पायरार्जिराइट : (डार्क रेड सिलव्हर ओअर). खनिज. स्फटिक षट‌्कोणी अर्धाकृती वो टोकाशी प्रसूच्या असलेले प्रचिन. स्फटिक बहुधा वेडेवाकडे झालेले आढळतात. पुष्कळदा जुळे स्फटिकही असतात [→स्फटिकविज्ञान]. संपुंजित व संहत राशींच्या किंवा विखुरलेल्या कणांच्या रूपातही हे आढळते.⇨पाटन : (1011) स्पष्ट. भंजन काहीसे शंखाभ ते खडबडीत [→खनिजविज्ञान]. कठिनता २.५. वि. गु. ५.८५. चमक हिऱ्यासारखी. बहुधा अपारदर्शक, मात्र पातळ चकत्या दुधी काचेसारख्या पारभासी. रंग करडसर ते गडद काळा, मात्र पातळ पापुद्यांचा साध्या प्रकाशात माणकाप्रमाणे गडद तांबडा. कस जांभळट लाल. रा. सं. Ag3SbS3. यात थोडे आर्सेनिक असू शकते. हे नायट्रिक अम्लात विरघळते व उघड्या परीक्षानळीत तापविल्यास सल्फर डाय-ऑक्साइडाचा वास येतो कडांवर अँटिमनी ऑक्साइडाचा थर बसतो.

कमी तापमानात तयार झालेल्या चांदीच्या धातुक (कच्च्या स्वरूपातील धातू असलेल्या) शिरांत हे प्रूस्टाइट, चांदीची इतर खनिजे, चांदीयुक्त गॅलेना, कॅल्साइट व नैसर्गिक चांदी वा आर्सेनिक यांच्याबरोबर आढळते. झांग्त आंद्रेआस्बेर्क (हार्ट्झ पर्वत, प. जर्मनी), फ्रायबेर्ख (सॅक्सनी, पू. जर्मनी) व कोल्केचाका (बोलिव्हिया) येथे याचे चांगले स्फटिक आढळतात. ग्वानाव्हाटो (मेक्सिको), सिल्व्हर सिटी (आयडाहो, अमेरिका), पर्झीब्राम (बोहीमिया), चान्यार्सीयो (चिली), कोबॉल्ट (कॅनडा) इ. ठिकाणी याचे साठे असून चेकोस्लोव्हाकिया, नॉर्वे, हंगेरी, स्पेन, ब्रिटन इ. देशांतही ते आढळते.

हे चांदीचे महत्त्वाचे धातुक असून त्याच्यापासून चांदी मिळविली जाते. कारण यात सु. ६०% चांदी असते. याचा रंग व संघटनातील चांदी यांवरून अग्नी व चांदी अर्थांच्या ग्रीक शब्दांवरून पायरार्जिराइट हे नाव ग्लोकर यांनी १८३३ मध्ये दिले. हे ⇨प्रूस्टाइट (लाइट रेड सिल्व्हर ओअर) या खनिजाशी समरूप (सारखा स्फटिकाकार असलेले) व संबंधित असून जी. अँग्रिकोला (१४९४ – १५५५) यांनी या दोन्हींचा ‘रुबी सिल्व्हर’ (रेड सिल्व्हर ओअर)  असा उल्लेख १५४६ मध्ये केला होता मात्र जे. एल्. प्रूस्त (१७५५ – १८२६) यांनी रासायनिक विश्लेषणाद्वारे ही दोन्ही वेगळी असल्याचे १८०४ मध्ये ओळखून काढले.

पहा :  चांदी.                                                                                                   

ठाकूर, अ. ना.