापमानाला न टिकून राहू शकणाऱ्या मृत्तिकांना हे नाव देतात. लोह, पोटॅशियम आणि सोडियम यांची लवणे निघून गेल्याने मृत्तिकेला हा गुण प्राप्त झालेला असतो. अनाकार्य फ्लिंट मृत्तिका कमी आकार्य, मृत्तिका, तसेच सिलिका व ॲल्युमिना यांचे उच्च प्रमाण असलेल्या मृत्तिका यांचे मिश्रण म्हणजे तापसह माती होय. सामान्यतः दगडी कोळशाच्या थरांमध्ये या आढळतात. [→ तापसह माती].


बेंटोनाइट : या मृत्तिका मुख्यत्वे माँटमोरिलोनाइट, थोडेसे बायडेलाइट व अत्यल्प प्रमाणात अग्निज खडकांचे कण यांच्या बनलेल्या असतात. बहुधा ज्वालामुखी राखेचे अपघटन होऊन त्या बनलेल्या असतात. प्रसरणशील (फुगणाऱ्या) व अप्रसरणशील (न फुगणाऱ्या) असे प्रकार पडतात. प्रसरणशील मृत्तिका आपल्या आकारमानाच्या आठपट पाणी शोषून घेऊ शकते व त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर फुगते. ही हलकी असून पाण्यात लोंबकळत राहते. अप्रसरणशील मृत्तीका जड असून पाण्यात बुडते आणि हिच्या

साहाय्याने विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करता येते. काहींच्या (बेंटोनाइटाच्या) बाबतीत रासायनिक विक्रियेद्वारे विरंजनाची क्षमता (क्रियाशीलता) आणता येते. [→ बेंटोनाइट].

मुलतानी माती : विशेषेकरून कपड्यांवरील मळ, अनावश्यक रंग, तेलाचे डाग वगैरे घालवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मृत्तिकेला हे नाव देतात. यांच्यात मुख्यत्वे अटापुलगाइट हे खनिज असते, तर काहींमध्ये विरंजनक्षम बेंटोनाइट आढळते. [→ मुलतानी माती].

डायास्पोर मृत्तीका : सुमारे ८५% ॲल्युमिनीयम ऑक्साइड व १५% पाणी असणारे डायास्पोर हे खनिज व केओलीन यांच्या मिश्रणाने ही मृत्तीका बनलेली असते. [→ डायास्पोर].

मुलाइट मृत्तिका : ॲल्युमिनीयम सिलिकेटयुक्त खनिजांपासून अतिउच्च तापमानाला मुलाइट खनिज बनते. या खनिजाचे जास्त प्रमाण असणाऱ्या मृत्तिकेला हे नाव देतात.

संकीर्ण मृत्तिका : इलाइट, क्लोराइट, केओलिनाइट व माँटमोरिलोनाइट ही मृद्-खनिजे आणि इतर खनिजे यांचे विविध प्रमाणांत मिश्रण होऊन या मृत्तिका बनलेल्या असतात. विटा, कौले, कृत्रिम फरश्या, नळ, टेरा कोटाच्या वस्तू इ. बनविण्यासाठी यांचा उपयोग होतो. सैतानाचा चिखल या नावाने ओळखण्यात येणारी मृत्तीका सायप्रसमध्ये आढळते. खाणकाम करताना मजुरांच्या कपड्यांवर हिचा वाईट परिणाम होतो म्हणून हे नाव पडले आहे. हिच्यातील सोन्या-चांदीच्या कणांमुळे हिला महत्त्व आलेले आहे.

आढळ व खाणकाम : प्राचीन व आधुनिक अशा सर्व भूवैज्ञानिक काळांतील गाळ व गाळाच्या खडकांत मृत्तिका आढळतात. सागरतळ, जमीन, सरोवरे, नदीमुखे इ. ठिकाणी हल्ली साचत असलेल्या गाळांतही मृत्तिका निर्माण होऊ शकतात. कधीकधी वाळवंटे, लोएस निक्षेप, नद्यांची पात्रे इ. ठिकाणीही मृत्तीका आढळतात तर काही मृत्तिका ज्वालामुखी क्रियेशी, काही धातुक निक्षेपांशी (कच्च्या धातूच्या राशींशी) निगडीत असतात. अनियमित राशी तसेच पैकाश्म, शेल, पाटीचा दगड, गाळ, मृदा इत्यादींचा महत्त्वपूर्ण घटक वगैरे रूपांत मृत्तिका आढळतात. शेल दळूनही मृत्तिका मिळवतात.

