धूममुख : (फ्यूमॅरोल). वाफ वा तप्त वायुरूप पदार्थ बाहेर टाकणारे भूपृष्ठावरील छिद्र वा निर्गमद्वार. बहुतकरून अशी निर्गमद्वारे ज्वालामुखी शंकूच्या कडांवर, ज्वालामुखीजवळील परिसरात वा प्रत्यक्ष ज्वालामुखी विवरात असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी, दोन उद्रेकांच्या दरम्यानच्या काळात निद्रिस्त ज्वालामुखीत वा ज्वालामुखी निद्रिस्त झाल्यानंतरही धूममुखे दीर्घकाल चालू राहतात. यांतून बाहेर पडणारे वायुरूप पदार्थ हे ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वायूंसारखेच असतात, मात्र धूममुखातून केवळ वायूच बाहेर पडतात. या वायूंमध्ये प्रामुख्याने पाण्याची वाफ असते. गंधकयुक्त वायू, हायड्रोक्लोरिक व हायड्रोफ्ल्युओरिक अम्लांची वाफ तसेच कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, लिथियम, पोटॅशियम, सोडियम वगैरे थोड्या प्रमाणात धूममुखांच्या वायूंत असतात. या वायूंबरोबर कधीकधी काही धातूही वाहून आणले जातात व ते भूपृष्ठावर अल्प प्रमाणात साचतात. या वायूंचा अभ्यास प्रथम आर्. डब्ल्यू. बन्सन यांनी केला. नंतर एच्. सॅन्त क्लेअर दव्हिल यांनी इतर रसायनशास्त्रज्ञ व भूवैज्ञानिकांच्या बरोबर सांतोरिनी (एटना, इटली) येथील धूममुखांतील वायूंचा अभ्यास केला. त्यावरून निरनिराळ्या धूममुखांचे तापमान वेगवेगळे व एकाच धूममुखाचेही भिन्नभिन्न असते, असे आढळून आले. १९१२ सालच्या कॅटमाई ज्वालामुखीच्या उद‌्गिरणाच्या वेळी ‘दशसहस्त्र धूममुख दरी ’ (व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक्स, अलास्का) येथील धूममुखांचे कमाल तापमान ६४५° से. आढळले व त्यांच्यातून ९८% पाण्याची वाफ आणि हायड्रोक्लोरिक, हायड्रोफ्ल्युओरिक आणि बोरिक अम्ले, कार्बन डाय-ऑक्साइड व इतरही वायू अल्प प्रमाणात बाहेर पडत असल्याचे आढळले. येथेच लेशमात्र प्रमाणात जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, आर्सेनिक, अँटिमनी, कथिल, चांदी, कोबाल्ट, बिस्मथ, सिलिनियम, टेल्युरियम, थोरियम इ. धातूही आढळल्या. निद्रिस्त होत असलेला सोल्फाटेरा किंवा फोरम व्हल्कॅनी या पोतत्स्वॉलीजवळील (इटली) ज्वालामुखीच्या धूममुखांचे तापमान १००° ते १६५° से., तर व्हीस्यूव्हिअसजवळील धूममुखांचे तापमान ५६०° से. आढळले. प्रत्यक्ष लाव्ह्यातील धूममुखांचे तापमान मात्र  ७००° ते ८००° से. असावे.

धूममुखांपासून ⇨ उन्हाळे व नंतर ⇨ गायझरे तयार होतात. कोरडा मोसम व पावसाळा यांच्यामध्ये तीव्र फरक असल्यास कोरड्या मोसमात उन्हाळ्याचे धूममुख बनते, तर पावसाळ्यात धूममुखाचे उन्हाळे होते. यलोस्टोन नॅशनल पार्कमधील ग्रोलर झरा हे याचे उदाहरण आहे. या उन्हाळ्याचे (झऱ्याचे) तापमान ९३° से. असते, मात्र दीर्घकाल हवामान कोरडे राहिल्यास त्याला धूममुखाचे रूप येते व त्याचे तापमान १०३° से. होते म्हणजेच उन्हाळे हे ‘बुडालेले धूममुख’ म्हणता येईल. धुराचे छिद्र या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून इंग्रजी फ्युमॅरोल हे नाव पडले आहे.

धूममुखांतून बाहेर पडलेली द्रव्ये (उदा., गंधक आणि टाकणखार) सभोवताली साचून कधीकधी त्यांचे उपयुक्त साठे तयार होतात. मात्र काही ठिकाणी धूममुखांच्या वाफांमुळे वनस्पती नष्ट होतात, तर काहींतील वायू विषारी व गुदमरविणारे असल्याने त्यांच्यामुळे मानव व प्राणी मरू शकतात.

पहा : ज्वालामुखी –२.

ठाकूर, अ. ना.