एन्स्टॅटाइट : पायरोक्सीन गटातील खनिज. स्फटिक समचतुर्भुजी ,प्रचिनाकार, परंतु विरळाच आढळतात.  हे बहुधा संपुंजित, तंतूमय किंवा पत्रित स्वरूपात आढळते. पाटन: (110) स्पष्ट ,(010) ला समांतर विभाजकप्रतले [→ स्फटिकविज्ञान] भंजन खडबडीत. कठिनता ५·५ वि.गु..३·२-३·५ चमक काचेसारखी, पाटनपृष्ठांची मोत्यासारखी रंग करडसर, पिवळसर किंवा हिरवट पांढरा, हिरवा , उदी, दुधी काचेप्रमाणे पारभासी, कस करडसर सा. सं. MgSiOa. यात FeO ५% पर्यंत असते. FeO ५% ते १३% असल्यास खनिजाची चमक ब्रॉँझसारखी होते. अशा खनिजाला ब्रॉँझाइट म्हणतात. यापेक्षा अधिक झाल्यास हायपर्स्थीन तयार होते. पायरोक्सिनाइट, पेरिडोटाइट, डायोराइट, काही रूपांतरित खडक इत्यादीमध्ये व सामान्यपणे अशीनीमध्येही (पृथ्वीवर पडलेल्या उल्का पाषाणांत) आढळते. उच्चतापसह (उच्च तापमान सहन करण्याच्या) गुणधर्मामुळे विरोधक या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून नाव पडले.

ठाकूर. अ. ना.