जगात सर्वत्र मृत्तिका आढळतात. भारतात विविध प्रकारच्या मृत्तिका निरनिराळ्या राज्यांत आढळतात. यांपैकी काही मृत्तिका आर्कीयन कालीन पट्टिताश्म या खडकातील फेल्स्पाराचे अपघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होऊन, तर काही शेल या खडकापासून बनलेल्या आहेत. चिनी माती बिहार, गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, ओरिसा, राजस्थान व प. बंगाल येथे मुलतानी माती राजस्थान, गुजरात, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश व कर्नाटक येथे बेंटोनाइट जम्मू, तमिळनाडू व राजस्थान येथे आणि तापसह माती आसाम, बिहार, गुजरात, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, पं. बंगाल येथे,तर अर्धतापसह माती आंध्र प्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये आढळते. शिवाय बॉल मृत्तिका, लिथोमार्ज व कुंभारमाती विशेषतः आसामात व इतरत्र सर्व भागांत आढळते. महाराष्ट्रात मुख्यतः नागपूर, चंद्रपूर, अमरावती,रत्नागिरी, सिधूदूर्ग अणि ठाणे या जिल्ह्यांत मृत्तिका आढळतात. या मुख्यतः गोंडवनी व आर्कीयन कालीन खडकांशी निगडीत आहेत. मृत्तीकेचे खाणकाम बहुधा उघड्या खाणी चालवून करण्यात येते. मृत्तिकेच्या साठ्यावरील निरुपयोगी खडक व खुद्द मृत्तीका काढण्यासाठी उत्खनन यंत्रे, यांत्रीक फावडी, बुलडोझर वगैरेंचा तर त्यांच्या वाहतुकींसाठी पट्टावाहक, तारदोरावरील ट्रॅमगाडी, रेल्वे वाघिणी, ट्रक, जहाजे वगैरेंचा वापर करतात. नळांतूनही रबडीच्या रूपात मृत्तीका वाहून नेण्यात येते.

वापरण्यापूर्वी कधीकधी मृत्तिकेवर काही प्रक्रिया कराव्या लागतात. कोरड्या मृत्तिकेच्या बाबतीत दलन, सुकविणे, चूर्णन वगैरे क्रिया करतात. योग्य प्रकारची मृत्तिका बनविण्यासाठी ओल्या पद्धतीने अशा प्रक्रिया करतात. उदा., औषधोपयोगी वा कागदासाठी लागणाऱ्या केओलीनच्या बाबतीत प्रथम त्याचे आकारमानानुसार अलगीकरण करतात. नंतर लोहयुक्त मलद्रव्ये काढून टाकणे, गाळून पाणी काढून टाकणे, सुकविणे, चूर्णन इ. क्रिया केल्या जातात.


उत्पत्ती : वातावरणक्रियेने व कधीकधी जलतापीय (गरम पाण्यातील विद्रावाच्या) क्रियाने मृत्तिका निर्माण होतात. मूळ खडकाचे स्वरूप, जलवायूमान (दीर्घकालीन सरासरी हवामान), वनश्री व वातावरणक्रियेचा कालावधी यांवर मृत्तिकांची निर्मिती अवलंबून असते. उत्पत्तीनुसार मृत्तिकांचे आहे तेथेच बनलेल्या म्हणजे अवशिष्ट आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेल्या जाऊन साचलेल्या म्हणजे अवसादी असे प्रकार पडतात. पृष्ठभागी खडकांची वातावरणक्रियेद्वारे झीज होऊन पुढील तीन प्रकारे अवशिष्ट मृत्तिका तयार होतात: (१) ग्रॅनाइटासारख्या खडकाचे अपघटन होऊन, (२) मृण्मय मलद्रव्ये असणाऱ्या चुनखडकासारख्या खडकातील विद्राव्य पदार्थ पाण्याबरोबर निघून जाऊन आणि (३) शेल खडकांचे विघटन (यांत्रिक रीत्या तुकडे होण्याची क्रिया) व विद्राव होऊन.

