स्टॉरोलाइट : हे निओसिलिकेट खनिज बहुधा चपट्या, लांबट व प्रचिनाकार समचतुर्भुजी स्फटिकांच्या रूपात आणि क्वचित संपुंजित रूपात आढळते [⟶ स्फटिकविज्ञान]. यात ⇨ पाटन नसते. याच्या शुद्ध प्रकाराची चमक राळेसारखी ते काचेसारखी आणि बदल झालेल्या वा अशुद्ध प्रकाराची चमक क्वॉर्ट्झ समाविष्ट झाल्याने मंद ते मातकट असते. रंग तांबूस उदी ते काळा कठिनता ७ — ७.५ ( पृष्ठभाग बदलून द्वितीयक अभ्रक बनले असता कठिनता याहून कमी असते) वि. गु. ३.६५—३.७५ दुधी काचेप्रमाणे पारभासी ठिसूळ. रा. सं. FeAl4(SiO4)2(OH)2. हे बहुधा अशुद्ध असते. हे अगलनीय खनिज आहे[⟶ खनिजविज्ञान].

मध्यम प्रतीच्या रूपांतरणाने बनलेल्या अभ्रकी सुभाजा, पाटीचा दगड ( स्लेट ) व कधीकधी पट्टिताश्म या खडकांमध्ये हे खनिज कायनाइट, गार्नेट व तोरमल्ली या खनिजांबरोबर आढळते. कॅनडा, अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, स्वित्झर्लंड ( सेंट गॉथर्ड ), इटली, बव्हेरिया, मोरेव्हिया इ. ठिकाणी हे आढळते. क्रूसाकार जुळे स्फटिक हे याचे वैशिष्ट्य असून असे जुळे स्फटिक दोन स्फटिकांची लंबदिशेत आंतरवृद्धी होऊन बनतात. असे रेखीव आणि क्रूसाकार जुळे स्फटिक धार्मिक बोधचिन्ह म्हणून व धार्मिक दाग-दागिन्यांत वापरतात. यामुळे ते महाग असतात. ब्राझीलमध्ये आढळणारा याचा पारदर्शक प्रकार रत्न म्हणून वापरतात. वैशिष्ट्यदर्शक क्रूसाकार जुळ्या स्फटिकांमुळे क्रूझ अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे स्टॉरोलाइट हे नाव पडले आहे. क्रॉसस्टोन, फेअरी स्टोन, ग्रॅनिटाइट व स्टॉरोटाइड ही याची पर्यायी नावे आहेत.

ठाकूर, अ. ना.