तत्रजात : (ऑथिजेनिक). खडकाचा एखादा घटक जेथे खडक आढळला तेथेच निर्माण झालेला असल्यास त्याला तत्रजात घटक (खनिज) म्हणतात. उदा., साचलेल्या जागीच गाळ असताना त्याच्यात निर्माण होणारी नवीन खनिजे. काल्कोव्हस्की यांनी १८८० साली ऑथिजेनिक (विशिष्ट ठिकाणचा स्थानिक) ही संज्ञा सुचविली असून ती सामान्यपणे अग्निज खडकातील संयोजकासाठी (सिमेंटासाठी) वापरतात. अन्यत्रजात ही याच्या विरुद्धार्थी संज्ञा आहे. इतरत्र तयार होऊन साचण्याच्या ठिकाणी वाहून आलेल्या खनिजांना डबरी, तर मृत जीवांच्या कठीण भागांना जीवजात खनिजे म्हणतात.

गाळाच्या बहुतेक सर्व खडकांमध्ये तत्रजात खनिजे असतात. ती सुट्या विखुरलेल्या कणांच्या, डबरी कण चिकटविणाऱ्या संयोजकांच्या, डबरी खनिजांभोवती झालेल्या वाढींच्या किंवा प्रमुख घटकाच्या रूपात आढळतात. चुनखडक, डोलामाइट व चर्ट हे खडक मुख्यतः अनुक्रमे कॅल्साइट, डोलोमाइट किंवा कॅल्सेडोनी क्वॉर्ट्‌झ या तत्रजात खनिजांचे बनलेले असतात. हेमॅटाइट, गोएथाइट, पायराइट, तसेच झिर्‌कॉन, फेल्स्पार, तोरमल्ली व क्कॉर्ट्‌झ यांच्याभोवती झालेल्या वाढी सामान्यतः तत्रजात असतात.

तत्रजात खनिजे सामान्यपणे पुढील प्रकियांनी बनतात : (१) गाळ साचून तो घट्ट होईपर्यंतच्या काळातील भौतिक व रासायनिक बदलांमुळे ती बनतात. उदा., कॅल्साइट, डोलोमाइट. (२) रासायनिक संघटनात बदल न होता एकापासून दुसरे खनिज निर्माण होते. उदा., ॲरागोनाइटापासून कॅल्साइट. (३) निर्जलीभवनाने काही तत्रजात खनिजे बनतात. उदा., जिप्समापासून ॲनहायड्राइट, गोएथाइटापासून हेमॅटाइट. (४) अस्थिर खनिजे (डबरी वा जीवजात) व गाळाच्या छिद्रातील विरघळलेले आयन (विद्यूत् भारित अणू, रेणू वा अणुगट) यांच्यात विक्रिया होऊन तत्रजात खनिजे बनतात. उदा., डोलामाइटीभवन, पायराइटीभवन. (५) साचलेल्या गाळाच्या घटकांमधील पोकळ्यांतील अथवा मुरत जाणाऱ्या पाण्याच्या क्रियेने कित्येक खनिजांचे अपघटन होऊन (रेणूंचे तुकडे होऊन) नवी तत्रजात खनिजे बनतात. उदा., फेल्स्पारांपासून मृद् खनिजे, लोहयुक्त खनिजांपासून लिमोनाइट.

ठाकूर, अ. ना.