उपयोग : प्राचीन काळापासून विविध वस्तू (उदा., धूळपाटी) बनविण्यासाठी, निरनिराळ्या उद्योगधंद्यात व शेतीमध्ये मृत्तिकांचा वापर करण्यात येत आहे. हल्लीही अधातवीय खनिज संपत्तीमध्ये औद्योगित दृष्टीने उपयुक्त असलेल्या मृत्तिकांचे स्थान सर्वांत महत्त्वाचे आहे. उपयोगाच्या दृष्टीने मृत्तिकेचे रासायनिक संघटन तेवढे महत्त्वाचे नसते तर आकार्यता, उच्चतापसहता, रंग, वस्तू भाजल्यानंतर येणारा रंग इ. मृत्तिकेची वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरतात. घरगुती वापराची मातीची व चिनी मातीची भांडी तसेच मोठ्या उद्योगधंद्यात वापरण्यात येणाऱ्या लहानमोठ्या वस्तू बनविण्यासाठी मृत्तिका वापरतात. विशिष्ट कामासाठी विशिष्ट मृत्तिकाच वापराव्या लागतात (उदा., कागद गुळगुळीत व पांढरा करण्यासाठी शुभ्र केओलीन, तर खनिज तेलाचे परिष्करण करण्यासाठी अटापुलगाइटयुक्त मृत्तिका). घरगुती वापराची गाडगी-मडकी, बरण्या, कपबश्या, चिलमी, किटल्या, फुलदाण्या, विटा, कौले, फरश्या, भांड्या, नळ इ. तसेच पोर्सलिनाच्या वस्तू, शेगड्या, लिनोलियम, भिंतीला चिकटवावयाचे कागद, अपघर्षक (खरवडून व घासून पृष्ठ गुळगुळीत करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ) वगैरे बनविण्यासाठी निरनिराळ्या मृत्तिका वापरतात. विद्युत् निरोधक वस्तू, उच्चतापसह विटा, फरश्या व गिलावा, रासायनिक विक्रियांसाठी व ऊर्ध्वपातनासाठी (तापवून बाष्प करून व मग थंड करून मिश्रणातील घटक अलग करण्यासाठी) लागणारी पात्रे, मुशी, साचाकाम, ओतकाम वगैरेंसाठी उच्चतापसह व अर्ध उच्चतापसह मृत्तिका वापरतात. खनिज तेलाच्या विहिरी खणताना लागणाऱ्या चिखलात स्मेक्टाइटयुक्त बेंटोनाइट वापरतात व पेट्रोलचे उत्पादन करताना स्मेक्टाइट, केओलिनाइट वा हॅलॉयसाइटयुक्त उत्प्रेरक (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) वापरतात. यांशिवाय कापडाच्या विरंजनासाठी, रबर, काही प्लॅस्टिके वगैरेंना ताठपणा व बळकटी आणण्यासाठी भरण द्रव्य म्हणून, काच व सिमेंटनिर्मिती, पाणी मृदू करण्यासाठी (कॅल्शियम वा मॅग्नेशियम लवणविरहित करण्यासाठी) व गाळण्यासाठी, तसेच रंगलेप, शाई, रंगीत खडू, पेन्सिली व औषधे, कीटकनाशके, पीडकनाशके, आसंजके (चिकटविणारे पदार्थ), मेणकापड, सौंदर्यप्रसाधने, मूर्ती इ. बनविताना मृत्तिकांचा वापर केला जातो. बॉक्साइटयुक्त मृत्तिकेपासून ॲल्युमिनियम मिळविण्यात येते. मुलतानी माती, बेंटोनाइट इ. मृत्तिकांवर अम्लाचे वा वाफेचे संस्करण करून त्यांची विरंजनक्षमता वाढविण्यात येते व अशा मृत्तिकांना सक्रियित मृत्तिका म्हणतात. उद्योगधंद्यांच्या दृष्टीने सक्रियित मृत्तिका महत्त्वाच्या आहेत.

भूमिपात व मृत्तिका : स्कँडिनेव्हिया प्रदजेशातील पुष्कळ भागांत खडकांच्या सपाट थरांमध्ये सागरी वा हिमनादेय उत्पत्तीच्या गतिशील मृत्तिका आढळतात. त्यांना सामान्यपणे चल मृत्तिका (रेवण) म्हणतात. सागराच्या किनारी भागात साचलेल्या या मृत्तिका वर उचलल्या गेल्या आहेत. सामान्यपणे इलाइट व क्लोराइट यांच्या या बनलेल्या आहेत. झिरपणाऱ्या पाण्याने यांच्यातील लवणे निघून गेल्यावर त्यांची गतिशीलता वाढते. जेव्हा पाणी मृत्तिकेच्या वजनाच्या दुपटीहून अधिक होते तेव्हा मृत्तिका द्रवाप्रमाणे वागू शकते. परिणामी अशा मृत्तिकेचा थर वंगणाप्रमाणे कार्य करू शकतो आणि त्याच्यावरील वालुकाश्माचा वा रेतीचा थर खाली घसरून भूमिपात होतो [उदा., १९५० साली स्वीडनमधील १०% पेक्षा कमी उतार असलेल्या थराच्या भागात काही मिनिटांत सु.१३५ मी.पर्यंत मृत्तिका खाली आली व त्यामुळे हमरस्ता व रूळमार्ग सरकले → भूमिपात]. प. कॅनडा व अलास्कातही अशा मृत्तीका आढळतात. अधिक कठीण खडकांमध्ये मृत्तिकेचा पातळ थर असतो तेव्हा जादा पाऊस पडल्याने मृत्तिकेचा असा थर पाण्याने संपृक्त (जास्तीत जास्त प्रमाणात असलेला) होतो व वंगणासारखा वागतो. त्यामुळे याच्यावर असलेल्या खडकांच्या राशी यावरून खाली घसरून भूमिपात होतो. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असे भूमिपात वारंवार होतात.

पहा : मृण्मय खडक मृत्तिका उद्योग मृदा मृद्-खनिजे.

संदर्भ: 1. Gillott, J. E. Clay In Enginerring Geology, London, 1968.

             2. Grim, R. E. Applied Clay Mineralogy, New York, 1962.

             3. Swineford, A. Clays and Clay Minerals, Oxford, 1968.

आगस्ते, र. पां. ठाकूर, अ. ना.