बिस्मथिनाइट : (बिस्मथ ग्लान्स). खनिज, स्फटिक समचतुर्भुजी [⟶ स्फटिकविज्ञान] स्फटिक क्वचित आढळतात व ते सुईसारखे असून त्यांवर रेखा असतात. बहुतकरून याच्या पर्णित (पापुद्र्यासारख्या) वा तंतुमय संरचनेच्या संपुंजित राशी आढळतात. पाटन : (010) चांगले. काहीसे छेद्य (कापता येईल असे). कठिनता २. वि. गु. ६.७८. रंग व कस शिशाप्रमाणे करडा. चमक धातूसारखी. अपारदर्शक. रा. सं. Bi3S3 यामध्ये थोडे अँटिमनी व शिसे आणि कधीकधी अल्पसे तांबे वा लोह असू शकते. हे उघड्या नळीत तापविल्यास गंधकाच्या वाफा बाहेर पडतात. हे नायट्रिक अम्लात विरघळते. सामान्यतः तांबे, शिसे, कथिल इत्यादींच्या धातुक (कच्च्या धातूंच्या) शिरांच्या बरोबर हे आढळते. तथापि हे विरळाच आढळते व त्याचे साठे ⇨स्टिब्नाइटाच्या साठ्यांप्रमाणे दिसतात. बोलिव्हियात याचे सर्वांत मोठे साठे असून तेथे हे कथिल व टंगस्टन यांच्या धातुक शिरांबरोबर सापडते. याशिवाय पेरू, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन, मेक्सिको, स्पेन, ब्रह्मदेश, कॅनडा, अमेरिका इ. देशांतही हे आढळते. भारतामध्ये हे बिहार, कांग्रा व सिक्कीम भागांत अल्प प्रमाणात सापडते. हे बिस्मथ धातूचे महत्त्वाचे धातुक असून त्यावरून याचे बिस्मथिनाइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.